Friday, January 10, 2014

मनुस्मृती - एक अलौकिक ग्रंथ !
(Manusmruti - An Extra-ordinary work !)

वाचण्यापेक्षा जाळण्यासाठीच जास्त प्रसिद्ध असलेल्या 'मनुस्मृती' या ग्रंथाविषयी माझ्या मनात खूपसं औत्सुक्य आणि बराचसा गैरसमज होता. 'मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्र यांच्यावर अन्याय केले, तिने ऐंशी टक्के माणसांना गुलाम ठरवलं, तिने अस्पृश्यता निर्माण केली' अशासारखी विधाने वाचण्यात आणि ऐकण्यात येत होती. तेव्हा हे प्रकरण आहे तरी काय असं वाटून मध्यंतरी मनुस्मृतीची एक प्रत वाचण्यापुरती मिळवली. ती वाचल्यावर आणि तिच्यावर अनेकांनी केलेलं भाष्य, तिची पूर्वपीठीका वगैरे समजून घेतल्यावर मूळ मनुस्मृतीसारखा अलौकिक ग्रंथ दुसरा नाही अशी माझी धारणा झाली. इथे 'मूळ' या शब्दाला काही विशिष्ठ अर्थ आहे. याबाबतीतली माझी निरीक्षणे खाली देतो :   

१) मूळ मनुस्मृती निर्माण केली गेली ती महाभारतापूर्वी अदमासे शंभर पिढ्या - म्हणजे तीन हजार वर्षे आधी. महाभारत इ. स. ३१०१ वर्षांपूर्वी झालं असं आज मानलं जातं. म्हणजे मूळ मनुस्मृतीला आज आठ हजार वर्षे होऊन गेली. या उलट  अलीकडे उपलब्ध असलेली मनुस्मृती ही भृगु कुळातल्या कुणा ऋषीने सांगितलेली केवळ दोन हजार वर्षांपूर्वीची आवृत्ती आहे. ती विपर्यस्त स्वरुपात असून तिच्यात किमान १७० प्रक्षिप्त श्लोक असावेत असं             कुक्कुलभट या टीकाकाराचं म्हणणं आहे. तर दयानंद सरस्वती यांच्या मते (पहा- 'सत्यार्थ प्रकाश') नंतर घुसडलेल्या श्लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असावी. हे श्लोक अर्थातच ब्राह्मण शास्त्री-पुराणिकांनी आपल्या स्वार्थासाठी नंतर घुसवलेले असावेत. या घुसखोर श्लोकांमुळे या आवृत्तीत विसंगती निर्माण झाली असून तिचे समर्थक आणि विरोधक आपापल्या सोयीचा भाग घेऊन आज भांडत बसलेले दिसतात.      

२) आठ हजार वर्षांपूर्वी मनुकडे समाजरचनेचे काम आले तेव्हा त्याला आर्य आणि एत्तदेशीय या सर्वांची व्यवस्था करायची होती. ती करताना त्याने नेमनियम केले. ते पाळणार्यांना त्याने 'सवर्ण' म्हटलं आणि न पाळणार्यांना 'अवर्ण' म्हटलं. वेद रचायला व म्हणायला लागणाऱ्या बुद्धीच्या निकषांवर त्याने सवर्णांचे द्विज आणि    शूद्र असे दोन भाग केले. या द्विजांचे त्याने पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार भाग पाडले. हे चार वर्ण आणि पाचवे अवर्ण मिळून त्याने समाजाचे 'पंचजन' निर्माण केले. या पंचजनांचा राज्याभिषेकापासून प्रत्येक गोष्टीत त्याने सहभाग ठेवला नि     जबाबदार्या वाटून दिल्या. याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना  त्याने कामधंदा मिळवून दिला. इतकी नामी व्यवस्था करणारा मनुस्मृती  हा जगातला पहिलाच ग्रंथ होता. तो वाचून प्रसिद्ध युरोपिअन तत्वज्ञ नित्शे याने उद्गार काढले, की 'बायबल फेका नि मनुस्मृती हाती घ्या !'         

