Wednesday, November 25, 2020

एक महत्वाचा दुर्लक्षित शक : सीरियन शक 

 माझ्या मते प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना अभ्यासकासाठी सीरियन शकाचा (Syrian Saka) संदर्भ लक्षात घेणं अपरिहार्य आहे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. त्यामुळे इतिहासाच्या मांडणीत मूलगामी चुका आढळतात. खालील विवेचनावरून हे स्पष्ट होईल.   


१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी जेव्हा भारताचा कलकत्ता वगैरे प्रदेश बळकावला होता तेव्हा भारतात मुख्यतः खालील चार शक अस्तित्वात होते,
अ) युधिष्ठिर शक किंवा युगाब्ध - इ. स. पूर्व ३१०१ पासून चालू. 
ब) सीरियन शक - इ. स. पूर्व ५५७ पासून चालू. 
क) विक्रम संवत - इ. स. पूर्व ५७ पासून चालू. 
ड) शालिवाहन शक - इ. स. ७८ पासून चालू. 

२. इंग्रजांचा इसवी सन मुळात ६ व्या शतकात सेंट डेनिस नामक माणसाने अंदाजातून निर्माण केला व त्याचा प्रत्यक्ष वापर इंग्लंडमध्ये ८ व्या शतकात हळूहळू सुरु झाला. भारतात हा सन इंग्रजांचं राज्य येईपर्यंत अजिबात वापरला जात नव्हता. (तपशील पहा- पृष्ठ १४-१५, 'आर्यभारत खंड १'.)     

३. वर दिलेल्या शकांपैकी सीरियन शक हा पर्शियन सम्राट सायरस द ग्रेट याने चालू केला होता व पुढे कित्येक शतके तो भारतासकट संपूर्ण आशियात वापरला जात होता. कारण  अनेक देशांमध्ये पर्शियन सम्राटाची राजवट चालू राहिली होती. सायरसनंतरचा सम्राट डोरियस याच्या 'बेहिस्तून' शिलालेखावर नजर फिरवली तरी त्या काळातील किमान तेवीस देशांवर त्याची सत्ता होती याचे दाखले मिळतात. (तपशील पहा- पृष्ठ ६५-६६,'आर्यभारत खंड ३'.) एवढ्या विशाल साम्राज्याची व्यवस्था पाहणं सुलभ व्हावं म्हणून कोणता तरी एकच शक वापरणं आवश्यक होतं व सीरियन शक हाच तो शक होता. (पहा- प्रा. हरगोविंद होले लिखित 'महाभारत कालगणनेतील षडयंत्र'.)      

४. वरील निष्कर्षाला 'नवरोज' मुळे पुष्टी मिळते. इराणी नववर्ष दिनाला 'नवरोज' (Nowruz) असं म्हणतात. सायरस याने ज्या दिवशी त्याच्या साम्राज्याची स्थापना केली त्या दिवसापासून नवरोज सुरु झाला असं मानलं जातं. दर वर्षी २१ मार्च या दिवशी नवरोज साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे २०२० साली २५७९ हे नवरोज वर्ष आहे. याचा अर्थ इसवी सनापूर्वी ५५९ व्या वर्षी सायरस याने स्वतःचा शक स्थापन केला असा होतो. (दोन वर्षांचा जो फरक पडला आहे त्याचं कारण म्हणजे या पर्शियन पंचांगाप्रमाणे ३६० दिवसांचं एक वर्ष धरलं जातं व ऋतूंप्रमाणे दिवस जुळवून घेण्यासाठी प्रत्येक सहा वर्षांनी तेरावा महिना घातला जातो.) आजही इराण, इराक, जॉर्जिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान, उझबेकस्तान, किर्गिझस्तान, पाकिस्तान, भारत वगैरे वीस एक देशांमध्ये हा नववर्ष दिन 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होत असतो.  यावरून पूर्वापार सीरियन शकाचा प्रभाव किती विशाल भू भागावर पडला होता याची कल्पना येते.         

५. याच काळात इ. स. पूर्व ४४९ ते इ. स. पूर्व ३४३ या १०६ वर्षांच्या काळात मगध राज्य पर्शियन साम्राज्याचा भाग बनला होता. (पहा: विष्णुपुराण ४-३४.) पुराणांमध्ये या पर्शियन राजांना 'यवन राजे' म्हटलं आहे. पश्चिमेकडून येणारे ते सर्व यवन अशी समजूत त्या काळी प्रचलित झाली असावी. या १०६ वर्षांच्या राजवटीमुळे भारतातही सीरियन शक वापरला जाऊ लागला. ११ व्या शतकात भारतात आलेला अरबी विद्वान अलबेरुनी गुप्तांची कारकीर्द शके २४१ च्या सुमारास सुरु झाली असं म्हणतो तेव्हा त्याला सीरियन शकच अभिप्रेत असतो. कारण शालिवाहन शक वगैरे त्याला माहीत असण्याचा मुळीच संभव नव्हता. त्याचप्रमाणे कनिष्काचा काळ शके ७८ हा होता असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ सीरियन शकाच्या ७८ व्या वर्षाचा तो उल्लेख असतो. पण इंग्रज विद्वानांनी जाणूनबुजून हा उल्लेख शालिवाहन शकाचा किंवा इसवी सनाचा ठरवून भारतीय इतिहास शेकडो वर्षांनी पुढे ओढण्याचा नादानपणा केला.

६. भारताच्या प्राचीन इतिहासाचा काळ पुढे ओढण्याचा उपक्रम इंग्रजांनी एकाच कारणासाठी केला व ते कारण म्हणजे बायबलमध्ये जगाची उत्पत्ती ख्रिस्तापूर्वी केवळ ४००४ वर्षांपूर्वी झाली असा अडाणीपणाचा सिद्धांत मांडला होता. (पहा- जेनेसिस १) तो खोटा ठरू नये म्हणून ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजांनी राज्य केलं, त्या त्या देशांमध्ये त्यांनी ऐतिहासिक घटनांचे काळ पुढे तरी ओढले किंवा त्या घटनाच दाबून टाकल्या. यामुळेच महावीर, बुद्ध, मौर्य, कनिष्क, गुप्त, हर्षवर्धन इत्यादींचे काळ सातशे ते हजार-बाराशे वर्षांनी पुढे दाखवले गेले आहेत व पुराणांमधील काळांशी ते जुळत नाहीत.

७. 'सीरियन शक' असा शब्दप्रयोग अद्याप तरी भारतीय वाङ्मयामध्ये मिळालेला नाही. कदाचित त्याला नुसतंच 'शक' म्हणून संबोधलं जात असावं किंवा नुसतेच आकडे नमूद केले असावेत. मात्र 'सीरिया' या प्रदेशाला आणि 'सीरियन' या संबोधनाला प्राचीन काळी फार महत्व होतं. आजच्या सीरिया, इराक, इराण वगैरे मेसापोटेमियातील विस्तीर्ण प्रदेशांत सुमेरियन, खाल्डियन, असुरियन, बॅबिलोनियन, नव-असुरियन वगैरे राजवटी होऊन गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय आणि भौगोलिक संदर्भ कायम बदलत राहिले होते. सायरस याने मोडकळीला आलेलं नव-असुरियन साम्राज्य संपवून बॅबिलोन या ठिकाणी आपली राजधानी केली. हे ठिकाण सध्या प्राचीन सुमेर किंवा सीरिया व आधुनिक इराक यांच्या दरम्यान आहे. यामुळेच पर्शियन सम्राटांना सीरियन राजे म्हटलं जात असावं. त्याचप्रमाणे सायरस याने चालू केलेल्या वरील शकाला 'सीरियन शक' हे नांव पडलं असावं. कारण असिरियन शक नामक एक शक त्यापूर्वी अस्तित्वात होता. सीरियन शकाची पार्श्वभूमी ही अशी आहे.                            

दुर्दैवाची गोष्ट अशी, की तत्कालीन भारतीय इतिहासकारांचा इंग्रजांच्या बनावट कालगणनेवर एवढा अंधविश्वास बसला, की आजही तीच बनावट कालगणना समोर ठेवून इतिहासाची चर्चा केली जात असते. आज सीरियन शक फारसा कुणाला माहीत नसण्याचं हेच मुख्य कारण आहे. निदान यापुढे  तरी प्राचीन शिलालेखावरील वा नाण्यावरील शकाचा विचार करताना तो सीरियन शक तर नसेल ना हा विचार इतिहासाचे अभ्यासक करतील अशी आशा व्यक्त करतो. अन्यथा चुकीच्या कालगणनेवर आधारित निरर्थक ग्रंथ आणि पीएचड्या निर्माण होतच राहतील यात शंका नाही. 

Saturday, August 8, 2020

रामजन्मभूमी वादातील खरे खलनायक  

पुरातत्व खात्याचे भूतपूर्व संचालक डॉ. के. के. मुहंमद यांनी मल्याळम भाषेत आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याचा 'मै भारतीय हूं !' हा हिंदी अनुवाद प्रभात प्रकाशन नामक संस्थेने प्रकाशित केला आहे. या आत्मचरित्राचा इंग्रजी किंवा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे का याची मला माहिती नाही. पण महाजालावर वाचायला मिळतं त्याप्रमाणे डॉ. मुहंमद यांनी या आत्मचरित्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, की हिंदू आणि मुसलमानांमध्ये रामजन्मभूमीचा प्रश्न परस्पर सौहार्दाने सुटण्याच्या बेतात असताना प्रत्येक वेळी मार्क्सवादी विचारसरणीच्या इतिहासकारांनी त्यात जाणून बुजून मोडता घातला आणि तो प्रश्न चिघळत राहील असं पाहिलं. याबाबतीत रोमिला थापर, बिपीनचंद्र आणि सर्वपल्ली गोपाल या इतिहासकारांनी १९ व्या शतकाच्या पूर्वी मंदिर असल्याचा व ते पाडून मशीद बांधल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा आधारहीन दावा केला होता आणि इरफान हबीब, राम शरण शर्मा, डी. एन. झा, सुरज भान व अथर अली या अन्य डाव्या इतिहासकारांनी त्यांचा हा दावा उचलून धरला होता. या इतिहासकारांनी मुस्लिम पक्षकारांचं एकप्रकारे 'ब्रेन वॉशिंग' च केलं. अनेक डावे राजकीय पक्ष आणि संस्था यांनीही याचा फायदा उठवून हा प्रश्न सुटू नयेत म्हणून सातत्याने प्रयत्न केले. 

  
डॉ. मुहंमद यांच्या म्हणण्यानुसार २०१० साली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू आणि मुसलमान वादी-प्रतिवादींमध्ये हिंदूंनी रामजन्मभूमीची २/३ व मुसलमानांनी १/३ जागा वाटून घेण्याचा तोडगा मान्य होत असताना या डाव्या इतिहासकारांनी पुन्हा एकदा त्यात खो घातला. त्यामुळे त्यावेळीही हा प्रश्न सुटू शकला नाही.    

रामजन्मभूमीवरील उत्खननात जेव्हा हिंदू चिन्हांकित असलेले अनेक खांब मिळू लागले तेव्हा याच इतिहासकारांनी ते बौद्ध- जैन प्रभावाखालील बांधकाम असावं व हिंदू मंदिराचा त्याच्याशी काही संबंध नसावा असा आणखी एक आधारहीन निष्कर्ष हवेत सोडून दिला. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच बिकट होऊन बसला. कारण त्या निमित्ताने काही बौद्ध व जैन दावेदारांनीही या वादात उडी घेतली.              

अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुन्नी वक्फ बोर्डातर्फे जे तथाकथित 'तज्ज्ञ' साक्षीदार सादर करण्यात आले, ते सर्व म्हणजे सुविरा जयस्वाल, सुप्रिया वर्मा, शिरीन रत्नागर आणि जया मेनन हे कुठल्या ना कुठल्या (डाव्या विचारसरणीच्या) संस्थांमार्फत परस्परांशी जोडलेले असून न्यायालयात त्यांनी अत्यंत 'बेजबाबदार' आणि 'आधारहीन' विधाने केल्याचं निरीक्षण न्यायमूर्तीनी निकालपत्रात नोंदवलं होतं.  (संदर्भ -  How Allahabad HC exposed Experts...', Times of India, 9-10-2010.)  

सामाजिक तेढ वाढवणाऱ्या या डाव्या इतिहासकारांनी भारतीय इतिहासाचं आणि समाजाचं अतोनात नुकसान केलं आहे.       

Friday, April 17, 2020

राखीगढीचा 'यू टर्न' 

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. वसंत शिंदे यांनी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक व्याख्यान युट्यूबवर प्रसारित केलं आहे. 'Application of DNA Science to reconstruct authentic early Indian History' हा विषय युट्यूबवर घातला की ते ऐकता-पाहता येतं. या व्याख्यानात राखीगढी येथे झालेल्या संशोधनावर अधिक प्रकाश टाकला आहे. 
१. डॉ. शिंदे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या राखीगढी संशोधनावर ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांची दखल घेतल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. परिणामी त्यावेळी काढलेले काही निष्कर्ष त्यांनी बदलले असल्याचं दिसून येत आहे. ते आता त्यांना 'निष्कर्ष' न म्हणता 'अनुमान' वा 'गट फिलिंग' म्हणत आहेत. 
२. ऑगस्ट २०१८ च्या निष्कर्षांमधील अनेक बाबी त्यांनी या व्याख्यानात गाळल्या वा बदलल्या आहेत. उदा. राखीगढीमधील लोक वैदिक आर्य नव्हते, आर्यांपेक्षा दक्षिण भारतीयांशी वा द्रविडांशी त्यांचं साधर्म्य आहे, ते 'निलगिरी' मधील 'इरुला' जमातीचे असावेत, ते शेतीचं तंत्र पश्चिम आशियातून शिकले होते इत्यादी मुद्दे त्यांनी तेव्हा प्रामुख्याने मांडले होते. (पहा- Economic Times, 13-06-2018 व India Today, 31-08-2018.) पण या व्याख्यनात त्यांनी वेगळेच मुद्दे मांडले आहेत. 
३. या देशातील लोकांचे पूर्वज ११००० वर्षांपूर्वी भारतात आले असं एकीकडे म्हणत असताना डॉ. शिंदे Aryan Invasion Theory नाकारत आहेत हे विसंगत आहे. 
४. राखीगढीमधील सांगाड्यांचे डी. एन. ए., त्यांची भांडीकुंडी, घरे हे हल्लीच्या हरियाणातील लोकांच्या जीवनशैलीशी जुळत आहे असं आता डॉ. शिंदे म्हणत आहेत. मग 'इरुला' लोकांचं काय झालं ? आणि अन्य भारतीय वंशजांचं काय करायचं ? 
५. वैदिक संस्कृती राखीगढीवाल्या लोकांनीच निर्माण केली असं आता डॉ. शिंदे सांगत आहेत. पण ऑगस्ट २०१८ मध्ये या लोकांचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचं ते सांगत होते. 
६. काश्मीर ते केरळ आणि अफगाणिस्तान ते बंगाल यांमधील लोकांचे (त्यांचे जाती-धर्म कोणतेही असोत) पूर्वज हडप्पीयन लोकच होते कारण ६०% हून अधिक लोकांचे डीएनए जुळत आहेत असं या व्याख्यानात डॉ. शिंदे म्हणत आहेत. म्हणजे आर्य आणि द्रविड असा काही प्रकार नव्हता हे ते एकप्रकारे मान्य करत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी आर्य आणि द्रविड अशी विभागणी सांगितली होती. 
७. शेती करायला सर्वप्रथम भारतातच (९००० वर्षांपूर्वी) सुरुवात झाली असं डॉ. शिंदे या व्याख्यानात म्हणत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये भारतीय इराण्यांकडून शेती करायला शिकले असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 


८. हे सर्व सांगून झाल्यावर 'हे फारच लहान नमुन्यावरील संशोधन आहे' हे मान्य करून डॉ. शिंदे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. म्हणजे काही काळानंतर ही अनुमाने चुकीचीही निघू शकतील याचं सूतोवाच त्यांनी आताच करून ठेवलं आहे. 

Thursday, September 6, 2018

राखीगढीचा संदेश  
(The message of Rakhigarhi)
हरियाणातील राखीगढी इथे ४५०० वर्षांपूर्वीचे (म्हणजे इ स पूर्व २५०० च्या दरम्यानचे) मानवी सांगाडे सापडले आहेत. त्यापैकी १४८ सांगाड्यांची जनुकीय चाचणी करून संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की वैदिक आर्य हे मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून (Central Asian Steppe) आले नव्हते. त्यामुळे वैदिक युग निर्माण करणारे लोक हे स्थानिक भारतीयच होते. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू वसंत शिंदे आणि लखनौ येथील बिरबल साहनी डीएनए संस्थेचे प्रमुख नीरज राय यांनी हे निष्कर्ष काढले आहेत.
(संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, १३ जून २०१८) 

या संशोधनाचे निष्कर्ष थोडक्यात खालीलप्रमाणे :- 
१. राखीगढीमधील लोक हे वैदिक संस्कृतीशी संबंध असणारे किंवा ती निर्माण करणारे नव्हते. कारण आर्यांचा निदर्शक म्हणून स्थूलपणे ओळखला जाणारा R1a1  हा जीन त्यांच्यात सापडत नाही.   
२. सध्याच्या भारतीयांशी मात्र त्यांची जनुके जुळतात. 
३. हे लोक आर्य नसून द्रविड होते. (राय यांच्या म्हणण्याप्रमाणे-) हे लोक 'निलगिरी' मधील 'इरुला' या आदिवासी जमातींपैकी असावेत.    
४. उत्तर भारतीयांपेक्षा दक्षिण भारतीयांशीच त्यांचं अधिक साम्य आहे. 
५. मात्र या लोकांचं 'इराणी शेतकरी' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांशी मिश्रण झालं असावं असंही निश्चितपणे दिसून आलं आहे.  (The result show clear evidence of mixing with another population from outside the subcontinent, labelled as 'Iranian Agriculturist'.)   
६. शेतीचं तंत्र या लोकांनी पश्चिम आशियातून आलेल्या लोकांकडून उचललं असावं. 
(संदर्भ - इंडिया टुडे, ३१ ऑगस्ट २०१८)  

माझ्या मते हे निष्कर्ष अत्यंत उतावीळपणे व अन्य शास्त्रांचा विचार न करता किंवा कुठलातरी विशिष्ठ हेतू मनात ठेवून काढले असावेत. याची कारणं खालीलप्रमाणे,

अ) १९२० सालापासून हडप्पा आणि मोहेंजोदडो उत्खनने जेव्हा जेव्हा केली गेली आहेत, तेव्हा तेव्हा निष्कर्ष बदलत गेले आहेत. उदा. सिंधू नावाची संस्कृती इ स पूर्व २००० वर्षांपूर्वी होऊन गेली आणि आर्यांपेक्षा ती वेगळी होती हा पहिला निष्कर्ष होता. त्यानंतर 'पूर्व सिंधू', 'उत्तर सिंधू' वगैरे करत सिंधू संस्कृतीचा काळ मागे जात राहिला. आता तो (हडप्पातील राखीगढीसकट) इ स पूर्व ७००० वर्षांच्या पलीकडे पोहोचला आहे. एवढंच नव्हे, तर ती आर्यांचीच संस्कृती असावी असा अंदाज उत्खननांत सापडलेल्या द्यूतमंडले, यज्ञकुंड, त्रिमुखीदेवी इत्यादींच्या आधारे करण्यात आला आहे. (मधुकर ढवळीकर यांची पुस्तके पहा.) मात्र माझ्या मताप्रमाणे ती आर्य आणि पणि यांची संयुक्त वसाहत असावी. पणि हे स्थानिक आद्य 'व्यापारी' होते.     

ब) वरील संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांचाच तपशील आलाय. भारताला १०,००० वर्षांचा इतिहास आहे हे सदर निष्कर्ष काढताना विसरलं गेलं आहे. शिवाय हे सांगाडे म्हणजे आर्यांचं किंवा तत्कालीन भारताचं 'प्रातिनिधिक चित्र' असल्याचंही गृहीत धरण्यात आलं आहे. याला उतावीळपणाशिहय दुसरं काय म्हणणार ? आर्यांच्या सर्वसमावेशक धोरणामुळे पणि, दास, नाग आदी स्थानिक जमातींशी त्यांनी जमवून घेतलं होतं आणि त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारही केले होते हे सर्वमान्य आहे. अशाच एखाद्या जमातीचीसुद्धा ही जनुके असू शकतील. त्यावरून 'सिंधू संस्कृतीतले लोक आर्य नव्हते' असा सिद्धांत मांडणं अशास्त्रीय आहे.         
क) 'आर्य-द्रविड' ही रॉबर्ट काल्डवेल या मिशनऱ्याने हेतुतः केलेली कृत्रिम विभागणी होती हे भारतातील संशोधकांना केव्हाच मान्य झालं आहे.  त्याने द्राविडी भाषेला दहा विशिष्ट निकष लावून भाषेच्या आधारे ही विभागणी केली होती. पण द्राविडी भाषेचे हे निकष संस्कृत, हिंदी व मराठी भाषेलाही कसे लागू होतात हे आता संशोधकांनी दाखवून दिलं आहे. (पहा- 'The Aryan Problem', १९९३.) शिवाय मनुस्मृतीप्रमाणे 'पंचद्रविड' हे मुळात 'काश्यप' असून काही काळ वैदिक विधी न केल्याने वर्णबाह्य झालेले लोक होते. मात्र पुढे ते एवढे वर्णबद्ध झाले, की आग्नेय आशियातील सर्व देशांमध्ये वैदिक संस्कृती नेण्याचं श्रेय मुख्यतः त्यांनाच जातं. 

ड) मुळात 'आर्य' हा एखादा वंश किंवा भाषिक गट नसून ती एक 'संस्कृती' होती. आर्य हा शब्द ऋग्वेदात ३६ वेळा व यजुर्वेदात १५ वेळा आला आहे. शिवाय अन्य वेद, वैदिक वाङ्मय, योगवासिष्ठ, गीता, महाभारत असा अनेक ठिकाणी तो काहीवेळा आला असून बहुतेकदा तो 'संस्कृती' या अर्थानेच आला आहे. त्यामुळे आर्य म्हणजे उंच, गोरे व नाकेले असलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण गंमत म्हणजे 'राखीगढीमधील पुरुष हे आजच्या हरियाणामधल्या पुरुषांप्रमाणेच ६ फूट उंच आणि तरतरीत नाकडोळे असलेले होते' असंही शिंदे म्हणतात. (संदर्भ - आऊटलूक, १३ ऑगस्ट २०१८) मग द्रविडी जनुके आणि उंच, गोरे, तरतरीत नाकडोळे ही आर्यांची शारीरिक वैशिष्ट्ये एकमेकांशी कशी जुळू शकतात हे जनुकतज्ञ नीरज राय यांनी दाखवून द्यायला पाहजे होतं. पण तसा खुलासा त्यांनी केलेला नाही. या दोन संशोधकांतच एकवाक्यता नाही असं इथे दिसून येत आहे.     

इ) आर्य (किंवा वैदिक) संस्कृती निर्माण करणारे लोक हे 'मध्य आशिया'तून आलेले कधीच नव्हते. ते आर्मेनिया, अझरबैजान आणि इराण या कश्यप समुद्राच्या (Caspian sea) पश्चिम किनाऱ्यावरील देशांमधून (म्हणजे पश्चिम आशियातून) भारतात आले हेच सत्य आहे. वरील निष्कर्षांमधूनही अंशतः का होईना, पण तेच सिद्ध होत आहे. काही काळाने ते पूर्णतः सिद्ध होईल यात शंका नाही.  

फ) जनुकीय चाचणी करणाऱ्यांची पात्रता व निष्कर्षांची अचूकता नेमकी काय आहे हाही एक प्रश्नच आहे. 'Current Biology' या वैज्ञानिक नियतकालिकात ७ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनुकीय निष्कर्षांप्रमाणे 'फिनिश लोक वगळता युरोपातील बाकीचे सर्व लोक हे नॉर्डिक व कोकेशियन वंशाचे आहेत. ते आर्य नाहीत'. भारतीय हे अर्थातच त्यांनी आर्य ठरवले आहेत. जयंत नारळीकर संपादित 'Nature'  या वैज्ञानिक साप्ताहिकात (२३ सप्टेंबर २००९) अमेरिकेतील मेरीलँड मधील 'हॉपकिन्स' संस्थेतील जनुक संशोधक अरविंद चक्रवर्ती म्हणतात, 'बहुतेक भारतीय जनुकीय दृष्ट्या एकच आहेत'. तुम्ही जर इंटरनेटवर उत्तर व दक्षिण भारतीयांच्या जनुकीय चाचणीविषयी शोध घेतलात, तर तुम्हाला वेगवेगळे निष्कर्ष पाहायला मिळतील. आर्य आणि द्रविड हे 'वेगळे आहेत' किंवा 'वेगळे नाहीत' अशी दोन्ही टोकाची मते पाहायला मिळतील. याचाच अर्थ कुठलीही एक जनुकीय चाचणी ही बरोबर असल्याचं गृहीत धरता येणार नाही आणि त्यावर अवलंबून राहता येणार नाही. अन्य शास्त्रांचाही आधार घ्यावा लागेल. शिंदे-राय जोडगोळीने तो घेतलेला नाही. म्हणून मी त्यांच्या निष्कर्षांना 'उतावीळ निष्कर्ष' म्हणतो.
तात्पर्य,  
१. या जनुकीय संशोधनातून 'वैदिक युग' निर्माण करणारे 'स्थानिक' लोक होते हे अजिबात सिद्ध होत नाही.   
२. 'आर्य' ही ज्यांची संस्कृती होती ते लोक पश्चिम आशियातून अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी  भारतात आले. पण या संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीचे सांगाडे विचारात घेतले आहेत.    
३. आर्य आणि द्रविड हे मुळात वेगळे नव्हते. पण इथे ते वेगळे असल्याचं मानलं आहे.   
४. बाहेरून आलेल्या आर्यांचं पणि, दास, नाग इत्यादी स्थानिक जमातींचं बेमालूम पण अभिमानास्पद असं सांस्कृतिक सामरस्य झालं आहे. पण या संशोधनाने त्याची दखल न घेताच निष्कर्ष दिले आहेत.    

एकंदरीत 'राखीगढी' चा काही 'संदेश' असला तर तो हाच आहे, की केवळ जनुकीय शास्त्राच्या आधारे उड्या न मारता मानववंश, खगोल, पुरातत्व, साहित्य इत्यादी अन्य शास्त्रेही पडताळून पहा व मगच निष्कर्ष काढा. 
दुर्दैवाने शिंदे आणि राय यांनी हे केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.             

Monday, July 9, 2018

धोकादायक मार्क्सवादी इतिहासकार 
(Dangerous Marxist Historians) 
भारतीय इतिहासाचं नुकसान करणाऱ्या इतिहासकारांचे माझ्या मते तीन गट पडतात. 
पहिला; कष्टाळू पण इंग्रजांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या 'उपकृत' इतिहासकारांचा.  
दुसरा; तथाकथित 'देशभक्त' नि टोकाच्या हिंदुत्ववादी इतिहासकारांचा. 
आणि तिसरा; छुप्या वा उघड कम्युनिस्ट इतिहासकारांचा.      
वरील तिघांपैकी भारतीय इतिहासाचं सर्वात जास्त नुकसान कुणी केलं असेल, तर ते कम्युनिस्ट किंवा मार्क्सवादी इतिहासकारांनी केलं आहे. हे इतिहासकार भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत 'धोकादायक' आहेत असं एकंदरीत माझं मत झालंय.   
१९६२ च्या चीन युद्धात देशद्रोह करणाऱ्या कम्युनिस्टांचा वारसा आजही चालवणाऱ्या या इतिहासकारांची लक्षणं त्यांच्या पुस्तकांमधील वा व्याख्यानांमधील खालील मांडणीवरून ओळखता येतात -  
१. इंग्रजांची (बनावट) कालगणना खरी मानणे व भारतीय इतिहास वाटतो तितका 'प्राचीन' नसल्याचे भासवणे. 
२. आर्यांपेक्षा अनार्यांची किंवा असुरांची संस्कृती 'उच्च' मानणे नि आर्यांची संस्कृती 'हीन' दाखवणे.    
३. रामायण व महाभारत ही केवळ 'काव्येच' आहेत असे सांगणे. 
४. राम किंवा कृष्णासारखे लोकोत्तर पुरुष आर्य नसून अनार्य, असुर, परदेशी किंवा काल्पनिक मानणे.     
५. 'मनुस्मृती' सारखे प्राचीन ग्रंथ बदनाम करणे व चार्वाकांसारख्या भोगवादी पाखंड्यांचे अनावश्यक उदात्तीकरण करणे. 
६. आर्य- अनार्य, वैदिक- अवैदिक, ब्राह्मण- ब्राह्मणेतर अशाप्रकारचे वाद नव्याने उकरून काढून समाजात फूट पाडणे.   
हे सगळं करण्यामागे एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे 'भारतीय इतिहास व संस्कृती किती क्षुद्र व थिटी आहे; आणि मार्क्सवाद हाच त्यावर एकमेव अक्सीर उपाय कसा आहे' हे भारतीयांच्या मनावर बिंबवणं. कुठलाही अभ्यास न करता स्वतः ला 'बुद्धिवादी' समजणारे सुशिक्षित पण 'अर्धवट' लोक याला बळी पडतात नि या इतिहासकारांचं फावतं.             
ज्या मार्क्सवादी इतिहासकारांनी हे सगळं केलं यापैकी काहीजणांची यादी इथे देणं औचित्यपूर्ण ठरेल. 
ही यादी अशी,  
१. दामोदर कोसंबी
२. रोमिला थापर 
३. राम शरण शर्मा 
४. कॉ. शरद पाटील 
५. नरहर कुरुंदकर 
६. डॉ. आ. ह. साळुंखे 
या यादीतले काही इतिहासकार उघडपणे आपण मार्क्सवादी असल्याचं कबूल करतात, तर उरलेले मानवतावादाचा मुखवटा तोंडावर चढवून आपण मार्क्सवादी असल्याचं नाकारत असतात. मात्र त्यांची कृती व कलाकृती यावरून ते कोण आहेत हे उघड दिसून येत असतं. यातली काही मंडळी मानवाधिकार किंवा सांस्कृतिक किंवा इतिहास विषयक समित्यांमध्ये घुसून मोक्याच्या जागा पटकावतात आणि आपलं इप्सित साध्य करून घेतात. अशा या धोकादायक  इतिहासकारांच्या विषग्रस्त मांडणीची थोडक्यात उदाहरणं देतो.  

कोसंबी हे 'आर्य स्थानिक अनार्यांच्या तुलनेत सुधारलेले नव्हते' असं निराधार विधान करतात. (पृ. ८२, 'प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता') 'वेद हे बायबलच्या तुलनेत कमी आहेत' (पृ. ८५),  'कृष्ण हा असुर होता', आजचे (जिजाबाईच्या माहेरचे) जाधव उर्फ यादव हे बनावट आहेत (पृ. १२८ ते १३५) अशी अफाट व निराधार विधानही ते करतात.
रोमिला थापर आपल्या 'Ancient Indian Social History'  या पुस्तकात 'महाभारताचा इ.स.पूर्व ३१०२ हा काळ खोटा आहे' (पृ.२८५), 'पुराणांतल्या वंशावळी खोट्या आहेत' (पृ. २५५), 'आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृतीच उच्च होती' (पृ. २५६), 'ऋग्वेद प्राचीन नाही' (पृ. २५७) असं उच्चारवाने सांगतात. 
'Communalism and the Writing of Indian History' या ग्रंथातही रोमिलाबाई 'भारतीय इतिहासाचे अकारण उदात्तीकरण केले आहे' (पृ. ५), 'वैदिक किंवा हिंदू यांच्यापेक्षा बौद्ध आणि परदेशी लोकांनीच भारतीय कला नि संस्कृती श्रीमंत केली आहे' (पृ. ११) अशा अर्थाची विधाने बिनबोभाटपणे करतात.  
(खुलासा : अलीकडे मात्र रोमिलाबाईंना उपरती होऊ लागली आहे हे त्यांच्या युट्यूबवरील मुलाखती पाहून लक्षात येतंय. पुराणे विश्वसनीय आहेत, रामायण-महाभारत खरोखरच घडून गेलं, महाभारत काळ इ.स.पूर्व ३१०२ हा आहे इत्यादी गोष्टींवर आता त्यांचा विश्वास बसू लागल्याचं दिसत आहे. भारतीय इतिहास नि संस्कृती आधी 'हीन' लेखून नंतर ती 'महान' असल्याची उपरती झाल्याचं मॅक्सम्युलरनंतरचं माझ्या समजुतीप्रमाणे हे पाहिलंच उदाहरण.)

दोन वेळा भारत सरकारचा 'पद्मभूषण' 'किताब नाकारणाऱ्या रोमिलाबाईंनी २००८ साली पाच लाख डॉलरचं (साडेतीन कोटी रुपये) 'क्लुग' नामक अमेरिकन पारितोषिक स्वीकारायला मात्र अनमान केला नाही. कम्युनिस्टांचा अड्डा असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केलं आहे. २०१८ साली काही माओवादी विचारवंतांना पोलिसांनी अटक केल्यावर त्याविरोधात पहिली याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या रोमोलाबाईंनी आपण कोण आहोत हे पुन्हा एकदा कृतीनेच सिद्ध केलं होतं    

राम शरण शर्मा यांचीही सगळी मांडणी मार्क्सवादी आणि हिंदू विरोधी असल्याचं दिसून येतं. 'प्राचीन भारत' नामक दहावीच्या पाठ्यपुस्तकात 'रामायण आणि महाभारत घडलं याला काही पुरावा नाही' असं ठाम विधान करून त्यांनी तरुण मुलांच्या मनात भारतीय इतिहासाविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या पुस्तकावर १९७७ मध्ये जनता पक्षाला बंदी घालावी लागली होती. अयोध्या आणि गुजरात दंगल प्रकरणांमध्ये शर्मा यांनी नेहमीच मुसलमानांची बाजू घेतली आहे. अयोध्या हे हिंदूंचं तीर्थक्षेत्र असल्याचा कुठलाही पुरावा नाही असं ते ठासून सांगतात.      

कॉ. शरद पाटील यांनीही आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृती कशी 'उच्च' होती हे सांगण्यात हयात घालवली आहे. याबाबतीत त्यांची मजल एवढ्या पुढे गेलीय, की 'वर्णव्यवस्था ही मुळात अनार्यांची होती व ती पुढे आर्यांनी उचलली' असं सांगायलाही त्यांनी कमी केलेलं नाही. मात्र आधीची व्यवस्था 'समतेवर' आधारित होती तर नंतरची (म्हणजे आर्यांची) 'विषमतेवर' आधारित बनली' (पृ. ५, प्रस्तावना, 'दासशूद्रांची गुलामगिरी' खंड १ भाग २) असं निराधार विधान करून त्यांनी तो विषय गुंडाळला आहे. 'नैऋती' या वेदातील 'अशुभा'च्या देवतेला ते अनार्यांची देवता ठरवून 'सुपीकतेची'ही देवता ठरवायला जातात (पृ. ३ व ४) हा सुद्धा असाच एक निरर्थक अभिनिवेशाचाच प्रकार होय.

नरहर कुरुंदकर हे एकाच वेळी अनेक डगरींवर हात ठेवणारे महाराष्ट्रातील एक 'तुच्छतावादी' विद्वान. आपण 'मार्क्सवादी' असल्याची कबुली त्यांनी 'मनुस्मृती' या त्यांच्या पुस्तकात दिली आहे. (पृ. ८७ पहा.) 'मनू अस्पृश्यता पाळत नाही' असं डॉ. आंबेडकरांचं मत होतं. पण कुरुंदकर त्यांना खोडून काढतात व म्हणतात, 'मनू अस्पृश्यता पाळतो असे माझे मत आहे.' (पृ. ६५) या विधानाच्या पुष्ट्यर्थ कुरुंदकर 'प्रक्षिप्त' म्हणून उघडपणे माहीत असलेल्या श्लोकांची तीच तीच उदाहरणे देत राहतात. चार्वाकाला तर कुरुंदकर आर्यांपेक्षा अधिक मार्क देतात आणि 'ते काळाच्या १५०० वर्षे पुढे होते' असं आधारहीन विधान करतात. (पहा, 'लोकायत' हा लेख, मागोवा, देशमुख आणि कं.)
डॉ. आ.ह.साळुंखे यांच्यावर एरीक फ्रॉम या मार्क्सवादी विचारवंतांच्या साहित्याचा प्रभाव आहे. त्यांनी फ्रॉम याच्या एका पुस्तकाचा अनुवादही केलाय. कुठलाही हाडाचा मार्क्सवादी समता आणि मानवतावाद यांचा नेहमी  उद्घोष करत असतो तसा फ्रॉम आणि त्यांचे शिष्य डॉ. साळुंखेही तो कायम करताना आढळतात.मात्र प्रत्यक्षात ही मंडळी द्वेषाची पेरणी करण्यात मग्न असतात. डॉ. साळुंखे यांनी चार्वाकावर चक्क 'पीएचडी' च केली असून त्याला त्यांनी 'आस्तिक शिरोमणी' ही ठरवून टाकलं आहे. आपल्या तल्लख नि लबाड युक्तिवादाने ते आर्य, वैदिक, ब्राहमण यांच्यावर सातत्याने झोड उठवून अनार्य, असुर, चार्वाक अशा आता अस्तित्वात नसलेल्या गोष्टी उकरून काढत असतात नि समाजाचा बुद्धिभेद करून मानसिक व भावनिक फूट पाडत असतात. वानगीदाखल त्यांचे 'ना गुलाम, ना उद्दाम', 'चार्वाक दर्शन', 'बळीवंश' वगैरे ग्रंथ वाचून पाहावेत. ते वाचले म्हणजे संभाजी ब्रिगेड सारख्या समाजद्रोही संस्था कुठल्या विचार प्रवाहातून निर्माण झाल्या आहेत हे ताबडतोब लक्षात येऊ शकतं. असो. 
माझ्या परीने मी यातल्या बहुतेकांची मते 'साधार' खोडून काढली असून समाजातील एकात्मता व सौहार्द टिकवण्याचा नि आपल्या भव्य इतिहासाला चूड लागू न देण्याचा प्रयत्न माझ्या पुस्तकांमधून नि ब्लॉगमधून केला आहे. पण हा लेख लिहिण्यामागचा मुख्य हेतू तरुण इतिहास-अभ्यासकांनी सतत सावध राहून कोणतेही पूर्वग्रह न बाळगता आपला अभ्यास करावा हाच आहे. तो साध्य झाला तरच आपल्या पुराणेतिहासाला काही भवितव्य आहे.

Thursday, January 5, 2017

राजसंन्यास : मराठी साहित्याचं एक सौंदर्यलेणं !
राम गणेश गडकरी यांना 'मराठी भाषेचे शेक्सपियर' असं म्हटलं जातं, कारण शेक्सपियरने जशा अजरामर व्यक्तिरेखा नाटकांमधून निर्माण केल्या तशाच गडकरी यांनीही आपल्या मोजक्या नाटकांमधून निर्माण केल्या. शेक्सपियर अभ्यासक विनय हर्डीकर यांच्या मते शेक्सपियरच्या चाळीसएक, तर गडकरी यांच्या जवळपास पंधरा व्यक्तिरेखा अमर ठरल्या आहेत. 'हॅम्लेट' ज्याप्रमाणे शेक्सपियरची सर्वोत्कृष्ट कलाकृती मानली जाते, त्याप्रमाणेच गडकरी यांची 'राजसंन्यास' (अपूर्ण असूनही) सर्वोत्कृष्ट मानली जाते. हे नाटक १०० वर्षांपूर्वी लिहिलं गेलं तेव्हा छत्रपती संभाजीराजांवर फार संशोधन झालं नव्हतं आणि त्यांच्यावर काही दोषारोप केले जात होते. तरीही गडकरी यांनी संभाजीला नायक बनवून अशा चतुराईने मांडणी केली आहे की प्रचलित समज आणि त्यांचं खंडन हे तिथल्या तिथेच होऊन जातं. 'संभाजीची बदनामी झाली' असा निर्बुद्ध आरोप ज्यावरून आज होतोय  तो ५ व्या अंकातील मजकूर म्हणजे संभाजीचे आत्मनिर्भत्सनेचे संवाद आहेत. आत्मप्रौढी किंवा आत्मनिर्भत्सना या भावनेच्या भरात केल्या जात असल्यामुळे त्यात सत्याचा अंश फारच थोडा असू शकतो. याउलट अन्य कुणी केलेल्या विश्लेषणात किंवा खंडनात सत्याचा अंश जास्तीत जास्त असण्याचा संभव असतो. या नाटकात साबाजीसारखी पात्रं संभाजीवरील आरोप खोडून काढतात आणि राजा किती महान शूरवीर आहे हे पुन्हा पुन्हा सांगत राहतात. पण सोयीचा तेवढा भाग घेऊन धूर्त किंवा निर्बुद्ध लोक अकारण वाद निर्माण करत असतात. या नाटकाचा पहिला, तिसरा नि पाचवा अंकच केवळ गडकरी यांनी लिहिला होता व दुसरा नि चौथा लिहिण्यापुर्वीच ते वारले. (कोल्हटकर-गडकरी-अत्रे या प्रतिभाशाली गुरुशिष्य परंपरेत शेवटचा अंक आधी लिहिणे, मधला शेवटी लिहिणे वगैरे गोष्टी होत होत्या. उदा. 'तो मी नव्हेच !' ) तरीही मांडणीच्या, भाषेच्या नि व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून हे अपूर्ण नाटक मराठी भाषेचं एक सौंदर्यलेणं ठरलं आहे. आजच्या गडकरीद्वेषाच्या लज्जास्पद पार्श्ववभूमीवर प्रत्येकाने ते जरूर वाचून काढावं आणि गडकरी यांना एक आगळीच आदरांजली वाहावी ही विनंती. (खाली नाटकाची लिंक देत आहे.)                     

Saturday, August 20, 2016

आ.ह. सरांचे निरर्थक चार्वाकस्तोम

महाराष्ट्रातील अन्य विद्वानांच्या तुलनेत डॉ. आ.ह.साळुंखे यांनी चार्वाकमताचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी चार्वाकावर चक्क पी.एच.डी. च केली असून ‘चार्वाक दर्शन’ नामक पुस्तकही लिहिलं आहे.
डॉ. आह हे चार्वाकमताचा पुरस्कार तर करत असतातच, पण त्याला त्यांनी ‘आस्तिक शिरोमणी’ ही ठरवून टाकलं आहे. तसं ते ठरवण्यापूर्वी त्यांनी दयानंद सरस्वती आणि विवेकानंद या दोघा महत्वाच्या धर्माज्ञांनी केलेलं चार्वाकमताचं खंडन विचारात घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाला काहीसा अपूर्णपणा प्राप्त झालेला आहे. तथापि दयानंद आणि विवेकानंद यांच्या खंडनाचा फारसा विचार न करता या पुस्तकातील काही मुद्द्यांचा परामर्श मी स्वतंत्रपणे इथे घेत आहे.

१.       चार्वाक या शब्दाचा अर्थ डॉ. आह हे ‘चारु वाक’ म्हणजे ‘गोड बोलणारा’ असा लावतात. मात्र दयानंद यांनी ‘चार वाक’ म्हणजे ‘वितंडवाद घालत बसणारा’ अशी व्युत्पत्ती सांगितली आहे. शिवाय ‘चारु’ या शब्दाचा अर्थ ‘सुंदर’ असा होतो, ‘गोड’ असा होत नाही. एखाद्याचं बोलणं गोड आहे असं सुचवायचं असेल तर त्यासाठी ‘इक्षु’ किंवा ‘मधु’ असा शब्द योजावा लागेल. आर्यांच्या पहिल्या राजांपैकी एक जो ‘इक्ष्वाकु’ त्याच्या नावाचा अर्थ ‘गोड बोलणारा’ असाच होता. कारण इक्षु म्हणजे (गोड रस देणारा) ऊस. पण इथे मुख्य समस्या वेगळीच आहे. चार्वाकांच्या बाजूने विचार केला तर ते गोड किंवा सुंदर बोलत नसून ‘सत्य’ किंवा ‘परखड’ बोलत होते असं म्हणणं संयुक्तिक होईल. मग ‘चारु’ हा शब्द वापरायचा संबंध येतोच कुठे ? त्यामुळे आह यांनी ओढून ताणून लावलेली ही व्युत्पत्ती स्वीकारता येत नाही.

२.      चार्वाकांचे स्वतःचे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. त्यांचं जे काही तत्वज्ञान माहीत झालंय ते वैदिक वाड्मयातून त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळेच माहीत झालंय हे डॉ. आह यांना मान्य आहे. मात्र उदयन राजाची पुराणातली एक वेडगळ कथा देऊन त्यावरून ‘वैदिकांनी चार्वाकांचे ग्रंथ जाळलेही असतील’ असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. परंतु हा पुरावा समाधानकारक वाटत नाही. कारण त्यात बुद्धीला न पटणारे काही चमत्कार दिले आहेत. शिवाय जो उदयन राजा भासाच्या दोन नाटकांचा व कथासरीत्सागर वगैरे अनेक ग्रंथांमधल्या कथाकवितांचा सालस, उदार, सभ्य व शूर नायक होता त्याचा या कथेतला आततायीपणा पटण्यासारखा नाही. वादाकरता वैदिकांनी ग्रंथ जाळले असं मानलं तरी चार्वकांनी ते मौखिक पद्धतीने जतन का केले नाहीत हा प्रश्नही उरतोच. कारण मौखिक पद्धतीने प्रचंड वाड्मय जतन करता येतं हे खुद्द वैदिकांनीच सिद्ध करून दाखवलं आहे. खरी गोष्ट अशी आहे की चार्वाकांचे ग्रंथ कधी नव्हतेच तर ते आज मिळणार कसे !

