Saturday, July 9, 2016

बळीवंश,  एक थोतांड !
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यासंगी विद्वान डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘बळीवंश’ या शीर्षकाचं पुस्तक लिहून आणखी एक वेगळाच विचारप्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात त्यांनी मांडलेले मुद्दे सारांशरूपाने खालीलप्रमाणे सांगता येतील,

एक, हिरण्यकश्यपूचा पणतू व प्रल्हादाचा नातू बळी हे इतिहासातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेलं. महात्मा फुले त्याला ‘कुळस्वामी’ म्हणतात. म्हणजे एकप्रकारे तो आपला (?) पूर्वजच झाला. तुळू भाषेत बळी म्हणजे वंश.
तुळूनाडू (कर्नाटक) ही बळीची भूमी म्हणून विख्यात आहे. 

दोन, बळी हा असुर होता व असुर हे भारतीय भूमीचे मूळ रहिवासी होते. मात्र त्यांचा ऐहिकवाद लोकांनी स्वीकारला नाही. लोक यज्ञयागाच्या मागे लागले. त्यामुळे त्यांची ‘धड हे नाही, धड ते नाही’ अशी स्थिती झाली. 

तीन, देवांनी असुरांना अनेकदा फसवलं, त्यांची निवासस्थाने नष्ट केली आणि हिरण्याक्षसारख्या ‘उजळ व निर्मळ’ दृष्टी असलेल्या असुरांना ठार मारलं. 

चार, वैदिकांनी बहुजनांच्या मनावर कब्जा करून त्यांना पराभूत केलं. 

पाच, भारतातील जनता केवळ ‘आर्य आणि अनार्य’ किंवा ‘ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर’ अशा दोनच वर्गात विभागली जाते. अनार्य किंवा ब्राह्मणेतर हे नकारात्मक संबोधन असल्यामुळे अशा जनतेने स्वतःला ‘बळीवंशीय’ म्हणवून घ्यावं.

या मुद्द्यांवर माझी प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहे.       
१.        जसा ‘आर्यवंश’ नावाचा कुठलाही वंश कधीही अस्तित्वात नव्हता, तसाच ‘बळीवंश’ असा प्रकारही कधी  अस्तित्वात नव्हता व नाही. तसा एकही पुरावा डॉ. आह यांनी आपल्या ‘बळीवंश’ या पुस्तकात दिलेला नाही. हा चक्क त्यांच्या ‘कल्पनेतून निघालेला’ वंश आहे.
२.       तुळू भाषेत ‘बळी’ या शब्दाचा अर्थ ‘वंश’ असा आहे असं गृहित धरलं तरी त्याचा अर्थ बळी नामक वंश अस्तित्वात होता किंवा आहे असा ते कसा लावू शकतात ? शिवाय तुळूनाडू हा प्रदेश बळीसाठी प्रसिद्ध आहे हे विधानही अतिरंजित- नव्हे, विपर्यस्तसुद्धा- आहे. केरळात बळीचं प्रस्थ आहे तसं तुळूनाडू या प्रदेशात अजिबात नाही. तुळूनाडू हा प्रदेश कुंदापूरपासून सुरु होऊन कासारगोडपाशी संपतो. त्यात उडुपी व मंगलोर ही शहरेही येतात. हा प्रदेश ‘यक्षगाना’साठी प्रसिद्ध असून ‘संगम’ काळात तिथे कोकर नामक लोक राहत होते. यांच्या इतिहासात बळीचा उल्लेख अजिबात येत नाही. पुढल्या राजांच्या इतिहासातही येत नाही.   आह यांनी बळीच्या ज्या कथा दिल्या आहेत त्यापैकी एका कथेत ‘बळी पूर्वेकडे गेला’ असा उल्लेख असून दुसऱ्या कथेत ‘दक्षिणेकडे गेला’ असा उल्लेख आहे. पण आह मात्र त्यातला ‘दक्षिणेकडे गेला’ एवढाच उल्लेख सोयीस्करपणे उचलतात व ‘पूर्वे’ कडे दुर्लक्ष करतात हे कितपत बरोबर आहे ?                
३.       बळी याचं खरं नाव इंद्रसेन हे होतं. तो बलाढ्य आणि लोकप्रिय असल्यामुळे वैदिकांनीच आपल्या वाडमयात त्याला उद्देशून ‘बळी’ किंवा ‘महाबळी’ म्हटलं आहे. पण आहसर त्याचा संबंध यज्ञात देण्याच्या बळीशी जोडून वैदिकांना दोष देतात. यासाठी गेल्या दहा हजार वर्षात एकाच विषयावर निर्माण झालेल्या अनेक बर्या वाईट कथा व त्यातल्या विसंगती यांचा ते फायदा करून घेतात. जिथे बळीच्या ‘फसवणुकी’चं वर्णन आहे तिथे ते वैदिकांना निंद्य लेखतात; मात्र चांगल्या गुणांचं वर्णन आहे तिथे ते फक्त बळीची स्तुती करत राहतात आणि ‘पुराणिक बळीचे चांगले गुण लपवू शकले नाहीत !’ अशी मखलाशी करतात. तटस्थ मांडणीचं हे लक्षण म्हणता येणार नाही.          
४.       महात्मा फुले यांनी आपल्या पोवाड्यात ‘बळी राज्यादी कुळस्वामीला’ असं म्हटलं असताना ‘ते आशयाशी जुळत नाही’ असं सांगून आहसर ‘बळी हाच कुळस्वामी’ असा स्वतःला सोयीस्कर अर्थ लावतात. एवढंच नव्हे तर ‘कुळस्वामी म्हणजे पूर्वज’ असा अजब तर्कही ते मांडतात हे बघून आश्चर्य वाटतं ! एखाद्याचा कुलस्वामी ‘रवळनाथ’ किंवा ‘खंडोबा’ असला तर तो त्याचा पूर्वज म्हणता येईल काय याचा विचार वाचकांनीच करून पाहावा. शिवाय महात्मा फुले कितीही मोठे असले तरी ते इतिहासाचे अभ्यासक नव्हेत. इतिहासाच्या प्रांतात त्यांचा शब्द प्रमाण मानण्याची गरज नाही.   
५.      अन्य कुठलाही आधार नसल्यामुळे आह यांनी सर्वत्र वैदिक वाडमयाचाच आधार घेतला आहे हे त्यांनी स्वतःच प्रास्ताविकात कबूल केलंय. फक्त अन्वयार्थ नि शब्दच्छल स्वतःला हवा तसा करून घेतला आहे. उदाहरणार्थ, ‘शंबरा’ वरून मराठीत ‘शंभर’ हा शब्द आला किंवा ‘पाणिनी’ हा ‘पणि’ (म्हणजे आर्यपूर्व व्यापारी) यांचा वंशज होता असली निराधार, हास्यास्पद विधाने त्यांनी केली आहेत. ती करण्यापूर्वी त्यांनी निदान कालनिश्चिती तरी करायला हवी होती किंवा दुसर्यांनी केलेली लक्षात घ्यायला हवी होती. पण तेवढे प्रयास त्यांनी घेतले नाहीत त्यामुळे ठायी ठायी कालविपर्यास झाला आहे. उदा. आर्य इ.