३) केवळ ब्राह्मणांनाच नव्हे, तर स्त्रिया आणि शुद्र यांनाही मनुने काही अधिकार सांगितले आहेत, त्यांच्यावर जबाबदार्या दिल्या आहेत, त्यांची काळजी कशी घ्यावी ते सांगितलेलं आहे. एकाच गुन्ह्याबद्दल चारही वर्णात ब्राह्मणाला सर्वात जास्त शिक्षा सांगितली आहे (तो सर्वात ज्ञानी म्हणून.) मुख्य म्हणजे जन्माप्रमाणे नव्हे, तर कुवतीप्रमाणे वर्ण ठरवणारी व्यवस्था त्याने केली आहे. 'शूद्रो ब्राह्मणतामेति' या श्लोकात मनु म्हणतो, 'शुद्र कुळात जन्मूनही ज्याच्या अंगी ब्राह्मण (किंवा क्षत्रिय किंवा वैश्य यांच्याप्रमाणे) गुण, कर्म व प्रवृत्ती असेल त्याला ब्राह्मण (किंवा क्षत्रिय किंवा वैश्य) समजावे. याउलट ब्राह्मण (किंवा क्षत्रिय किंवा वैश्य) कुळात जन्मूनही जो गुणकर्माप्रमाणे योग्य नसेल त्याला शुद्र समजावे.' (श्लोक क्र. १०/ ६५)  एवढंच नव्हे, तर 'मोक्ष मिळवण्यासाठी आवश्यक असणारा परमधर्म शुद्राकडूनही शिकून घ्यावा' असंही मनु म्हणतो. (श्लोक क्र. २ / २३८)                   
४) ही व्यवस्था समजून घेण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एका कंपनीचे मालक आहात. शिपायाची, अकौंटन्टची, अधिकार्याची अशा वेगवेगळ्या नेमणुका तुम्ही ज्या त्या इसमाच्या कुवतीनुसार केलेल्या आहेत. उद्या शिपायाची कुवत वाढली तर तो अधिकारी बनू शकेल. पण कुवत वाढलेली नसताना त्याने अधिकार्याचे कामे करता कामा नयेत. तरीही ती केल्यास तो शिक्षेला पात्र होईल. अगदी हीच व्यवस्था मूळ मनुस्मृतीत होती. यात न पटण्यासारखं काय आहे ? 

५) स्त्रीविषयी मनुस्मृतीत काय म्हटलंय ते आता सांगतो. मनु स्त्री -पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही. स्त्रीला तो पुरुषाची दासी मानत नाही. स्त्री ही घराची लक्षुमी असल्याचं तो सांगतो. उदा. हे श्लोक पहा : 'स्त्रियांचा नेहमीच योग्य तो मान राखला जावा, त्यांची अवहेलना केल्यास धर्मकृत्येही निष्फळ ठरतात.' (श्लोक ३/५६) 'ज्या कुळात पत्नी, कन्या, भगिनी, सुना अवहेलनेचे दुःख भोगतात ते कुल नाश पावते. जिथे त्यांचा मान राखला जातो त्या कुळाची भरभराट होते.' (३/५७) स्त्रियांना वेद अध्ययनाचा अधिकारही मनुस्मृतीने दिलेला होता. गार्गी, मैत्रेयी, सुलभा अशा ब्रह्म वादिनी ही त्याची उदाहरणे होत. 

६) मनुस्मृतीत सांगितलेली वर्णव्यवस्था ही गुणकर्माधिष्टीत होती म्हणूनच इल पुरुरवा, भालान्दक वासाश्वसंकिल आणि इलुपपुत्र कवष हे अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असूनही ऋग्वेदाचे मंत्रवक्ते बनू शकले. 'ऐतरेय ब्राह्मण' या ग्रंथाचा कर्ता ऐतरेय हा दासीपुत्र होता. रामायण लिहिणारे वाल्मिकी, महाभारत रचणारे व्यास किंवा गायत्रीमंत्र निर्मिणारा विश्वामित्र हे ब्राह्मण नव्हते. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. 