३.      चार्वाकमताची स्थापना देवांचा पुरोहित बृहस्पती याने केली असं मानलं जातं. बृहस्पती वैदिक संस्कृतीपासून दूर का गेला व त्याने चार्वाक पंथ का स्थापन केला याचं कारण सांगण्यासाठी म्हणून आह यांनी एक कथा दिली आहे. त्या कथेप्रमाणे ‘द्विजांचा राजा’ असलेल्या सोमाने एका यज्ञसमारंभातून बृहस्पतीच्या पत्नीला पळवून नेलं. त्यामुळे आर्यांच्या तथाकथित महान संस्कृतीमधील ढोंगबाजी बृहस्पतीच्या लक्षात आली व तो त्या संस्कृतीचा कट्टर विरोधक बनला.
ही कथा आहसरांनी स्वतःच्या मतप्रतीपादानासाठी सोयीस्कर अशा पद्धतीने सादर केली आहे. कारण बृहस्पतीची पत्नी तारा व सोम यांची कथा महाभारतातील वनपर्वात (२१९) आणि देवीभागवतामध्ये (स्कंद १ अध्याय ११) आली आहे व ती कथा काही वेगळंच सांगते.
ती कथा अशी :
पुराणकाळी सोम हा अतिशय सामर्थ्यशाली बनला होता तेव्हा त्याने राजसूय यज्ञ केला.
या यज्ञानंतर त्याच्यावर अभिषेक होत असताना तो एवढा तेजस्वी व देखणा दिसत होता की तिथे उपस्थित असलेल्या नऊ देवता त्याच्या प्रेमातच पडल्या. त्यातही सोमाचा गुरु बृहस्पती याची पत्नी तारा ही तर त्याच्यासाठी प्रेमविव्हलच झाली. त्यानंतर ती स्वतःहून सोमाकडे जाऊन राहिली. बृहस्पतीने निरोप पाठवूनही ती परत आली नाही. म्हणून अखेर बृहस्पती स्वतःच सोमाकडे गेला व त्याची निर्भत्सना करू लागला. तेव्हा सोम त्याला म्हणाला, ‘ती आपणहून इथे येऊन राहिली आहे. मी काही तिला कैद करून ठेवलेलं नाही. जेव्हा तिला ही मौज पुरेशी वाटेल तेव्हा ती तुमच्याकडे परत येईल !’ त्याने त्याला याचीही आठवण करून दिली की (त्यावेळच्या धर्माप्रमाणे) ‘परपुरुषाशी संभोग करूनही स्त्रिया भ्रष्ट होत नसतात.’ नंतर त्याने बृहस्पतीला ग्वाही दिली की ‘तिची पाळी आल्यावर ती तुमच्याकडे येईल.’ तेव्हा बृहस्पती काही दिवस थांबला व पुन्हा सोमाकडे गेला. पहारेकरी आत सोडेनात म्हणून तो आरडाओरडा करू लागला. म्हणून सोम बाहेर येऊन आपल्या गुरूला म्हणाला, ‘तुम्ही असं वेड्यासारखं का बोलत आहात ? तुमची सुंदर पत्नी इथे आहे हे खरं, परंतु संभोगात तुम्ही तिचं समाधान करू शकत नसल्यामुळे ती तुमच्याकडे येऊ इच्छित नाही. नाहीतरी तुमच्यासारख्या भिक्षुकाला असलं स्त्रीरत्न शोभण्यासारखं नाही, त्यापेक्षा तुम्ही एखादी कुरूप स्त्री का निवडत नाही ? एकंदरीत तुम्हाला कामशास्त्राची माहिती आहे असं मला वाटत नाही.’

याबाबत आपण आता अधिक काही करू शकत नाही हे लक्षात आल्यावर बृहस्पतीने इंद्राकडे तक्रार केली. तेव्हा इंद्राने सोमाला जाब विचारला. तो म्हणाला, ‘हे सोमा, तुला २८ पत्न्या आहेत. शिवाय तुझी इच्छा असेल तर तू उर्वशी व मेनका यांचाही उपभोग घेऊ शकतोस. पण गुरु पत्नीशी संभोग करणं ही वाईट गोष्ट आहे.’ तेव्हा सोम म्हणाला, ‘तारा स्वतःहून माझ्याकडे आली होती आणि अजूनही ती आनंदात आहे. ती बृहस्पतीचा तिरस्कार करते कारण त्याने स्वतः ही व्यभिचार केला आहे.’
अखेर युद्धापर्यंत पाळी येऊन ठेपली. तेव्हा ब्रह्माने हस्तक्षेप करून सोमाला समजावलं. सोमाने मग तारा हिला बृहस्पतीकडे परत पाठवलं. त्यावेळी ती गर्भार होती. हे मूल सोमाचं असल्याचं तिने सांगितलं व सर्वांना ते मान्य करणं भागच पडलं. या मुलाचं नाव ‘बुध’ ठेवण्यात आलं. या बुधाचाच इलेपासून झालेला मुलगा म्हणजे विख्यात राजा पुरूरवा.

या कथेवरून हे स्पष्ट होतंय की तारा आपणहून सोमाकडे जाऊन राहिली होती, सोम तिला बळजबरीने घेऊन गेला नव्हता. दुसरं म्हणजे युद्ध न होताच सोमाने ताराला परत पाठवलं हेही या कथेतून दिसतं. डॉ. आह मात्र ‘असुरांच्या मदतीने युद्ध करून बृहस्पतीने ताराला सोडवून आणली’ असं अवाजवी विधान या पुस्तकात करत आहेत. तिसरं म्हणजे आह म्हणतात तसं सोमाने बळजबरीने तारेला आपल्या घरी नेलं असं गृहीत धरलं तरी बृहस्पतीला फार तर सोमाचा राग यायला हवा होता. संपूर्ण वैदिक जमातीचा राग येण्याची काय गरज होती ? शिवाय या प्रकरणात इंद्र, ब्रह्मा वगैरेंनी बृहस्पतीच्या बाजूने मध्यस्ती केल्याचंही दिसत असताना बृहस्पतीला वैदिक संस्कृतीचा उबग येण्याचं कारण काय हेही कळत नाही. हा चक्क वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार झाला. तात्पर्य, बृहस्पती वैदिक संस्कृतीपासून का दुरावला याविषयीच्या आह यांच्या विवेचनात अजिबात दम वाटत नाही.

४.      प्रस्तुत पुस्तकात डॉ. आह म्हणतात, ‘गम्यागम्याचा विचार न करता समागम करणारे ते कापालिक व याज्ञिक होत, चार्वाक नव्हेत ! बृहस्पतीने लैंगिक उच्छृंखलतेला नेहमीच विरोध केला  होता !’ पण आह हे ज्या बृहस्पतीची एवढी कड घेत आहेत त्या बृहस्पतीचं स्वतःचं वर्तन काय होतं याची कथा कुप्रसिद्धच आहे. महाभारतात (आदीपर्व ९८) ही कथा दिली आहे. शिवाय राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ (पृष्ठ ७) या महत्वपूर्ण पुस्तकातही या कथेचा प्रामुख्याने उल्लेख आहे. म्हणजे आह यांच्या निश्चितच ती वाचनात आली असणार. मग त्यांनी वाचकांपासून ती दडवून का ठेवावी असा प्रश्न पडतो. ती कथा थोडक्यात खालीलप्रमाणे,
‘उतथ्य नावाच्या ऋषीची ममता ही पत्नी होती व तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. एकदा उतथ्याचा
धाकटा भाऊ बृहस्पती, जो देवांचा पुरोहित होता; तो थोरला भाऊ जवळ नसताना ममतेकडे गेला व
तिच्याकडे भोग मागू लागला तेव्हा तिने त्याला ती गर्भवती असल्याचं सांगितलं. तरीही तिचं न
ऐकता त्याने तिला बळजबरी करून भोगलं. त्यामुळे तिच्या गर्भावर परिणाम होऊन तिच्या पोटी
अंध पुत्र जन्माला आला, तो म्हणजे दीर्घतमस ऋषी होय.’

जो बृहस्पती आपल्या भावजयीशी संभोग करू इच्छितो व ती गर्भवती असताना आणि ‘नको नको’
म्हणत असतानाही जबरदस्ती करून तिला भोगतो त्या बृहस्पतीची नैतिक पातळी काय असणार हे
वरील कथेवरून उघड दिसत आहे. स्वतः असं अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या बृहस्पतीला (आणि आह
यांनाही) वैदिकांच्या तथाकथित अनैतिकतेवर तुटून पडण्याचा अधिकार कसा पोहोचतो हे समजत
नाही ! शिवाय या पूर्वी दिलेल्या कथेत खुद्द बृहस्पतीची बायको तारा हीच आपल्या नवऱ्याला
‘व्यभिचारी’ म्हणत आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी. बृहस्पतीच्या या वर्तनामुळे त्याच्या
चार्वाकीय तत्वज्ञानाला नैतिक बैठक आहे असं मानणं तर्कशुद्ध होणार नाही.
  
५.     व्यभिचारी बृहस्पतीचा कैवार घेणारे डॉ. आह असुरांना वैदिकांपेक्षा अधिक ‘नीतिमान’ वगैरे समजतात आणि चार्वाक तत्वज्ञान बृहस्पती असुरांकडून शिकला असावा असा अंदाज व्यक्त करतात. त्यासाठी ते प्रल्हादालाही जबरदस्तीने चार्वाकांमध्ये ओढायचा प्रयत्न करतात. पण हे सर्व आह यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. असुर बुद्धिमान व सामर्थ्यशाली नव्हते असा दावा वैदिक वाड्मयात केव्हाही केला गेलेला नाही. किंबहुना ते ‘देवांना तुल्यबळ’ होते हेच वैदिक वाड्मयातून सूचित केलेलं आहे. शिवाय वैदिकांनी शक्य तिथे असुरांशी युती केली आहे (उदा. प्रल्हाद), त्यांच्या कौशल्याचा वापर करून घेतला आहे (उदा. मयासुर) व त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारही केले आहेत (उदा. भीम-हिडींबा) याचे दाखले पुराणांमधून मिळतात. मात्र असुर हे भोगवादी व जुलमी होते असे आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत. गीतेत त्यांच्या भोगवादावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. डॉ. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या म्हणण्यानुसार ‘असुषु रमन्ते इति असुरः !’ म्हणजे ‘जे केवळ आपले प्राण टिकवण्यासाठी भोगात रममाण होतात ते असुर होत’. (पहा- ‘दशावतार’) कदाचित म्हणूनच ‘असुर संहारुनी तारावे भक्त’ असं तुकोबांनी म्हटलं असावं. (अभंग ४१३३) त्यामुळे भोगवादी मानल्या गेलेल्या चार्वाकानी असुरांकडून प्रेरणा घेतली असू शकेल, परंतु असुर किंवा चार्वाक ‘नीतिमान’ होते याला कसलाही आधार नाही.

६.      डॉ. आह पुढे म्हणतात, ‘चार्वाक सामान्यतः नास्तिक समजले जातात. पण नास्तिकतेचा आणखी एक अर्थ असून हा अर्थ पाणिनीच्या ‘अस्ति नास्ति दिष्ट्म मतिः’ या सूत्राच्या (४-४-६०) आधारे केला जातो. ‘आहे अशी ज्याची मती आहे तो आस्तिक व नाही अशी ज्याची मती आहे तो नास्तिक’ असं सांगून आह निष्कर्ष काढतात की ‘आहे ते आहे’ असं म्हणणारे आस्तिक आणि ‘नाही ते आहे’ असं म्हणणारे ते नास्तिक असा खरा अर्थ होत असल्यामुळे चार्वाक हेच खरे आस्तिक शिरोमणी ठरतात व अन्य सर्व नास्तिक ठरतात.’

वास्तविक पाणिनीला ‘परलोक आहे असं मानणारे ते आस्तिक, परलोक नाही असं मानणारे ते नास्तिक व दैवावर विश्वास ठेवणारे ते दैष्टिक’ असं म्हणायचं आहे (म.दा.साठे कृत ‘पाणिनी व पाणिनी व्याकरण संप्रदाय’ पृष्ठ ६८) हे पतंजली, कात्यायन व भट्टोजी दीक्षित यांच्यासारख्या महान भाष्यकारांनी स्पष्ट केलं असताना आह अकारण शब्दछल करून अर्थाचा अनर्थ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचं हे ‘विशफुल थिंकिंग’ आहे एवढाच शेरा मारून त्यांच्या मताची बोळवण करायला हवी.
७.     वैदिक संस्कृतीच्या विरोधात बंड करणाऱ्या चार्वाकांमध्येच एखादा बंडखोर निघतो तेव्हा डॉ. आह यांची कशी धांदल उडते हे जयराशीभट्टाच्या उदाहरणावरून पाहता येईल. जयराशीभट्ट हा स्वतःला चार्वाकीय म्हणवतो. मात्र तो इतका बंडखोर निघाला की बृहस्पतीला अभिप्रेत असलेलं ‘प्रत्यक्ष प्रमाण’ सुद्धा त्याने नाकारलं. एवढंच नव्हे, तर चार्वकांनी स्वीकारलेली पंचमहाभूतेही त्याने नाकारली. तो म्हणतो, ‘जे बृहस्पतीला सुचलं नाही ते मला सुचलं ! मी बृहस्पतीच्याही पुढे गेलो !’ पण गंमत म्हणजे जयराशीभट्ट बृहस्पतीच्या पुढे गेला हे आह यांना सहन होत नाही.
ते त्याला चार्वाक मानायला तयार नाहीत, का कोण जाणे ! कारण त्या विधानाचा खुलासा त्यांनी केलेला नाही. ‘त्याला चार्वाक मानणं कठीण आहे’ एवढंच ते म्हणतात. त्यांच्या या भूमिकेला ‘दुटप्पीपणा’ शिवाय काय म्हणणार !
८.      ‘आजची परिस्थिती पाहिली तर शेवटी चार्वाकांचाच विजय झाला !’ असा निष्कर्ष शेवटी डॉ. आह काढतात. त्यासाठी आपल्या घटनेप्रमाणे आपण आज ‘निधर्मी’ कसे बनलो आहोत व चातुर्वर्ण्य व्यवस्था आज कालबाह्य कशी झाली आहे हे ते लक्षात आणून देतात. कारण चार्वाकांचा या दोन्ही गोष्टींना कडाडून विरोध होता.
परंतु आह सरांचा हा दावा पोकळ, आत्मसंतुष्टपणाचा व दिशाभूल करणारा आहे. माझ्या मते गुणकर्माधीष्ठीत चातुर्वर्ण्य व्यवस्था भारतात आज जेवढ्या यशस्वी प्रमाणात चालू आहे तितकी पूर्वी क्वचितच असावी. आज निरनिराळ्या क्षेत्रात प्रतिष्ठा पावलेले तज्ञ व सल्लागार हे एकप्रकारे ‘ब्राह्मण’च म्हणायला हवेत. राज्यांमधले व केंद्रातले राज्यकर्ते व पुढारी हे ‘क्षत्रिय’, वेगवेगळे उद्योगधंदे करणारे ते ‘वैश्य’ व उरलेला सेवा देणारा प्रचंड समाज म्हणजे ‘शूद्र’ होत. (यात लष्करी अधिकारी व सैनिकही आले !) यापैकी कुठल्याही वर्णात जन्मूनसुद्धा एखादा माणूस स्वतःच्या पसंतीने अन्य कुठल्याही वर्णात दाखल होऊ शकतो. याला गुणकर्माधीष्ठीत चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं ?

‘आपण आज निधर्मी बनलो आहोत’ हा आह सरांचा दावाही असाच बाष्कळपणाचा आहे. आपण जर निधर्मी बनलेलो असू तर गल्लोगल्ली बोकाळलेली मंदिरे, त्यातल्या प्रचंड रांगा, रस्तोरस्ती चाललेले गणेशोत्सव किंवा दुर्गोत्सोव हे सगळं कशाचं द्योतक आहे ?

सारांश, चार्वाकाचं अवाजवी उदात्तीकरण करण्याचा डॉ.आ.ह.साळुंखे यांचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात यशस्वी झालेला नाही हे त्यातील मुख्य मुद्दे चिकित्सेच्या कसोटीवर घासून पाहिल्यावर लक्षात येतं एवढंच मला दाखवून द्यायचं आहे.                                                                  .                                   

***