माझ्या मते प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना अभ्यासकासाठी सीरियन शकाचा (Syrian Saka) संदर्भ लक्षात घेणं अपरिहार्य आहे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. त्यामुळे इतिहासाच्या मांडणीत मूलगामी चुका आढळतात. खालील विवेचनावरून हे स्पष्ट होईल.
१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी जेव्हा भारताचा कलकत्ता वगैरे प्रदेश बळकावला होता तेव्हा भारतात मुख्यतः खालील चार शक अस्तित्वात होते,
अ) युधिष्ठिर शक किंवा युगाब्ध - इ. स. पूर्व ३१०१ पासून चालू.
ब) सीरियन शक - इ. स. पूर्व ५५७ पासून चालू.
क) विक्रम संवत - इ. स. पूर्व ५७ पासून चालू.
ड) शालिवाहन शक - इ. स. ७८ पासून चालू.
२. इंग्रजांचा इसवी सन मुळात ६ व्या शतकात सेंट डेनिस नामक माणसाने अंदाजातून निर्माण केला व त्याचा प्रत्यक्ष वापर इंग्लंडमध्ये ८ व्या शतकात हळूहळू सुरु झाला. भारतात हा सन इंग्रजांचं राज्य येईपर्यंत अजिबात वापरला जात नव्हता. (तपशील पहा- पृष्ठ १४-१५, 'आर्यभारत खंड १'.)
३. वर दिलेल्या शकांपैकी सीरियन शक हा पर्शियन सम्राट सायरस द ग्रेट याने चालू केला होता व पुढे कित्येक शतके तो भारतासकट संपूर्ण आशियात वापरला जात होता. कारण अनेक देशांमध्ये पर्शियन सम्राटाची राजवट चालू राहिली होती. सायरसनंतरचा सम्राट डोरियस याच्या 'बेहिस्तून' शिलालेखावर नजर फिरवली तरी त्या काळातील किमान तेवीस देशांवर त्याची सत्ता होती याचे दाखले मिळतात. (तपशील पहा- पृष्ठ ६५-६६,'आर्यभारत खंड ३'.) एवढ्या विशाल साम्राज्याची व्यवस्था पाहणं सुलभ व्हावं म्हणून कोणता तरी एकच शक वापरणं आवश्यक होतं व सीरियन शक हाच तो शक होता. (पहा- प्रा. हरगोविंद होले लिखित 'महाभारत कालगणनेतील षडयंत्र'.)
४. वरील निष्कर्षाला 'नवरोज' मुळे पुष्टी मिळते. इराणी नववर्ष दिनाला 'नवरोज' (Nowruz) असं म्हणतात. सायरस याने ज्या दिवशी त्याच्या साम्राज्याची स्थापना केली त्या दिवसापासून नवरोज सुरु झाला असं मानलं जातं.
दर वर्षी २१ मार्च या दिवशी नवरोज साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे २०२० साली २५७९ हे नवरोज वर्ष आहे. याचा अर्थ इसवी सनापूर्वी ५५९ व्या वर्षी सायरस याने स्वतःचा शक स्थापन केला असा होतो. (दोन वर्षांचा जो फरक पडला आहे त्याचं कारण म्हणजे या पर्शियन पंचांगाप्रमाणे ३६० दिवसांचं एक वर्ष धरलं जातं व ऋतूंप्रमाणे दिवस जुळवून घेण्यासाठी प्रत्येक सहा वर्षांनी तेरावा महिना घातला जातो.) आजही इराण, इराक, जॉर्जिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान, उझबेकस्तान, किर्गिझस्तान, पाकिस्तान, भारत वगैरे वीस एक देशांमध्ये हा नववर्ष दिन 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होत असतो. यावरून पूर्वापार सीरियन शकाचा प्रभाव किती विशाल भू भागावर पडला होता याची कल्पना येते.