७) कौरव पांडव युद्धामध्ये भारताचं क्षात्र तेज लयाला गेलं आणि मनुस्मृतीत सांगितलेली शिस्त बिघडायला लागली. त्यातूनच पुढे बौद्ध धर्मासारखे पर्याय उभे राहिले. मनुस्मृतीच्या विपर्यस्त आवृत्त्या निघू लागल्या. त्यातूनच एक हजार वर्षांपूर्वी अस्पृश्यता निर्माण झाली. पुढे ब्रिटिशांनी आपली संस्कृती हीन पातळीवरची असल्याचा पद्धतशीर प्रचार करून आपल्या मनात न्यूनगंड निर्माण केला. तुम्ही-आम्ही त्याचेच बळी आहोत. म्हणूनच आज मनुस्मृतीला नि प्रत्येक प्राचीन परंपरेला शिव्या देत राहिलो आहोत. 

८) मूळ मनुस्मृती आणि तिची विपर्यस्त आवृत्ती याविषयी डॉ. बाबासाहेबांना कल्पना असावी असं मनुस्मृतीदहन कार्यक्रमाच्या प्रसंगी घेतल्या गेलेल्या शपथेवरून दिसतं.         
२५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाड इथे बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं त्यावेळी दलित बांधवांना बाबासाहेबांनी खालील शपथ घ्यायला लावली होती :
अ) मी जन्माधिष्ठित चातुर्वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवत नाही.
ब)  मी जातीभेदांवर विश्वास ठेवत नाही. 
क) अस्पृश्यता हे हिंदुत्वावरील लांच्छन असून ते नाहीसं करण्याचा मी प्रयत्न करीन. 
ड) समानतेच्या सूत्रानुसार हिंदू समाजात वावरताना मी खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठलेही बंधन पाळणार नाही. 
इ) अस्पृश्यांना देवळे, पाणवठे, शाळा आणि अन्य सर्व बाबतीत समान हक्क मिळाले पाहिजेत अशी माझी ठाम धारणा आहे. 
यावर खालीलप्रमाणे भाष्य करता येईल :
एक, बाबासाहेबांचा विरोध जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेला होता, मूळ मनुस्मृतीला अभिप्रेत असलेल्या गुणकर्माधिष्ठित वर्णव्यवस्थेला होता असं दिसत नाही. 

दोन, मूळ मनुस्मृतीच्या काळात आणि त्यानंतरही हजारो वर्षांत जाती अस्तित्वात आल्या नव्हत्या. कारण अर्यांमध्ये जातीव्यवस्था नव्हती. त्यांनी स्थानिक अनार्यांकडून घेतली. त्यामुळे जातीभेदांचा संबंध मूळ मनुस्मृतीशी जोडता येणार नाही.  

तीन, अस्पृश्यता अलीकडच्या एक हजार वर्षातली आहे. त्याबद्दल आठ हजार वर्षांपूर्वीच्या मूळ मनुस्मृतीला दोषी धरण्यात अर्थ नाही. 

चार, खाण्यापिण्याच्या बाबतीत मूळ मनुस्मृतीने शूद्रांना कुठलंही बंधन घातलेलं नाही. उलट ब्राह्मणांनाच काही बंधने घातलेली आहेत.

पाच, देवळे- पाणवठे- शिक्षण वगैरे बाबतीत मूळ मनुस्मृतीने सर्वाना समान हक्क आणि संधी देऊ केलेली आहे. तसं नसतं तर ब्राह्मण नसलेल्या कृष्ण द्वैपायन व्यासाला वेदांचं संकलन आणि वर्गीकरण करता आलंच नसतं आणि अनेक शूद्रांना वेदांचे मन्त्रवक्ते बनायला विरोध केला गेला असता.  
९) हे सगळं लक्षात घेता अशी भावना होते की सर्व जातीजमातींच्या अभ्यासू प्रतिनिधींची एक समिती नेमून आज उपलब्ध असलेला मनुस्मृती हा ग्रंथ (प्रक्षिप्त श्लोक वगैरे काढून) शुद्ध केला पाहिजे आणि भारताचा एक अभिमानास्पद राष्ट्रीय ग्रंथ म्हणून त्याचं जतन कसं होईल हे पाहिलं पाहिजे.    

('आर्यभारत' या माझ्या आगामी पुस्तकातून)                 

No comments: