Sunday, December 5, 2021

आदी शंकराचार्यांचा काळ 

देशभरातील बौद्ध धर्माचा प्रभाव हटवून आदी शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली असं सामान्यतः मानलं जातं. गोनंद (तिसरा) हा राजा काश्मीरच्या गादीवर येण्यापूर्वीच बौद्धांचा वैदिक हिंदू धर्मीयांना किती जाच सुरु झाला होता हे काश्मीरचा इतिहासकार कल्हण याने  'राजतरंगिणी' ग्रंथात नमूद केलं आहे. (तरंग १, श्लोक १७७ ते १८४). अशा परिस्थितीत केरळातील पेरियार अथवा पूर्णा नदीच्या काठी कालडी (किंवा कालटी) गावात जन्मलेल्या शंकराचार्यांनी वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी देशभर प्रवास केला, अनेक विद्वानांना वादांमध्ये पराभूत केलं आणि तत्कालीन राजेरजवाड्यांना परत एकदा हिंदू धर्माची दीक्षा दिली. त्याचबरोबर देशाच्या चार कोपऱ्यांमध्ये खालील चार पीठे स्थापन करून हिंदू धर्म शाश्वत जिवंत राहील याची काळजीही घेतली.   १. दक्षिणेला यजुर्वेद प्रधान शृंगेरी शारदा पीठम  २. उत्तरेला अथर्ववेद प्रधान बदरी ज्योतिर्मय पीठम  ३. पूर्वेला ऋग्वेद प्रधान पुरी गोवर्धनमठ पीठम  ४. पश्चिमेला सामवेद प्रधान द्वारका शारदा पीठम             भारताच्या व हिंदू धर्माच्या दृष्टीने इतकं महत्वाचं कार्य करणाऱ्या शंकराचार्यांचा नेमका काळ मात्र अजूनही ठरवता आलेला नाही. केवळ बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शंकराचार्यांचे वेगवेगळे काळ ठरवले गेले आहेत ते खालीलप्रमाणे; १. द्वारका पीठ आणि गोवर्धन पीठ इथे असलेल्या पूर्वापार नोंदींप्रमाणे शंकराचार्यांचा काळ इ. स. पूर्व ५०९ ते इ. स. पूर्व ४७७ हा आहे. पण हा काळ चुकीचा आहे हे पुढील उहापोहावरून लक्षात येईल. काश्मीरमध्ये दाल लेकजवळ शंकराचार्यांच्या नांवाची एक टेकडी आहे. या टेकडीवरील मंदिरालाही शंकराचार्यांचं मंदिर असंच म्हटलं जातं. पण मुळात ते ज्येष्ठेश्वराचं (म्हणजे शिवशंकराचं) मंदिर असून आदी शंकराचार्यांनी त्याला भेट देऊन त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळेच  त्याला 'शंकराचार्य मंदिर' असं संबोधलं जाऊ लागलं. हे ज्येष्ठेश्वर मंदिर काश्मीरचा राजा गोपादित्य याने बांधल्याचं कल्हण याने 'राजतरंगिणी' ग्रंथात निःसंदिग्धपणे म्हटलं आहे. (तरंग १, श्लोक ३४१) त्यानेच नमूद केल्याप्रमाणे गोपादित्याचा काळ इ. स. पूर्व ३६९ ते इ. स. पूर्व ३०९ हा येतो. याचा अर्थ शंकराचार्यांचा काळ त्यानंतरचा असणार हे उघड आहे. त्यामुळे इ. स. पूर्व ५०९ ते ४७७ हा काळ चुकीचा ठरतो.  २. १३ व्या शतकातील भाष्यकार आनंदगिरी यांनी शंकराचार्यांचा जन्म इ. स. पूर्व ४४ व मृत्यू इ. स. पूर्व १२ मध्ये झाल्याचं म्हटलं आहे. पण त्याचा कुठलाही आधार त्यांनी दिलेला नाही.          ३. डॉ. रामकृष्ण भांडारकर यांनी शंकराचार्यांच्या जन्माचा काळ इ.स. ६८० असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. पण या अंदाजालाही भक्कम आधार नाही.     ४. मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी इ. स. ७८८ ते ८२० हा काळ नक्की केला आहे.   वरीलपैकी कुठल्याही काळाला ठोस असा आधार नाही. त्यामुळे शंकराचार्यांचा नक्की काळ समजणं कठीण झालं आहे.               आदी शंकराचार्यांची मुख्यतः खालील चार प्राचीन चरित्रसाधने उपलब्ध आहेत.       अ) 'शंकर दिग्विजय'.       ब) व्यासावलकृत 'शंकर विजय'.       क) आनंदगुरु रचित 'शंकर विजय'.       ड) माधवाचार्य रचित 'शंकर विजय'.  