५. याच काळात इ. स. पूर्व ४४९ ते इ. स. पूर्व ३४३ या १०६ वर्षांच्या काळात मगध राज्य पर्शियन साम्राज्याचा भाग बनला होता. (पहा: विष्णुपुराण ४-३४.) पुराणांमध्ये या पर्शियन राजांना 'यवन राजे' म्हटलं आहे. पश्चिमेकडून येणारे ते सर्व यवन अशी समजूत त्या काळी प्रचलित झाली असावी. या १०६ वर्षांच्या राजवटीमुळे भारतातही सीरियन शक वापरला जाऊ लागला. ११ व्या शतकात भारतात आलेला अरबी विद्वान अलबेरुनी गुप्तांची कारकीर्द शके २४१ च्या सुमारास सुरु झाली असं म्हणतो तेव्हा त्याला सीरियन शकच अभिप्रेत असतो. कारण शालिवाहन शक वगैरे त्याला माहीत असण्याचा मुळीच संभव नव्हता. त्याचप्रमाणे कनिष्काचा काळ शके ७८ हा होता असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ सीरियन शकाच्या ७८ व्या वर्षाचा तो उल्लेख असतो. पण इंग्रज विद्वानांनी जाणूनबुजून हा उल्लेख शालिवाहन शकाचा किंवा इसवी सनाचा ठरवून भारतीय इतिहास शेकडो वर्षांनी पुढे ओढण्याचा नादानपणा केला.
६. भारताच्या प्राचीन इतिहासाचा काळ पुढे ओढण्याचा उपक्रम इंग्रजांनी एकाच कारणासाठी केला व ते कारण म्हणजे बायबलमध्ये जगाची उत्पत्ती ख्रिस्तापूर्वी केवळ ४००४ वर्षांपूर्वी झाली असा अडाणीपणाचा सिद्धांत मांडला होता. (पहा- जेनेसिस १) तो खोटा ठरू नये म्हणून ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजांनी राज्य केलं, त्या त्या देशांमध्ये त्यांनी ऐतिहासिक घटनांचे काळ पुढे तरी ओढले किंवा त्या घटनाच दाबून टाकल्या. यामुळेच महावीर, बुद्ध, मौर्य, कनिष्क, गुप्त, हर्षवर्धन इत्यादींचे काळ सातशे ते हजार-बाराशे वर्षांनी पुढे दाखवले गेले आहेत व पुराणांमधील काळांशी ते जुळत नाहीत.
७. 'सीरियन शक' असा शब्दप्रयोग अद्याप तरी भारतीय वाङ्मयामध्ये मिळालेला नाही. कदाचित त्याला नुसतंच 'शक' म्हणून संबोधलं जात असावं किंवा नुसतेच आकडे नमूद केले असावेत. मात्र 'सीरिया' या प्रदेशाला आणि 'सीरियन' या संबोधनाला प्राचीन काळी फार महत्व होतं. आजच्या सीरिया, इराक, इराण वगैरे मेसापोटेमियातील विस्तीर्ण प्रदेशांत सुमेरियन, खाल्डियन, असुरियन, बॅबिलोनियन, नव-असुरियन वगैरे राजवटी होऊन गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय आणि भौगोलिक संदर्भ कायम बदलत राहिले होते. सायरस याने मोडकळीला आलेलं नव-असुरियन साम्राज्य संपवून बॅबिलोन या ठिकाणी आपली राजधानी केली. हे ठिकाण सध्या प्राचीन सुमेर किंवा सीरिया व आधुनिक इराक यांच्या दरम्यान आहे. यामुळेच पर्शियन सम्राटांना सीरियन राजे म्हटलं जात असावं. त्याचप्रमाणे सायरस याने चालू केलेल्या वरील शकाला 'सीरियन शक' हे नांव पडलं असावं. कारण असिरियन शक नामक एक शक त्यापूर्वी अस्तित्वात होता. सीरियन शकाची पार्श्वभूमी ही अशी आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी, की तत्कालीन भारतीय इतिहासकारांचा इंग्रजांच्या बनावट कालगणनेवर एवढा अंधविश्वास बसला, की आजही तीच बनावट कालगणना समोर ठेवून इतिहासाची चर्चा केली जात असते. आज सीरियन शक फारसा कुणाला माहीत नसण्याचं हेच मुख्य कारण आहे. निदान यापुढे तरी प्राचीन शिलालेखावरील वा नाण्यावरील शकाचा विचार करताना तो सीरियन शक तर नसेल ना हा विचार इतिहासाचे अभ्यासक करतील अशी आशा व्यक्त करतो. अन्यथा चुकीच्या कालगणनेवर आधारित निरर्थक ग्रंथ आणि पीएचड्या निर्माण होतच राहतील यात शंका नाही.
No comments:
Post a Comment