स.पूर्व ७८०० च्या दरम्यान भारतात आले तेव्हा पणि सरस्वती नदीच्या काठी स्थायिक होते. त्यांचा आर्यांशी आधी संघर्ष व नंतर समेट होऊन ते वैदिक संस्कृतीत विरघळून गेले. इ. स. पूर्व १४०० हा ज्याचा काळ होता त्या पाणिनीशी त्यांचा संबंध कसा काय लावता येईल ? पाणिनीचे भाष्यकार कैय्यट आणि भट्टोजी दीक्षित हे पाणिनी या नावाची खालील व्युत्पत्ती देतात,
    ‘पणनं पण:  स विद्यते यस्य स: पणी  पणिन: अपत्यं पुमान पाणिन:  तस्य युवापत्यं पाणिनी: 
 म्हणजे पणिनचा मुलगा पाणिन व त्याचा नातू पाणिनी. 
 ‘पण’ शब्दापासून ‘पाणिनी’ शब्द साधला आहे असं थोर व्याकरणकारांचं मत आहे. पण डॉ. साळुंखे आकारण ही व्युत्पत्ती बदलतात. त्या भानगडीत कालविपर्यास होत आहे हे ते लक्षात घेत नाहीत. असाच प्रकार बृहस्पती किंवा शुक्र यांच्या बाबतीतही होतो. डॉ. साळुंखे यांचं पुस्तक वाचून ही मंडळी हजारएक वर्षं तरी जगली असावीत असा कुठल्याही अडाण्याचा समज होऊ शकतो.                
६.       बळीचा काळ आह यांनी ‘सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षे’ ठरवला आहे. पण महाभारतालाच पाच हजार वर्षे होऊन गेली आहेत. त्यापूर्वी हजार वर्षे आधी रामायण घडलं. योगवसिष्ठामध्ये वसिष्ठ रामाला बळीविषयी माहिती देतात असं आढळतं. (हे कदाचित प्रक्षिप्त असावं.) म्हणजे बळी किमान सात हजार वर्षांपूर्वी होऊन गेला हे यातून दिसतं. माझ्या मते बळी इ. स. पूर्व ७७०० च्या दरम्यान होऊन गेला. याविषयीचं सविस्तर विवेचन मी ‘आर्यभारत खंड २’ या माझ्या आगामी पुस्तकात केलं आहे.  
७.      बळी हा चांगला राजा होता हे पुराणांनीच सांगून ठेवलं आहे. त्याचा आजोबा प्रल्हाद याला बापाविरुद्ध केलेल्या बंडात आर्यांनी साथ दिली होती. त्यामुळे प्रल्हाद आर्यांना फार मानत होता असं दिसतं. (तो विष्णूभक्त होता यावर मात्र माझा विश्वास नाही. कारण विष्णू हा देव तेव्हा अस्तित्वात नसावा.) विरोचन आणि बळी यांनीही आर्यांना तेवढाच मान द्यावा अशी आर्यांची इच्छा असावी. (औरंगझेब व इराणचा शहा यांची इथे आठवण होते !) तेवढा मान न मिळाल्यामुळे आर्यांचा सेनापती वामन याने गनिमी काव्याने बळीचा पराभव केला. मात्र बळीने आर्यांचा मोठेपणा कबूल केल्यावर त्याचं राज्य त्याला परत दिलं गेलं. बळी परत राज्यावर आला तो दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्हणून वैदिकांनीच सुस्थापित केला. (आहसर मात्र ‘बलीप्रतिपदा म्हणजे बळीचा वध केल्याचा दिवस’ असा प्रचार करून लोकांच्या मनामध्ये किल्मिष उत्पन्न करत आहेत.)
८.       वैदिकांनी सप्तचिरंजीवात बळीचा समावेश केला याबद्दल तरी आह यांनी वैदिकांची पाठ थोपटायला हवी होती! पण ‘चिरंजीव’ या संबोधनाचा विपरीत अर्थ लावून आणि ‘केवळ हनुमान व बळी तेवढे आपले !’ असं विधान करून आहसरांनी आपण स्वतः ‘तटस्थ विद्वान’ नसल्याचं एका परीने सिद्धच केलं आहे.                      
९.       बळीचं राज्य दक्षिणेत नसून आजच्या मुलतानमध्ये होतं व ‘प्रल्हादपूर’ हे त्याचं प्राचीन नाव होतं. आर्यांनी भारतात प्रवेश केला तेव्हा हिरण्यकश्यपु त्यांना आडवा आला असणार हे उघड आहे. प्रल्हादाने बापाविरुद्ध केलेल्या बंडाला आर्यांची साथ मिळाली. मात्र ज्या नरसिंहाने हिरण्यकश्यपुचा वध केला तो आर्य नसून त्यांना मदत करणारा ‘यक्षवीर’ होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. यक्षांच्या बावन्न वीरांपैकी नरसिंह हा एक वीर आहे. वैदिकांनी त्याला नंतर आपल्यात सामावून घेतलं. पण आह हे समजून घेऊ इच्छित नाहीत.  
१०.     असुर हे भारताचे मूळ निवासी असल्याचा आह यांचा दावाही चुकीचाच आहे. असुर हे मुळात मेसापोटेमिया प्रांतातील अरारात पर्वत व इराक इथे राहत होते. (अरारात म्हणजेच पूर्वीचा ‘उरर्तु’ म्हणजेच पूर्वीचा वृत्र पर्वत. देव नामक जमातीच्या वृत्राशी लढाया इथेच झाल्या.) याच प्रांतात पुढे असिरीयन (म्हणजे असुरांचे) साम्राज्य निर्माण झालं हे सुप्रसिद्धच आहे. काही असुर आर्यांप्रमाणेच भारतात येऊन स्थायिक झाले असावेत हे हिरण्यकश्यपू किंवा वृषपर्वा अशा राजांच्या उल्लेखांवरून दिसतं. मात्र भारत ही असुरांची मूळ भूमी नव्हे.
११.      देवांनी असुरांना फसवलं म्हणून आहसर तक्रार करतात, पण अशीच तक्रार ‘बुसातीन उस सलातीन’ या आदिलशाहीचा इतिहास सांगणार्या ग्रंथात शिवाजीराजांविषयीही केली आहे. ‘मासिरे आलमगिरी’ वगैरे ग्रंथांत राजांविषयी अशीच बोटे मोडली आहेत. मग आहसर राजांचा निषेध करणार आहेत काय ? बलाढ्य शत्रूशी गनिमी काव्याने लढणे म्हणजे फसवणं नव्हे हे उघड आहे.     
१२.    ज्या हिरण्याक्ष असुराचा आह यांनी गौरव केला आहे त्या हिरण्याक्षाविषयी ‘तो मातला होता !’ असं तुकोबा म्हणतात (क्षे.अ. ३३५) तर ज्ञानेश्वरांनी त्याला ‘दुराग्रही’ म्हटलं आहे. (११-६१) पण दर्शनीच तुकोबांचा अभंग देणारे आह याकडे कानाडोळा करतात.
१३.    ‘वैदिकांनी बहुजनांच्या मनावर कब्जा करून त्यांना पराभूत केलं’ या आह यांच्या विधानाला ऐतिहासिक दृष्टीकोनातून काहीच अर्थ नाही. इहवादी असुरांपेक्षा दैवी संपत्तीवर विश्वास ठेवणारे वैदिक लोकांना अधिक विश्वासार्ह वाटले हाच त्याचा अर्थ आहे. आणि वैदिक म्हणजे तरी कोण ? तर चारही वर्णांचे लोक म्हणजे वैदिक. त्यात आह यांचा तथाकथित बहुजनसमाजसुद्धा आला. शिवाय एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह लोकांना वारंवार व दीर्घकाळ (दहा हजार वर्षे !) फसवू शकत नाही असे इतिहासाचे दाखले आहेत. पण बहुजन म्हणजे जणू काही एक ‘निर्बुद्ध लोकांचा जमाव’ होता असा एकूण आहसरांचा अभिप्राय दिसतो.  मात्र हा अभिप्राय स्वीकारता येत नाही. बहुजन समाजाला चांगलं वाईट काय ते नीट समजत असतं.                  

१४.    आर्य-अनार्य किंवा ब्राह्मण-अब्राह्मण ही कृत्रिम विभागणी इंग्रजांनी ‘फोडा व झोडा’ या हेतूने केली. ती ब्राह्मणांनी केली नाही. आता आहसर अकारण ती विभागणी पुन्हा उकरून काढत आहेत. जे कधीच अस्तित्वात नव्हतं वा नाही, ते अस्तित्वात असल्याचा आभास डॉ. आह साळुंखे निर्माण करत आहेत व सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत अशीच भावना हा साडेचारशे पानी ग्रंथ वाचून होते. 

1 comment:

Com.Nanasaheb Kadam said...

आ.ह.सरांचे विवेचन आपल्याला पटत नाही याचा अर्थ पुराणांमध्ये तुमच्या पूर्वजांनी जो काही गोंधळ घातला ते उघड करण्याचे काम डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केले आहे.तुमचा पुराणोक्त गोंधळ त्यांनी उघडा पडला.असूयेपोटी आ ह सरांवर आगपाखड करण्यासाठी आपण उपद्व्याप करत आहात हे सुर्यप्रकाशाएव्हढे स्वच्छ आहे.