ही सर्व चरित्रे संस्कृत भाषेत असून त्यापैकी कुठल्याही चरित्रात शंकराचार्यांचा काळ दिलेला नाही. मराठीत शंकराचार्यांची दोन जुनी चरित्रे उपलब्ध आहेत. एक, महादेव राजाराम बोडस यांचं 'श्री शंकराचार्य व त्यांचा संप्रदाय' (१९२३) आणि दुसरं, रामचंद्र गोविंद कोलंगडे लिखित 'श्री जगद्गुरू आद्य शंकराचार्य' (१९६६). या चरित्रांमध्ये काही तत्कालीन राजांची नांवे आली आहेत. हे राजे असे; १. केरळ नरेश राजशेखर (पृ. २ व ५०, कोलंगडे.) :- याचा उल्लेख स्वतः शंकराचार्यांनी 'शिवानंदलहरी' तील ७० व्या श्लोकात 'अगणित फलदायकः प्रभुर्मे, जगदधिको हृदि राजशेखरोस्ति' असा केला आहे. या नांवाचे दोनतीन प्रसिद्ध राजे सापडतात पण त्यांचा काळ बराच नंतरचा- म्हणजे ९ व्या शतकापासून पुढचा आहे. उदाहरणार्थ, राम राजशेखर या मध्य केरळमधील कोडांगलूर येथील चेर राजाचा काळ इ. स. ८७० ते ८८३ हा आहे. पंडालम येथील दुसरा एक पांड्य राजा राजशेखर वर्मा याचा काळ इ. स. ९०३ पासून सुरु होतो. संशोधकांनी साधक बाधक विचार न करता शंकराचार्यांची सांगड यापैकी एका राजाशी घालायचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या मते शंकराचार्यांना भेटलेला राजशेखर हा एक लहानसा स्थानिक राजा असावा.  २. कर्नाटक प्रांतातील राजा व शंकराचार्यांचा शिष्य सुधन्वा (पृ. ११९ व २२६, कोलंगडे.) :- या राजाच्या ताम्रपटात युधिष्ठिर शक २६६३ चा (म्हणजे इ. स. पूर्व ४७६) उल्लेख आल्याचं राजराजेश्वर कृत 'विमर्श' मध्ये पृष्ठ ३२ नमूद केल्याचं बोडस यांनी म्हटलं आहे. हे राजराजेश्वर पुढे स्वतः द्वारकापीठाचे शंकराचार्य बनले. परंतु, ते म्हणतात तो ताम्रपट कुठेच उपलब्ध नसल्यामुळे या माहितीवर विश्वास ठेवता येत नाही.          ३. कांची येथील राजा राजसेन (पृ. २२९, कोलंगडे.) :- अशा नांवाचा राजा मला तरी सापडला नाही. हाही कदाचित एखादा लहानसा तत्कालीन संस्थानिक असावा.     ४. नेपाळ नरेश शिवदेव (पृ. २५६, कोलंगडे.) :- नेपाळच्या शिवदेव (पहिला) या लिच्छवी राजाचा काळ इ. स. ५९० ते ६०५ हा आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरीस शंकराचार्य नेपाळमध्ये गेले होते व या राजाशी त्यांची भेट झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. जर शिवदेव याचा काळ बरोबर असेल व हाच तो शिवदेव असेल, तर शंकराचार्यांचा काळही नक्की होतो असं म्हणावं लागेल.  ५. महिष्मती जवळील प्रदेशाचा राजा अमरु किंवा  अमरुका (पृ. १७४, कोलंगडे.) :- एका वादाच्या निमित्ताने मंडनमिश्र यांची पत्नी शारदा हिने शंकराचार्यांना कामजीवनाविषयी काही प्रश्न विचारले.  तेव्हा बालब्रह्मचारी असलेल्या शंकराचार्यांना त्यावर काही बोलता आलं नाही. म्हणून त्यांनी मुदत मागून घेतली व राजा अमरु याच्या विलासमहालात राहून सहा महिने त्यांनी कामजीवनाचा अभ्यास केला. नंतर शारदा हिला भेटून त्यांनी तिला वादात पराभूत केलं अशी आख्यायिका आहे. (या विषयावर 'अमरु शतक' नामक शृंगारिक ग्रंथही शंकराचार्यांच्या नांवावर आहे.) पण अमरु नांवाचा राजा सापडत नाही. मात्र महिष्मतीवर इ. स. ५७५ ते ६०० या काळात राज्य करणारा एक कलचुरी राजा स्वतःला 'शंकरगण' म्हणजे 'शंकराचा शिष्य' असं म्हणवून घेतो. यातील 'शंकर' म्हणजे शंकराचार्य असण्याची शक्यता आहे व तसं असेल तर हा राजा अमरु असू शकेल. याचा काळही नेपाळ नरेश शिवदेव याच्या काळाशी जुळतो.             वरील निष्कर्षाला पाठबळ देणारा आणखी एक पुरावाही देता येईल. शृंगेरी पीठाचे सध्याचे शंकराचार्य श्री. भारती तीर्थ हे त्या पीठाच्या दाव्यानुसार त्यांचे सलग ३६ वे शंकराचार्य आहेत. २०२१ साली यांच्या कारकिर्दीला ३२ वर्षं पूर्ण झाली व ते अजूनही विद्यमान आहेत. त्यापूर्वीच्या तीन शंकराचार्यांचा काळ असा होता :  -३५ वे शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ (१९५४-१९८९) = ३५ वर्षं  -३४ वे शंकराचार्य चंद्रशेखर भारती तिसरे (१९१२-१९५४) = ४२ वर्षं  -३३ वे शंकराचार्य नृसिंह भारती (१८७२-१९१२) = ४० वर्षं   यावरून एका शंकराचार्यांची कारकीर्द सरासरी ४० वर्षं धरायला हरकत नसावी. त्याप्रमाणे गणित केल्यास ३५ शंकराचार्यांची कारकीर्द १४०० वर्षांची येते. (३५ x ४०). १९८९ पासून १४०० वर्षं मागे गेल्यास इ. स. ५८९ हे वर्ष मिळतं. हा काळ शंकरगण आणि शिवदेव या राजांच्या काळाशी जुळतो. त्यामुळे इ. स. च्या ६ व्या शतकाचा उत्तरार्ध हाच आदी शंकराचार्यांचा काळ असावा असा निष्कर्ष काढता येतो. - हर्षद सरपोतदार   

Thursday, March 4, 2021

इथे मूलनिवासी कुणीही नाही !   

वैदिक आर्य बाहेरून भारतात आले की मूळचे भारतातीलच होते हा एक कायमचा वादाचा विषय बनला आहे. याचा गैरफायदा उठवून काही लोक विशिष्ट जातिसमूहाला 'तुम्ही मूलनिवासी नाही, तुम्ही बाहेरून आलात' असं हिणवून समाजात दुफळी माजवायचा प्रयत्न करत असतात. याउलट हिंदुत्ववादी लोक सर्वशक्तीनिशी आपण भारतातील मूलनिवासी असल्याचा दावा करत असतात. हे असले वाद म्हणजे या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या अडाणीपणाचे द्योतक आहेत. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या 'फोडा आणि झोडा' धोरणाचाच हा परिणाम आहे. मध्यंतरी माझ्याकडे 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' या शीर्षकाचं एक लहानसं चोपडं 'भारतीय विचार साधना' या संस्थेकडून कुणीतरी आणून दिलं; त्यातही डॉ. आंबेडकरांचा दाखला देऊन आर्य हे मुळात इथलेच कसे आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आढळला. (पृ. २५) माझ्या मते मूलनिवासी असल्याचा किंवा नसल्याचा हा भयगंड अकारण बाळगला जात आहे. याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे,   १. आधुनिक विज्ञानातील सिद्धांताप्रमाणे सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज जो Homo Erectus या नांवाने ओळखला जातो, तो आफ्रिकेतून भारतीय उपखंडात आला. त्यानंतर अंदाजे ५५,००० वर्षांपूर्वी पहिला आदिमानव (Homo Sapiens) याचं आफ्रिकेतूनच भारतात आगमन झालं. दरम्यान कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे किंवा आदिमानवासह झालेल्या संघर्षांमुळे Homo Erectus नामशेष झाला. असं असलं तरी आदिमानवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचे पुरावे मात्र ३०,००० वर्षांपलीकडे सापडत नाहीत. त्यापूर्वी भारतात मानवप्राणी नव्हता. (Page 1, 'A Population History of India') याचा अर्थ उघड आहे; की आर्य असोत, अनार्य असोत वा तथाकथित आदिवासी असोत, भारतात सर्वच उपरे आहेत.       २. डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्या प्रतिपादनानुसार आर्य हे बाहेरूनच आले. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. (Page 49-50, 'The Aryan Problem') मात्र त्यांनी कालनिश्चिती केलेली नाही. मी स्वतः ती केली असून आर्य इ. स. पूर्व ७८०० च्या सुमारास कश्यप समुद्राकडून (Caspian Sea) भारतात आले असा सिद्धांत मांडला आहे आणि तेव्हापासून यादवकाळापर्यंतचा राजकीय आणि सांस्कृतिक हिशेब नांवानिशीवार लावून दाखवला आहे. ('आर्यभारत खंड १ व २')  ३. आर्य भारतात आले तेव्हा इथे पणि, दास, यक्ष, नाग, याक, अज, शीघ्र, मुंड, भिल्ल, गोंड, व्रात्य वगैरे अनार्य जमाती आधीच स्थायिक झाल्या होत्या. आर्यांच्या आगेमागे असुर, गंधर्व, किन्नर, हस्ती, गो, कुकुर, काक इत्यादी लोक आले. (Page 83-84, 'Riddle' -11 by Dr. Ambedkar)  या सर्व जमाती कालांतराने आर्यांच्या वैदिक हिंदू धर्मात आपापल्या संस्कृतीसह विलीन होत गेल्या. ४. पुढल्या काळात शक, हूण, कुशाण, ग्रीक, पर्शियन आदी लोक भारतात आले आणि कालांतराने इथला धर्म स्वीकारून इथल्या संस्कृतीत विरघळून गेले. ही प्रक्रिया इतक्या बेमालूमपणे पार पडली की आज आपल्या धमनीत वाहणारं रक्त कुणाचं आहे, आपण नेमकी कुठली संस्कृती आचरत आहोत आणि कुणाच्या देवता पूजत आहोत हे सांगणं अशक्यप्राय आहे. एकप्रकारे हे समरस्य आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.    ५. निव्वळ महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तरी असंच आढळतं, की महाराष्ट्रातही मूलनिवासी कुणीही नव्हता आणि नाही. वि. का. राजवाडे यांच्या 'महाराष्ट्राची वसाहत' आणि 'महाराष्ट्र व उत्तर कोकणची वसाहत' या दोन लेखांत नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वप्रथम गुहेमध्ये राहणारे 'कातवडी' लोक अंदाजे चार हजार वर्षांपूर्वी आले. त्यानंतर नाग, वारली, कोळी आणि ठाकर हे आले. (पृ. १५२, 'राजवाडे लेखसंग्रह') पुढे मगधातील बौद्ध क्रांतीला कंटाळून तेथील चातुर्वर्ण्ययुक्त 'महाराष्ट्रिक' लोक दक्षिण अरण्यात शिरले. मागोमाग कुरुपांचाल प्रदेशातील 'राष्ट्रिक' हेही येते झाले. काही काळाने उत्तरकुरु आणि उत्तरमद्र येथील विराटाच्या राज्यातले 'वैराष्ट्रीक' जानपद सुद्धा महाराष्ट्रात आले. (पृ. ११८-११९, 'राजवाडे लेखसंग्रह') या सर्व लोकांचं एकत्रीकरण होऊन सध्याचे मराठी लोक कसे बनले याचं सविस्तर विवेचन राजवाडे यांनी अनेक संदर्भ देऊन या दोन लेखांमध्ये केलं आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही कुणाला 'मूलनिवासी' म्हणता येणार नाही. आपण सगळे इथेही उपरेच आहोत. तेव्हा यापुढे असले वाद घालणं संबंधितांनी बंद करावं हे बरं.                                                               संदर्भ :- १. 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' - रवींद्र साठे - भारतीय विचार साधना, पुणे, २००५.  २. 'A Population History of India' - Tim Dyson - Oxford University Press, UK, 2018.  ३. 'The Aryan Problem' - Editors Deo & Kamath - Bharatiy Itihas Sankalan Samiti, Pune, 1993. ४. 'आर्यभारत खंड १ व २' - हर्षद सरपोतदार - विहंग प्रकाशन, पुणे, २०१६ व २०१८.      ५. Volume IV, Dr. Ambedkar, Writings & Speeches, Govt. of Maharashtra, 1987.  ६. 'राजवाडे लेखसंग्रह' - सं. लक्ष्मणशास्त्री जोशी - साहित्य अकादमी, नवी दिल्ली, २००७. 

Thursday, December 17, 2020

कुतुबमिनार, की हिंदू विजयस्तंभ ?

 भा.ज.प. चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य भा.ज.प. चे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी हे एक लेखक आणि इतिहास अभ्यासकही आहेत. 'कुतुब मिनार - भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार' नामक त्यांचं पुस्तक (प्रकाशक- विराट प्रकाशन, पुणे.) अलीकडेच वाचनात आलं. त्यात त्यांनी कुतुब मिनार हा मुसलमानी मिनार नसून भारतीय हिंदू परंपरेतील विजयस्तंभ असावा अशी शंका प्रदर्शित केली आहे. त्यांचं म्हणणं थोडक्यात खाली मांडतो. 

१. कुतुब मिनार हा कुतुबुद्दीन ऐबक याने ११९३ साली हिंदुस्थानवरील स्वतःच्या विजयाचं स्मारक म्हणून बांधला असं आपल्याला शालेय इतिहासापासून शिकवलं जातं. पण हा स्तंभ आणि त्या परिसरातील इमारती मुसलमानी आक्रमण होण्यापूर्वीपासूनच तिथे उभ्या असल्याच्या वस्तुस्थितीला पुरावे आहेत. 

२. कुतुबुद्दीन ऐबक हा महंमद घोरी याचा आधी गुलाम आणि नंतर सेनापती होता. ११८० साली भारतात स्वारीच्या निमित्ताने आलेला कुतुबुद्दीन ११८६ मध्ये अफगाणिस्तानात परत गेला. १२०६ साली घोरीचा खून करून 'बादशाह' म्हणून तो भारतात परत आला आणि लवकरच १२१० साली त्याचा मृत्यू झाला. लाहोर ही त्याची राजधानी होती, त्याचा राज्याभिषेकही लाहोरला झाला आणि त्याचा मृत्यूही तिथेच झाला. या सगळ्या घटनाक्रमात कुतुब मिनारसारखं भव्य बांधकाम करण्याचं वेळापत्रक कसं जुळतं हे आजपर्यंत कुठल्याही इतिहासकाराने उलगडून दाखवलेलं नाही. त्याचप्रमाणे लाहोर आणि दिल्ली यांचा मनोरा बांधण्यापुरता काय संबंध? याचाही खुलासा कुणी केलेला नाही.   

३. मुहंमद घोरीने पृथ्वीराज चौहानवरील विजयाचं स्मारक म्हणून हा मिनार बांधायला घेतला असं काही 'मान्यवर' इतिहासकार सांगतात. पण घोरीने पानिपतजवळ तराई या ठिकाणी पृथ्वीराजचा पराभव केला असताना हा मनोरा दिल्लीजवळ का उभारला? आणि त्याचं नांव 'घोरी मनोरा' न ठेवता 'कुतुब मिनार' ठेवण्याचं कारण काय? या प्रश्नांचीही उत्तरे कुणी दिलेली नाहीत. 

४. मुळात दानस्तंभ किंवा विजयस्तंभ उभारण्याची परंपरा हिंदूंमध्ये आहे (उदा मौर्य किंवा गुप्त सम्राटांचे स्तंभ.) तशी मुसलनांमध्ये असल्याचं दिसत नाही. मशिदीला मनोरे असतात पण ते मशिदीपेक्षा उंच नसतात. कुतुब मिनारच्या परिसरातही (तथाकथित) मशीद आहे. पण त्या मशिदीपेक्षा हा मनोरा उंच कसा? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही. 

५. इब्न बतूता हा सुप्रसिद्ध मोरोक्कन प्रवासी इ. स. १३३३ ते १३३७ या काळात भारतात मोहंमद तुघलकच्या दरबारात न्यायाधीश म्हणून काम करत होता. तो या मिनारविषयी आपल्या पुस्तकात म्हणतो, 'हा स्तंभ कुणी उभा केला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही.' बतूता याने काही वेळा कुतुबुद्दीन ऐबक याचा उल्लेखही पुस्तकात केला आहे. पण हा मनोरा त्याने बांधला असं चुकूनही तो म्हणत नाही किंवा या मनोऱ्याचा 'कुतुब मिनार' असा उल्लेखही करत नाही. 

६. वस्तुस्थिती अशी आहे, की या मनोऱ्याचा 'कुतुब मिनार' असा पहिला उल्लेख सर सय्यद अहमद खान (१८१७-१८९७) यांनी १८५२ साली लिहिलेल्या 'असर-उस-सानादीद' नामक प्रबंधात प्रथम केला. गंमत म्हणजे या प्रबंधात 'ही इमारत व हा मनोरा हिंदूंचा असून पृथ्वीराज चौहान याने आपल्या मुलीसाठी हा मनोरा बांधवून घेतला' असं विधान त्यांनी केलं आहे. आणि तरीही ते त्याला 'कुतुब मिनार' का म्हणत आहेत याचा खुलासा होत नाही. अर्थात त्यांच्या कुठल्याच विधानाला त्यांनी कसलाही आधार किंवा संदर्भ सदर प्रबंधात दिलेला नाही.

७. कुतुब मिनारच्या आवारातील तथाकथित मशिदीचं बांधकाम अर्धवट अवस्थेतच आहे व त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर हिंदू मंगलकलशाचं चिन्ह कोरलेलं आहे. एवढंच नव्हे, तर त्या इमारतीत आणि संपूर्ण आवारात गणपती, महावीर, शिव-पार्वती, यक्ष, अप्सरा, सवत्स धेनू, घंटा, गोमुख अशी शेकडो हिंदू चिन्हे आणि मूर्ती कोरलेल्या आढळतात. खुद्द मनोऱ्याच्या भिंतीवरही वेलबुट्टी, साखळ्या, घंटा अशा हिंदू चिन्हांबरोबरच संस्कृतमधील मजकूरही आढळतो. 'घंटा' ही मुसलमानी परंपरेत निषिद्ध असून ते सैतानाचं वाद्य समजलं जातं. पण विरोधाभास म्हणजे या मनोऱ्याच्या व मशिदीच्या भिंतीवर सर्वत्र अनेक घंटा कोरलेल्या दिसून येतात. 

८. या मिनाराजवळ असणाऱ्या ज्या बांधकामाला सध्या 'मशीद' म्हणून संबोधलं जातं, तो वास्तविक हिंदू सभामंडप आहे हे हिंदूंच्याच नव्हे, तर तिथे फिरणाऱ्या परदेशी पर्यटकांचाही लक्षात आल्याशिवाय रहात नाही. कारण संपूर्ण वास्तुरचना व त्यावर कोरलेली चिन्हे ही पूर्णपणे हिंदू पद्धतीचीच आहेत. त्याचप्रमाणे ज्याला 'सराई' म्हटलं जातं असा तेथील भागसुद्धा कुठल्याही हिंदू परंपरेतील धर्मशाळेच्या ओवऱ्यांप्रमाणेच असून त्यावरही कित्येक हिंदू चिन्हे कोरलेली आहेत. 

९. आश्चर्याची बाब म्हणजे या परिसरात नेहरूंच्या काळात पुरातत्व विभागाने लावलेला एक फलक असून त्यावर 'कुतुबुद्दीन ऐबक याने २७ हिंदू व जैन मंदिरे उध्वस्त करून व त्या सामुग्रीचा वापर करून त्याच जागी हा मनोरा बांधला !' असं निःसंदिग्ध शब्दांमध्ये लिहून ठेवलं आहे. हिंदूंचा या मनोऱ्याशी असलेल्या निकटच्या संबंधांची ही एकप्रकारे कबुलीच आहे.      

१०. प्रा. एम. एस. भटनागर या संशोधकांनी १९६१ पासून सतत १५ वर्षं या मनोऱ्याचा आणि त्या परिसराचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे, की दिल्लीजवळचा 'मेहरौली' हा परिसर प्राचीन काळी सम्राट विक्रमादित्याच्या राजधानीचं ठिकाण होतं व सुप्रसिद्ध गणिती वराह मिहीर हा त्याच्या पदरी होता. (मिहीर वरूनच मेहरौली नांव पडलं.) हा मनोरा म्हणजे 'विष्णुस्तंभ किंवा ध्रुवस्तंभ' या नांवाने ओळखला जाणारा अवकाश निरीक्षणासाठी बांधलेला त्याच्या वेधशाळेचा भाग होता. विमानातून पाहिल्यास मनोऱ्याच्या माथ्यावर २४ पाकळ्यांचं कमळ स्पष्टपणे दिसतं असा दावा भटनागर यांनी केला आहे. 

वर दिलेल्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर माधव भांडारी यांचा हा दावा आधुनिक अभ्यासकांनी पुन्हा एकदा तपासून पाहणं अगत्याचं आहे.  

Wednesday, November 25, 2020

एक महत्वाचा दुर्लक्षित शक : सीरियन शक 

 माझ्या मते प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना अभ्यासकासाठी सीरियन शकाचा (Syrian Saka) संदर्भ लक्षात घेणं अपरिहार्य आहे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. त्यामुळे इतिहासाच्या मांडणीत मूलगामी चुका आढळतात. खालील विवेचनावरून हे स्पष्ट होईल.   


१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी जेव्हा भारताचा कलकत्ता वगैरे प्रदेश बळकावला होता तेव्हा भारतात मुख्यतः खालील चार शक अस्तित्वात होते,
अ) युधिष्ठिर शक किंवा युगाब्ध - इ. स. पूर्व ३१०१ पासून चालू. 
ब) सीरियन शक - इ. स. पूर्व ५५७ पासून चालू. 
क) विक्रम संवत - इ. स. पूर्व ५७ पासून चालू. 
ड) शालिवाहन शक - इ. स. ७८ पासून चालू. 

२. इंग्रजांचा इसवी सन मुळात ६ व्या शतकात सेंट डेनिस नामक माणसाने अंदाजातून निर्माण केला व त्याचा प्रत्यक्ष वापर इंग्लंडमध्ये ८ व्या शतकात हळूहळू सुरु झाला. भारतात हा सन इंग्रजांचं राज्य येईपर्यंत अजिबात वापरला जात नव्हता. (तपशील पहा- पृष्ठ १४-१५, 'आर्यभारत खंड १'.)     

३. वर दिलेल्या शकांपैकी सीरियन शक हा पर्शियन सम्राट सायरस द ग्रेट याने चालू केला होता व पुढे कित्येक शतके तो भारतासकट संपूर्ण आशियात वापरला जात होता. कारण  अनेक देशांमध्ये पर्शियन सम्राटाची राजवट चालू राहिली होती. सायरसनंतरचा सम्राट डोरियस याच्या 'बेहिस्तून' शिलालेखावर नजर फिरवली तरी त्या काळातील किमान तेवीस देशांवर त्याची सत्ता होती याचे दाखले मिळतात. (तपशील पहा- पृष्ठ ६५-६६,'आर्यभारत खंड ३'.) एवढ्या विशाल साम्राज्याची व्यवस्था पाहणं सुलभ व्हावं म्हणून कोणता तरी एकच शक वापरणं आवश्यक होतं व सीरियन शक हाच तो शक होता. (पहा- प्रा. हरगोविंद होले लिखित 'महाभारत कालगणनेतील षडयंत्र'.)      

४. वरील निष्कर्षाला 'नवरोज' मुळे पुष्टी मिळते. इराणी नववर्ष दिनाला 'नवरोज' (Nowruz) असं म्हणतात. सायरस याने ज्या दिवशी त्याच्या साम्राज्याची स्थापना केली त्या दिवसापासून नवरोज सुरु झाला असं मानलं जातं. दर वर्षी २१ मार्च या दिवशी नवरोज साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे २०२० साली २५७९ हे नवरोज वर्ष आहे. याचा अर्थ इसवी सनापूर्वी ५५९ व्या वर्षी सायरस याने स्वतःचा शक स्थापन केला असा होतो. (दोन वर्षांचा जो फरक पडला आहे त्याचं कारण म्हणजे या पर्शियन पंचांगाप्रमाणे ३६० दिवसांचं एक वर्ष धरलं जातं व ऋतूंप्रमाणे दिवस जुळवून घेण्यासाठी प्रत्येक सहा वर्षांनी तेरावा महिना घातला जातो.) आजही इराण, इराक, जॉर्जिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान, उझबेकस्तान, किर्गिझस्तान, पाकिस्तान, भारत वगैरे वीस एक देशांमध्ये हा नववर्ष दिन 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होत असतो.  यावरून पूर्वापार सीरियन शकाचा प्रभाव किती विशाल भू भागावर पडला होता याची कल्पना येते.         

५. याच काळात इ. स. पूर्व ४४९ ते इ. स. पूर्व ३४३ या १०६ वर्षांच्या काळात मगध राज्य पर्शियन साम्राज्याचा भाग बनला होता. (पहा: विष्णुपुराण ४-३४.) पुराणांमध्ये या पर्शियन राजांना 'यवन राजे' म्हटलं आहे. पश्चिमेकडून येणारे ते सर्व यवन अशी समजूत त्या काळी प्रचलित झाली असावी. या १०६ वर्षांच्या राजवटीमुळे भारतातही सीरियन शक वापरला जाऊ लागला. ११ व्या शतकात भारतात आलेला अरबी विद्वान अलबेरुनी गुप्तांची कारकीर्द शके २४१ च्या सुमारास सुरु झाली असं म्हणतो तेव्हा त्याला सीरियन शकच अभिप्रेत असतो. कारण शालिवाहन शक वगैरे त्याला माहीत असण्याचा मुळीच संभव नव्हता. त्याचप्रमाणे कनिष्काचा काळ शके ७८ हा होता असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ सीरियन शकाच्या ७८ व्या वर्षाचा तो उल्लेख असतो. पण इंग्रज विद्वानांनी जाणूनबुजून हा उल्लेख शालिवाहन शकाचा किंवा इसवी सनाचा ठरवून भारतीय इतिहास शेकडो वर्षांनी पुढे ओढण्याचा नादानपणा केला.

६. भारताच्या प्राचीन इतिहासाचा काळ पुढे ओढण्याचा उपक्रम इंग्रजांनी एकाच कारणासाठी केला व ते कारण म्हणजे बायबलमध्ये जगाची उत्पत्ती ख्रिस्तापूर्वी केवळ ४००४ वर्षांपूर्वी झाली असा अडाणीपणाचा सिद्धांत मांडला होता. (पहा- जेनेसिस १) तो खोटा ठरू नये म्हणून ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजांनी राज्य केलं, त्या त्या देशांमध्ये त्यांनी ऐतिहासिक घटनांचे काळ पुढे तरी ओढले किंवा त्या घटनाच दाबून टाकल्या. यामुळेच महावीर, बुद्ध, मौर्य, कनिष्क, गुप्त, हर्षवर्धन इत्यादींचे काळ सातशे ते हजार-बाराशे वर्षांनी पुढे दाखवले गेले आहेत व पुराणांमधील काळांशी ते जुळत नाहीत.

७. 'सीरियन शक' असा शब्दप्रयोग अद्याप तरी भारतीय वाङ्मयामध्ये मिळालेला नाही. कदाचित त्याला नुसतंच 'शक' म्हणून संबोधलं जात असावं किंवा नुसतेच आकडे नमूद केले असावेत. मात्र 'सीरिया' या प्रदेशाला आणि 'सीरियन' या संबोधनाला प्राचीन काळी फार महत्व होतं. आजच्या सीरिया, इराक, इराण वगैरे मेसापोटेमियातील विस्तीर्ण प्रदेशांत सुमेरियन, खाल्डियन, असुरियन, बॅबिलोनियन, नव-असुरियन वगैरे राजवटी होऊन गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय आणि भौगोलिक संदर्भ कायम बदलत राहिले होते. सायरस याने मोडकळीला आलेलं नव-असुरियन साम्राज्य संपवून बॅबिलोन या ठिकाणी आपली राजधानी केली. हे ठिकाण सध्या प्राचीन सुमेर किंवा सीरिया व आधुनिक इराक यांच्या दरम्यान आहे. यामुळेच पर्शियन सम्राटांना सीरियन राजे म्हटलं जात असावं. त्याचप्रमाणे सायरस याने चालू केलेल्या वरील शकाला 'सीरियन शक' हे नांव पडलं असावं. कारण असिरियन शक नामक एक शक त्यापूर्वी अस्तित्वात होता. सीरियन शकाची पार्श्वभूमी ही अशी आहे.                            

दुर्दैवाची गोष्ट अशी, की तत्कालीन भारतीय इतिहासकारांचा इंग्रजांच्या बनावट कालगणनेवर एवढा अंधविश्वास बसला, की आजही तीच बनावट कालगणना समोर ठेवून इतिहासाची चर्चा केली जात असते. आज सीरियन शक फारसा कुणाला माहीत नसण्याचं हेच मुख्य कारण आहे. निदान यापुढे  तरी प्राचीन शिलालेखावरील वा नाण्यावरील शकाचा विचार करताना तो सीरियन शक तर नसेल ना हा विचार इतिहासाचे अभ्यासक करतील अशी आशा व्यक्त करतो. अन्यथा चुकीच्या कालगणनेवर आधारित निरर्थक ग्रंथ आणि पीएचड्या निर्माण होतच राहतील यात शंका नाही. 

Saturday, August 8, 2020

रामजन्मभूमी वादातील खरे खलनायक  

पुरातत्व खात्याचे भूतपूर्व संचालक डॉ. के. के. मुहंमद यांनी मल्याळम भाषेत आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याचा 'मै भारतीय हूं !' हा हिंदी अनुवाद प्रभात प्रकाशन नामक संस्थेने प्रकाशित केला आहे. या आत्मचरित्राचा इंग्रजी किंवा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे का याची मला माहिती नाही. पण महाजालावर वाचायला मिळतं त्याप्रमाणे डॉ. मुहंमद यांनी या आत्मचरित्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, की हिंदू आणि मुसलमानांमध्ये रामजन्मभूमीचा प्रश्न परस्पर सौहार्दाने सुटण्याच्या बेतात असताना प्रत्येक वेळी मार्क्सवादी विचारसरणीच्या इतिहासकारांनी त्यात जाणून बुजून मोडता घातला आणि तो प्रश्न चिघळत राहील असं पाहिलं. याबाबतीत रोमिला थापर, बिपीनचंद्र आणि सर्वपल्ली गोपाल या इतिहासकारांनी १९ व्या शतकाच्या पूर्वी मंदिर असल्याचा व ते पाडून मशीद बांधल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा आधारहीन दावा केला होता आणि इरफान हबीब, राम शरण शर्मा, डी. एन. झा, सुरज भान व अथर अली या अन्य डाव्या इतिहासकारांनी त्यांचा हा दावा उचलून धरला होता. या इतिहासकारांनी मुस्लिम पक्षकारांचं एकप्रकारे 'ब्रेन वॉशिंग' च केलं. अनेक डावे राजकीय पक्ष आणि संस्था यांनीही याचा फायदा उठवून हा प्रश्न सुटू नयेत म्हणून सातत्याने प्रयत्न केले. 

  
डॉ. मुहंमद यांच्या म्हणण्यानुसार २०१० साली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू आणि मुसलमान वादी-प्रतिवादींमध्ये हिंदूंनी रामजन्मभूमीची २/३ व मुसलमानांनी १/३ जागा वाटून घेण्याचा तोडगा मान्य होत असताना या डाव्या इतिहासकारांनी पुन्हा एकदा त्यात खो घातला. त्यामुळे त्यावेळीही हा प्रश्न सुटू शकला नाही.    

रामजन्मभूमीवरील उत्खननात जेव्हा हिंदू चिन्हांकित असलेले अनेक खांब मिळू लागले तेव्हा याच इतिहासकारांनी ते बौद्ध- जैन प्रभावाखालील बांधकाम असावं व हिंदू मंदिराचा त्याच्याशी काही संबंध नसावा असा आणखी एक आधारहीन निष्कर्ष हवेत सोडून दिला. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच बिकट होऊन बसला. कारण त्या निमित्ताने काही बौद्ध व जैन दावेदारांनीही या वादात उडी घेतली.              

अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुन्नी वक्फ बोर्डातर्फे जे तथाकथित 'तज्ज्ञ' साक्षीदार सादर करण्यात आले, ते सर्व म्हणजे सुविरा जयस्वाल, सुप्रिया वर्मा, शिरीन रत्नागर आणि जया मेनन हे कुठल्या ना कुठल्या (डाव्या विचारसरणीच्या) संस्थांमार्फत परस्परांशी जोडलेले असून न्यायालयात त्यांनी अत्यंत 'बेजबाबदार' आणि 'आधारहीन' विधाने केल्याचं निरीक्षण न्यायमूर्तीनी निकालपत्रात नोंदवलं होतं.  (संदर्भ -  How Allahabad HC exposed Experts...', Times of India, 9-10-2010.)  

सामाजिक तेढ वाढवणाऱ्या या डाव्या इतिहासकारांनी भारतीय इतिहासाचं आणि समाजाचं अतोनात नुकसान केलं आहे.       

Friday, April 17, 2020

राखीगढीचा 'यू टर्न' 

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. वसंत शिंदे यांनी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक व्याख्यान युट्यूबवर प्रसारित केलं आहे. 'Application of DNA Science to reconstruct authentic early Indian History' हा विषय युट्यूबवर घातला की ते ऐकता-पाहता येतं. या व्याख्यानात राखीगढी येथे झालेल्या संशोधनावर अधिक प्रकाश टाकला आहे. 
१. डॉ. शिंदे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या राखीगढी संशोधनावर ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांची दखल घेतल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. परिणामी त्यावेळी काढलेले काही निष्कर्ष त्यांनी बदलले असल्याचं दिसून येत आहे. ते आता त्यांना 'निष्कर्ष' न म्हणता 'अनुमान' वा 'गट फिलिंग' म्हणत आहेत. 
२. ऑगस्ट २०१८ च्या निष्कर्षांमधील अनेक बाबी त्यांनी या व्याख्यानात गाळल्या वा बदलल्या आहेत. उदा. राखीगढीमधील लोक वैदिक आर्य नव्हते, आर्यांपेक्षा दक्षिण भारतीयांशी वा द्रविडांशी त्यांचं साधर्म्य आहे, ते 'निलगिरी' मधील 'इरुला' जमातीचे असावेत, ते शेतीचं तंत्र पश्चिम आशियातून शिकले होते इत्यादी मुद्दे त्यांनी तेव्हा प्रामुख्याने मांडले होते. (पहा- Economic Times, 13-06-2018 व India Today, 31-08-2018.) पण या व्याख्यनात त्यांनी वेगळेच मुद्दे मांडले आहेत. 
३. या देशातील लोकांचे पूर्वज ११००० वर्षांपूर्वी भारतात आले असं एकीकडे म्हणत असताना डॉ. शिंदे Aryan Invasion Theory नाकारत आहेत हे विसंगत आहे. 
४. राखीगढीमधील सांगाड्यांचे डी. एन. ए., त्यांची भांडीकुंडी, घरे हे हल्लीच्या हरियाणातील लोकांच्या जीवनशैलीशी जुळत आहे असं आता डॉ. शिंदे म्हणत आहेत. मग 'इरुला' लोकांचं काय झालं ? आणि अन्य भारतीय वंशजांचं काय करायचं ? 
५. वैदिक संस्कृती राखीगढीवाल्या लोकांनीच निर्माण केली असं आता डॉ. शिंदे सांगत आहेत. पण ऑगस्ट २०१८ मध्ये या लोकांचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचं ते सांगत होते. 
६. काश्मीर ते केरळ आणि अफगाणिस्तान ते बंगाल यांमधील लोकांचे (त्यांचे जाती-धर्म कोणतेही असोत) पूर्वज हडप्पीयन लोकच होते कारण ६०% हून अधिक लोकांचे डीएनए जुळत आहेत असं या व्याख्यानात डॉ. शिंदे म्हणत आहेत. म्हणजे आर्य आणि द्रविड असा काही प्रकार नव्हता हे ते एकप्रकारे मान्य करत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी आर्य आणि द्रविड अशी विभागणी सांगितली होती. 
७. शेती करायला सर्वप्रथम भारतातच (९००० वर्षांपूर्वी) सुरुवात झाली असं डॉ. शिंदे या व्याख्यानात म्हणत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये भारतीय इराण्यांकडून शेती करायला शिकले असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 


८. हे सर्व सांगून झाल्यावर 'हे फारच लहान नमुन्यावरील संशोधन आहे' हे मान्य करून डॉ. शिंदे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. म्हणजे काही काळानंतर ही अनुमाने चुकीचीही निघू शकतील याचं सूतोवाच त्यांनी आताच करून ठेवलं आहे. 

Thursday, September 6, 2018

राखीगढीचा संदेश  
(The message of Rakhigarhi)
हरियाणातील राखीगढी इथे ४५०० वर्षांपूर्वीचे (म्हणजे इ स पूर्व २५०० च्या दरम्यानचे) मानवी सांगाडे सापडले आहेत. त्यापैकी १४८ सांगाड्यांची जनुकीय चाचणी करून संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की वैदिक आर्य हे मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून (Central Asian Steppe) आले नव्हते. त्यामुळे वैदिक युग निर्माण करणारे लोक हे स्थानिक भारतीयच होते. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू वसंत शिंदे आणि लखनौ येथील बिरबल साहनी डीएनए संस्थेचे प्रमुख नीरज राय यांनी हे निष्कर्ष काढले आहेत.
(संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, १३ जून २०१८) 

या संशोधनाचे निष्कर्ष थोडक्यात खालीलप्रमाणे :- 
१. राखीगढीमधील लोक हे वैदिक संस्कृतीशी संबंध असणारे किंवा ती निर्माण करणारे नव्हते. कारण आर्यांचा निदर्शक म्हणून स्थूलपणे ओळखला जाणारा R1a1  हा जीन त्यांच्यात सापडत नाही.   
२. सध्याच्या भारतीयांशी मात्र त्यांची जनुके जुळतात. 
३. हे लोक आर्य नसून द्रविड होते. (राय यांच्या म्हणण्याप्रमाणे-) हे लोक 'निलगिरी' मधील 'इरुला' या आदिवासी जमातींपैकी असावेत.    
४. उत्तर भारतीयांपेक्षा दक्षिण भारतीयांशीच त्यांचं अधिक साम्य आहे. 
५. मात्र या लोकांचं 'इराणी शेतकरी' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांशी मिश्रण झालं असावं असंही निश्चितपणे दिसून आलं आहे.  (The result show clear evidence of mixing with another population from outside the subcontinent, labelled as 'Iranian Agriculturist'.)   
६. शेतीचं तंत्र या लोकांनी पश्चिम आशियातून आलेल्या लोकांकडून उचललं असावं. 
(संदर्भ - इंडिया टुडे, ३१ ऑगस्ट २०१८)  

माझ्या मते हे निष्कर्ष अत्यंत उतावीळपणे व अन्य शास्त्रांचा विचार न करता किंवा कुठलातरी विशिष्ठ हेतू मनात ठेवून काढले असावेत. याची कारणं खालीलप्रमाणे,

अ) १९२० सालापासून हडप्पा आणि मोहेंजोदडो उत्खनने जेव्हा जेव्हा केली गेली आहेत, तेव्हा तेव्हा निष्कर्ष बदलत गेले आहेत. उदा. सिंधू नावाची संस्कृती इ स पूर्व २००० वर्षांपूर्वी होऊन गेली आणि आर्यांपेक्षा ती वेगळी होती हा पहिला निष्कर्ष होता. त्यानंतर 'पूर्व सिंधू', 'उत्तर सिंधू' वगैरे करत सिंधू संस्कृतीचा काळ मागे जात राहिला. आता तो (हडप्पातील राखीगढीसकट) इ स पूर्व ७००० वर्षांच्या पलीकडे पोहोचला आहे. एवढंच नव्हे, तर ती आर्यांचीच संस्कृती असावी असा अंदाज उत्खननांत सापडलेल्या द्यूतमंडले, यज्ञकुंड, त्रिमुखीदेवी इत्यादींच्या आधारे करण्यात आला आहे. (मधुकर ढवळीकर यांची पुस्तके पहा.) मात्र माझ्या मताप्रमाणे ती आर्य आणि पणि यांची संयुक्त वसाहत असावी. पणि हे स्थानिक आद्य 'व्यापारी' होते.     

ब) वरील संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांचाच तपशील आलाय. भारताला १०,००० वर्षांचा इतिहास आहे हे सदर निष्कर्ष काढताना विसरलं गेलं आहे. शिवाय हे सांगाडे म्हणजे आर्यांचं किंवा तत्कालीन भारताचं 'प्रातिनिधिक चित्र' असल्याचंही गृहीत धरण्यात आलं आहे. याला उतावीळपणाशिहय दुसरं काय म्हणणार ? आर्यांच्या सर्वसमावेशक धोरणामुळे पणि, दास, नाग आदी स्थानिक जमातींशी त्यांनी जमवून घेतलं होतं आणि त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारही केले होते हे सर्वमान्य आहे. अशाच एखाद्या जमातीचीसुद्धा ही जनुके असू शकतील. त्यावरून 'सिंधू संस्कृतीतले लोक आर्य नव्हते' असा सिद्धांत मांडणं अशास्त्रीय आहे.         
क) 'आर्य-द्रविड' ही रॉबर्ट काल्डवेल या मिशनऱ्याने हेतुतः केलेली कृत्रिम विभागणी होती हे भारतातील संशोधकांना केव्हाच मान्य झालं आहे.  त्याने द्राविडी भाषेला दहा विशिष्ट निकष लावून भाषेच्या आधारे ही विभागणी केली होती. पण द्राविडी भाषेचे हे निकष संस्कृत, हिंदी व मराठी भाषेलाही कसे लागू होतात हे आता संशोधकांनी दाखवून दिलं आहे. (पहा- 'The Aryan Problem', १९९३.) शिवाय मनुस्मृतीप्रमाणे 'पंचद्रविड' हे मुळात 'काश्यप' असून काही काळ वैदिक विधी न केल्याने वर्णबाह्य झालेले लोक होते. मात्र पुढे ते एवढे वर्णबद्ध झाले, की आग्नेय आशियातील सर्व देशांमध्ये वैदिक संस्कृती नेण्याचं श्रेय मुख्यतः त्यांनाच जातं. 

ड) मुळात 'आर्य' हा एखादा वंश किंवा भाषिक गट नसून ती एक 'संस्कृती' होती. आर्य हा शब्द ऋग्वेदात ३६ वेळा व यजुर्वेदात १५ वेळा आला आहे. शिवाय अन्य वेद, वैदिक वाङ्मय, योगवासिष्ठ, गीता, महाभारत असा अनेक ठिकाणी तो काहीवेळा आला असून बहुतेकदा तो 'संस्कृती' या अर्थानेच आला आहे. त्यामुळे आर्य म्हणजे उंच, गोरे व नाकेले असलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण गंमत म्हणजे 'राखीगढीमधील पुरुष हे आजच्या हरियाणामधल्या पुरुषांप्रमाणेच ६ फूट उंच आणि तरतरीत नाकडोळे असलेले होते' असंही शिंदे म्हणतात. (संदर्भ - आऊटलूक, १३ ऑगस्ट २०१८) मग द्रविडी जनुके आणि उंच, गोरे, तरतरीत नाकडोळे ही आर्यांची शारीरिक वैशिष्ट्ये एकमेकांशी कशी जुळू शकतात हे जनुकतज्ञ नीरज राय यांनी दाखवून द्यायला पाहजे होतं. पण तसा खुलासा त्यांनी केलेला नाही. या दोन संशोधकांतच एकवाक्यता नाही असं इथे दिसून येत आहे.     

इ) आर्य (किंवा वैदिक) संस्कृती निर्माण करणारे लोक हे 'मध्य आशिया'तून आलेले कधीच नव्हते. ते आर्मेनिया, अझरबैजान आणि इराण या कश्यप समुद्राच्या (Caspian sea) पश्चिम किनाऱ्यावरील देशांमधून (म्हणजे पश्चिम आशियातून) भारतात आले हेच सत्य आहे. वरील निष्कर्षांमधूनही अंशतः का होईना, पण तेच सिद्ध होत आहे. काही काळाने ते पूर्णतः सिद्ध होईल यात शंका नाही.  

फ) जनुकीय चाचणी करणाऱ्यांची पात्रता व निष्कर्षांची अचूकता नेमकी काय आहे हाही एक प्रश्नच आहे. 'Current Biology' या वैज्ञानिक नियतकालिकात ७ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनुकीय निष्कर्षांप्रमाणे 'फिनिश लोक वगळता युरोपातील बाकीचे सर्व लोक हे नॉर्डिक व कोकेशियन वंशाचे आहेत. ते आर्य नाहीत'. भारतीय हे अर्थातच त्यांनी आर्य ठरवले आहेत. जयंत नारळीकर संपादित 'Nature'  या वैज्ञानिक साप्ताहिकात (२३ सप्टेंबर २००९) अमेरिकेतील मेरीलँड मधील 'हॉपकिन्स' संस्थेतील जनुक संशोधक अरविंद चक्रवर्ती म्हणतात, 'बहुतेक भारतीय जनुकीय दृष्ट्या एकच आहेत'. तुम्ही जर इंटरनेटवर उत्तर व दक्षिण भारतीयांच्या जनुकीय चाचणीविषयी शोध घेतलात, तर तुम्हाला वेगवेगळे निष्कर्ष पाहायला मिळतील. आर्य आणि द्रविड हे 'वेगळे आहेत' किंवा 'वेगळे नाहीत' अशी दोन्ही टोकाची मते पाहायला मिळतील. याचाच अर्थ कुठलीही एक जनुकीय चाचणी ही बरोबर असल्याचं गृहीत धरता येणार नाही आणि त्यावर अवलंबून राहता येणार नाही. अन्य शास्त्रांचाही आधार घ्यावा लागेल. शिंदे-राय जोडगोळीने तो घेतलेला नाही. म्हणून मी त्यांच्या निष्कर्षांना 'उतावीळ निष्कर्ष' म्हणतो.
तात्पर्य,  
१. या जनुकीय संशोधनातून 'वैदिक युग' निर्माण करणारे 'स्थानिक' लोक होते हे अजिबात सिद्ध होत नाही.   
२. 'आर्य' ही ज्यांची संस्कृती होती ते लोक पश्चिम आशियातून अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी  भारतात आले. पण या संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीचे सांगाडे विचारात घेतले आहेत.    
३. आर्य आणि द्रविड हे मुळात वेगळे नव्हते. पण इथे ते वेगळे असल्याचं मानलं आहे.   
४. बाहेरून आलेल्या आर्यांचं पणि, दास, नाग इत्यादी स्थानिक जमातींचं बेमालूम पण अभिमानास्पद असं सांस्कृतिक सामरस्य झालं आहे. पण या संशोधनाने त्याची दखल न घेताच निष्कर्ष दिले आहेत.    

एकंदरीत 'राखीगढी' चा काही 'संदेश' असला तर तो हाच आहे, की केवळ जनुकीय शास्त्राच्या आधारे उड्या न मारता मानववंश, खगोल, पुरातत्व, साहित्य इत्यादी अन्य शास्त्रेही पडताळून पहा व मगच निष्कर्ष काढा. 
दुर्दैवाने शिंदे आणि राय यांनी हे केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.