Thursday, September 6, 2018

राखीगढीचा संदेश  
(The message of Rakhigarhi)
हरियाणातील राखीगढी इथे ४५०० वर्षांपूर्वीचे (म्हणजे इ स पूर्व २५०० च्या दरम्यानचे) मानवी सांगाडे सापडले आहेत. त्यापैकी १४८ सांगाड्यांची जनुकीय चाचणी करून संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की वैदिक आर्य हे मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून (Central Asian Steppe) आले नव्हते. त्यामुळे वैदिक युग निर्माण करणारे लोक हे स्थानिक भारतीयच होते. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू वसंत शिंदे आणि लखनौ येथील बिरबल साहनी डीएनए संस्थेचे प्रमुख नीरज राय यांनी हे निष्कर्ष काढले आहेत.
(संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, १३ जून २०१८) 

या संशोधनाचे निष्कर्ष थोडक्यात खालीलप्रमाणे :- 
१. राखीगढीमधील लोक हे वैदिक संस्कृतीशी संबंध असणारे किंवा ती निर्माण करणारे नव्हते. कारण आर्यांचा निदर्शक म्हणून स्थूलपणे ओळखला जाणारा R1a1  हा जीन त्यांच्यात सापडत नाही.   
२. सध्याच्या भारतीयांशी मात्र त्यांची जनुके जुळतात. 
३. हे लोक आर्य नसून द्रविड होते. (राय यांच्या म्हणण्याप्रमाणे-) हे लोक 'निलगिरी' मधील 'इरुला' या आदिवासी जमातींपैकी असावेत.    
४. उत्तर भारतीयांपेक्षा दक्षिण भारतीयांशीच त्यांचं अधिक साम्य आहे. 
५. मात्र या लोकांचं 'इराणी शेतकरी' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांशी मिश्रण झालं असावं असंही निश्चितपणे दिसून आलं आहे.  (The result show clear evidence of mixing with another population from outside the subcontinent, labelled as 'Iranian Agriculturist'.)   
६. शेतीचं तंत्र या लोकांनी पश्चिम आशियातून आलेल्या लोकांकडून उचललं असावं. 
(संदर्भ - इंडिया टुडे, ३१ ऑगस्ट २०१८)  

माझ्या मते हे निष्कर्ष अत्यंत उतावीळपणे व अन्य शास्त्रांचा विचार न करता किंवा कुठलातरी विशिष्ठ हेतू मनात ठेवून काढले असावेत. याची कारणं खालीलप्रमाणे,

अ) १९२० सालापासून हडप्पा आणि मोहेंजोदडो उत्खनने जेव्हा जेव्हा केली गेली आहेत, तेव्हा तेव्हा निष्कर्ष बदलत गेले आहेत. उदा. सिंधू नावाची संस्कृती इ स पूर्व २००० वर्षांपूर्वी होऊन गेली आणि आर्यांपेक्षा ती वेगळी होती हा पहिला निष्कर्ष होता. त्यानंतर 'पूर्व सिंधू', 'उत्तर सिंधू' वगैरे करत सिंधू संस्कृतीचा काळ मागे जात राहिला. आता तो (हडप्पातील राखीगढीसकट) इ स पूर्व ७००० वर्षांच्या पलीकडे पोहोचला आहे. एवढंच नव्हे, तर ती आर्यांचीच संस्कृती असावी असा अंदाज उत्खननांत सापडलेल्या द्यूतमंडले, यज्ञकुंड, त्रिमुखीदेवी इत्यादींच्या आधारे करण्यात आला आहे. (मधुकर ढवळीकर यांची पुस्तके पहा.) मात्र माझ्या मताप्रमाणे ती आर्य आणि पणि यांची संयुक्त वसाहत असावी. पणि हे स्थानिक आद्य 'व्यापारी' होते.     

ब) वरील संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांचाच तपशील आलाय. भारताला १०,००० वर्षांचा इतिहास आहे हे सदर निष्कर्ष काढताना विसरलं गेलं आहे. शिवाय हे सांगाडे म्हणजे आर्यांचं किंवा तत्कालीन भारताचं 'प्रातिनिधिक चित्र' असल्याचंही गृहीत धरण्यात आलं आहे. याला उतावीळपणाशिहय दुसरं काय म्हणणार ? आर्यांच्या सर्वसमावेशक धोरणामुळे पणि, दास, नाग आदी स्थानिक जमातींशी त्यांनी जमवून घेतलं होतं आणि त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारही केले होते हे सर्वमान्य आहे. अशाच एखाद्या जमातीचीसुद्धा ही जनुके असू शकतील. त्यावरून 'सिंधू संस्कृतीतले लोक आर्य नव्हते' असा सिद्धांत मांडणं अशास्त्रीय आहे.         
क) 'आर्य-द्रविड' ही रॉबर्ट काल्डवेल या मिशनऱ्याने हेतुतः केलेली कृत्रिम विभागणी होती हे भारतातील संशोधकांना केव्हाच मान्य झालं आहे.  त्याने द्राविडी भाषेला दहा विशिष्ट निकष लावून भाषेच्या आधारे ही विभागणी केली होती. पण द्राविडी भाषेचे हे निकष संस्कृत, हिंदी व मराठी भाषेलाही कसे लागू होतात हे आता संशोधकांनी दाखवून दिलं आहे. (पहा- 'The Aryan Problem', १९९३.) शिवाय मनुस्मृतीप्रमाणे 'पंचद्रविड' हे मुळात 'काश्यप' असून काही काळ वैदिक विधी न केल्याने वर्णबाह्य झालेले लोक होते. मात्र पुढे ते एवढे वर्णबद्ध झाले, की आग्नेय आशियातील सर्व देशांमध्ये वैदिक संस्कृती नेण्याचं श्रेय मुख्यतः त्यांनाच जातं. 

ड) मुळात 'आर्य' हा एखादा वंश किंवा भाषिक गट नसून ती एक 'संस्कृती' होती. आर्य हा शब्द ऋग्वेदात ३६ वेळा व यजुर्वेदात १५ वेळा आला आहे. शिवाय अन्य वेद, वैदिक वाङ्मय, योगवासिष्ठ, गीता, महाभारत असा अनेक ठिकाणी तो काहीवेळा आला असून बहुतेकदा तो 'संस्कृती' या अर्थानेच आला आहे. त्यामुळे आर्य म्हणजे उंच, गोरे व नाकेले असलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण गंमत म्हणजे 'राखीगढीमधील पुरुष हे आजच्या हरियाणामधल्या पुरुषांप्रमाणेच ६ फूट उंच आणि तरतरीत नाकडोळे असलेले होते' असंही शिंदे म्हणतात. (संदर्भ - आऊटलूक, १३ ऑगस्ट २०१८) मग द्रविडी जनुके आणि उंच, गोरे, तरतरीत नाकडोळे ही आर्यांची शारीरिक वैशिष्ट्ये एकमेकांशी कशी जुळू शकतात हे जनुकतज्ञ नीरज राय यांनी दाखवून द्यायला पाहजे होतं. पण तसा खुलासा त्यांनी केलेला नाही. या दोन संशोधकांतच एकवाक्यता नाही असं इथे दिसून येत आहे.     

इ) आर्य (किंवा वैदिक) संस्कृती निर्माण करणारे लोक हे 'मध्य आशिया'तून आलेले कधीच नव्हते. ते आर्मेनिया, अझरबैजान आणि इराण या कश्यप समुद्राच्या (Caspian sea) पश्चिम किनाऱ्यावरील देशांमधून (म्हणजे पश्चिम आशियातून) भारतात आले हेच सत्य आहे. वरील निष्कर्षांमधूनही अंशतः का होईना, पण तेच सिद्ध होत आहे. काही काळाने ते पूर्णतः सिद्ध होईल यात शंका नाही.  

फ) जनुकीय चाचणी करणाऱ्यांची पात्रता व निष्कर्षांची अचूकता नेमकी काय आहे हाही एक प्रश्नच आहे. 'Current Biology' या वैज्ञानिक नियतकालिकात ७ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनुकीय निष्कर्षांप्रमाणे 'फिनिश लोक वगळता युरोपातील बाकीचे सर्व लोक हे नॉर्डिक व कोकेशियन वंशाचे आहेत. ते आर्य नाहीत'. भारतीय हे अर्थातच त्यांनी आर्य ठरवले आहेत. जयंत नारळीकर संपादित 'Nature'  या वैज्ञानिक साप्ताहिकात (२३ सप्टेंबर २००९) अमेरिकेतील मेरीलँड मधील 'हॉपकिन्स' संस्थेतील जनुक संशोधक अरविंद चक्रवर्ती म्हणतात, 'बहुतेक भारतीय जनुकीय दृष्ट्या एकच आहेत'. तुम्ही जर इंटरनेटवर उत्तर व दक्षिण भारतीयांच्या जनुकीय चाचणीविषयी शोध घेतलात, तर तुम्हाला वेगवेगळे निष्कर्ष पाहायला मिळतील. आर्य आणि द्रविड हे 'वेगळे आहेत' किंवा 'वेगळे नाहीत' अशी दोन्ही टोकाची मते पाहायला मिळतील. याचाच अर्थ कुठलीही एक जनुकीय चाचणी ही बरोबर असल्याचं गृहीत धरता येणार नाही आणि त्यावर अवलंबून राहता येणार नाही. अन्य शास्त्रांचाही आधार घ्यावा लागेल. शिंदे-राय जोडगोळीने तो घेतलेला नाही. म्हणून मी त्यांच्या निष्कर्षांना 'उतावीळ निष्कर्ष' म्हणतो.
तात्पर्य,  
१. या जनुकीय संशोधनातून 'वैदिक युग' निर्माण करणारे 'स्थानिक' लोक होते हे अजिबात सिद्ध होत नाही.   
२. 'आर्य' ही ज्यांची संस्कृती होती ते लोक पश्चिम आशियातून अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी  भारतात आले. पण या संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीचे सांगाडे विचारात घेतले आहेत.    
३. आर्य आणि द्रविड हे मुळात वेगळे नव्हते. पण इथे ते वेगळे असल्याचं मानलं आहे.   
४. बाहेरून आलेल्या आर्यांचं पणि, दास, नाग इत्यादी स्थानिक जमातींचं बेमालूम पण अभिमानास्पद असं सांस्कृतिक सामरस्य झालं आहे. पण या संशोधनाने त्याची दखल न घेताच निष्कर्ष दिले आहेत.    

एकंदरीत 'राखीगढी' चा काही 'संदेश' असला तर तो हाच आहे, की केवळ जनुकीय शास्त्राच्या आधारे उड्या न मारता मानववंश, खगोल, पुरातत्व, साहित्य इत्यादी अन्य शास्त्रेही पडताळून पहा व मगच निष्कर्ष काढा. 
दुर्दैवाने शिंदे आणि राय यांनी हे केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.             

No comments: