धोकादायक मार्क्सवादी इतिहासकार
(Dangerous Marxist Historians)
भारतीय इतिहासाचं नुकसान करणाऱ्या इतिहासकारांचे माझ्या मते तीन गट पडतात.
पहिला; कष्टाळू पण इंग्रजांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या 'उपकृत' इतिहासकारांचा.
दुसरा; तथाकथित 'देशभक्त' नि टोकाच्या हिंदुत्ववादी इतिहासकारांचा.
आणि तिसरा; छुप्या वा उघड कम्युनिस्ट इतिहासकारांचा.
वरील तिघांपैकी भारतीय इतिहासाचं सर्वात जास्त नुकसान कुणी केलं असेल, तर ते कम्युनिस्ट किंवा मार्क्सवादी इतिहासकारांनी केलं आहे. हे इतिहासकार भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत 'धोकादायक' आहेत असं एकंदरीत माझं मत झालंय.
१९६२ च्या चीन युद्धात देशद्रोह करणाऱ्या कम्युनिस्टांचा वारसा आजही चालवणाऱ्या या इतिहासकारांची लक्षणं त्यांच्या पुस्तकांमधील वा व्याख्यानांमधील खालील मांडणीवरून ओळखता येतात -
१. इंग्रजांची (बनावट) कालगणना खरी मानणे व भारतीय इतिहास वाटतो तितका 'प्राचीन' नसल्याचे भासवणे.
२. आर्यांपेक्षा अनार्यांची किंवा असुरांची संस्कृती 'उच्च' मानणे नि आर्यांची संस्कृती 'हीन' दाखवणे.
३. रामायण व महाभारत ही केवळ 'काव्येच' आहेत असे सांगणे.
४. राम किंवा कृष्णासारखे लोकोत्तर पुरुष आर्य नसून अनार्य, असुर, परदेशी किंवा काल्पनिक मानणे.
५. 'मनुस्मृती' सारखे प्राचीन ग्रंथ बदनाम करणे व चार्वाकांसारख्या भोगवादी पाखंड्यांचे अनावश्यक उदात्तीकरण करणे.
६. आर्य- अनार्य, वैदिक- अवैदिक, ब्राह्मण- ब्राह्मणेतर अशाप्रकारचे वाद नव्याने उकरून काढून समाजात फूट पाडणे.
हे सगळं करण्यामागे एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे 'भारतीय इतिहास व संस्कृती किती क्षुद्र व थिटी आहे; आणि मार्क्सवाद हाच त्यावर एकमेव अक्सीर उपाय कसा आहे' हे भारतीयांच्या मनावर बिंबवणं. कुठलाही अभ्यास न करता स्वतः ला 'बुद्धिवादी' समजणारे सुशिक्षित पण 'अर्धवट' लोक याला बळी पडतात नि या इतिहासकारांचं फावतं.
ज्या मार्क्सवादी इतिहासकारांनी हे सगळं केलं यापैकी काहीजणांची यादी इथे देणं औचित्यपूर्ण ठरेल.
ही यादी अशी,
१. दामोदर कोसंबी
२. रोमिला थापर
३. राम शरण शर्मा
४. कॉ. शरद पाटील
५. नरहर कुरुंदकर
६. डॉ. आ. ह. साळुंखे
या यादीतले काही इतिहासकार उघडपणे आपण मार्क्सवादी असल्याचं कबूल करतात, तर उरलेले मानवतावादाचा मुखवटा तोंडावर चढवून आपण मार्क्सवादी असल्याचं नाकारत असतात. मात्र त्यांची कृती व कलाकृती यावरून ते कोण आहेत हे उघड दिसून येत असतं. यातली काही मंडळी मानवाधिकार किंवा सांस्कृतिक किंवा इतिहास विषयक समित्यांमध्ये घुसून मोक्याच्या जागा पटकावतात आणि आपलं इप्सित साध्य करून घेतात. अशा या धोकादायक इतिहासकारांच्या विषग्रस्त मांडणीची थोडक्यात उदाहरणं देतो.
कोसंबी हे 'आर्य स्थानिक अनार्यांच्या तुलनेत सुधारलेले नव्हते' असं निराधार विधान करतात. (पृ. ८२, 'प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता') 'वेद हे बायबलच्या तुलनेत कमी आहेत' (पृ. ८५), 'कृष्ण हा असुर होता', आजचे (जिजाबाईच्या माहेरचे) जाधव उर्फ यादव हे बनावट आहेत (पृ. १२८ ते १३५) अशी अफाट व निराधार विधानही ते करतात.
रोमिला थापर आपल्या 'Ancient Indian Social History' या पुस्तकात 'महाभारताचा इ.स.पूर्व ३१०२ हा काळ खोटा आहे' (पृ.२८५), 'पुराणांतल्या वंशावळी खोट्या आहेत' (पृ. २५५), 'आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृतीच उच्च होती' (पृ. २५६), 'ऋग्वेद प्राचीन नाही' (पृ. २५७) असं उच्चारवाने सांगतात.
'Communalism and the Writing of Indian History' या ग्रंथातही रोमिलाबाई 'भारतीय इतिहासाचे अकारण उदात्तीकरण केले आहे' (पृ. ५), 'वैदिक किंवा हिंदू यांच्यापेक्षा बौद्ध आणि परदेशी लोकांनीच भारतीय कला नि संस्कृती श्रीमंत केली आहे' (पृ. ११) अशा अर्थाची विधाने बिनबोभाटपणे करतात.
(खुलासा : अलीकडे मात्र रोमिलाबाईंना उपरती होऊ लागली आहे हे त्यांच्या युट्यूबवरील मुलाखती पाहून लक्षात येतंय. पुराणे विश्वसनीय आहेत, रामायण-महाभारत खरोखरच घडून गेलं, महाभारत काळ इ.स.पूर्व ३१०२ हा आहे इत्यादी गोष्टींवर आता त्यांचा विश्वास बसू लागल्याचं दिसत आहे. भारतीय इतिहास नि संस्कृती आधी 'हीन' लेखून नंतर ती 'महान' असल्याची उपरती झाल्याचं मॅक्सम्युलरनंतरचं माझ्या समजुतीप्रमाणे हे पाहिलंच उदाहरण.)
दोन वेळा भारत सरकारचा 'पद्मभूषण' 'किताब नाकारणाऱ्या रोमिलाबाईंनी २००८ साली पाच लाख डॉलरचं (साडेतीन कोटी रुपये) 'क्लुग' नामक अमेरिकन पारितोषिक स्वीकारायला मात्र अनमान केला नाही. कम्युनिस्टांचा अड्डा असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केलं आहे. २०१८ साली काही माओवादी विचारवंतांना पोलिसांनी अटक केल्यावर त्याविरोधात पहिली याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या रोमोलाबाईंनी आपण कोण आहोत हे पुन्हा एकदा कृतीनेच सिद्ध केलं होतं.
दोन वेळा भारत सरकारचा 'पद्मभूषण' 'किताब नाकारणाऱ्या रोमिलाबाईंनी २००८ साली पाच लाख डॉलरचं (साडेतीन कोटी रुपये) 'क्लुग' नामक अमेरिकन पारितोषिक स्वीकारायला मात्र अनमान केला नाही. कम्युनिस्टांचा अड्डा असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केलं आहे. २०१८ साली काही माओवादी विचारवंतांना पोलिसांनी अटक केल्यावर त्याविरोधात पहिली याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या रोमोलाबाईंनी आपण कोण आहोत हे पुन्हा एकदा कृतीनेच सिद्ध केलं होतं.
राम शरण शर्मा यांचीही सगळी मांडणी मार्क्सवादी आणि हिंदू विरोधी असल्याचं दिसून येतं. 'प्राचीन भारत' नामक दहावीच्या पाठ्यपुस्तकात 'रामायण आणि महाभारत घडलं याला काही पुरावा नाही' असं ठाम विधान करून त्यांनी तरुण मुलांच्या मनात भारतीय इतिहासाविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या पुस्तकावर १९७७ मध्ये जनता पक्षाला बंदी घालावी लागली होती. अयोध्या आणि गुजरात दंगल प्रकरणांमध्ये शर्मा यांनी नेहमीच मुसलमानांची बाजू घेतली आहे. अयोध्या हे हिंदूंचं तीर्थक्षेत्र असल्याचा कुठलाही पुरावा नाही असं ते ठासून सांगतात.
कॉ. शरद पाटील यांनीही आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृती कशी 'उच्च' होती हे सांगण्यात हयात घालवली आहे. याबाबतीत त्यांची मजल एवढ्या पुढे गेलीय, की 'वर्णव्यवस्था ही मुळात अनार्यांची होती व ती पुढे आर्यांनी उचलली' असं सांगायलाही त्यांनी कमी केलेलं नाही. मात्र आधीची व्यवस्था 'समतेवर' आधारित होती तर नंतरची (म्हणजे आर्यांची) 'विषमतेवर' आधारित बनली' (पृ. ५, प्रस्तावना, 'दासशूद्रांची गुलामगिरी' खंड १ भाग २) असं निराधार विधान करून त्यांनी तो विषय गुंडाळला आहे. 'नैऋती' या वेदातील 'अशुभा'च्या देवतेला ते अनार्यांची देवता ठरवून 'सुपीकतेची'ही देवता ठरवायला जातात (पृ. ३ व ४) हा सुद्धा असाच एक निरर्थक अभिनिवेशाचाच प्रकार होय.
नरहर कुरुंदकर हे एकाच वेळी अनेक डगरींवर हात ठेवणारे महाराष्ट्रातील एक 'तुच्छतावादी' विद्वान. आपण 'मार्क्सवादी' असल्याची कबुली त्यांनी 'मनुस्मृती' या त्यांच्या पुस्तकात दिली आहे. (पृ. ८७ पहा.) 'मनू अस्पृश्यता पाळत नाही' असं डॉ. आंबेडकरांचं मत होतं. पण कुरुंदकर त्यांना खोडून काढतात व म्हणतात, 'मनू अस्पृश्यता पाळतो असे माझे मत आहे.' (पृ. ६५) या विधानाच्या पुष्ट्यर्थ कुरुंदकर 'प्रक्षिप्त' म्हणून उघडपणे माहीत असलेल्या श्लोकांची तीच तीच उदाहरणे देत राहतात. चार्वाकाला तर कुरुंदकर आर्यांपेक्षा अधिक मार्क देतात आणि 'ते काळाच्या १५०० वर्षे पुढे होते' असं आधारहीन विधान करतात. (पहा, 'लोकायत' हा लेख, मागोवा, देशमुख आणि कं.)
डॉ. आ.ह.साळुंखे यांच्यावर एरीक फ्रॉम या मार्क्सवादी विचारवंतांच्या साहित्याचा प्रभाव आहे. त्यांनी फ्रॉम याच्या एका पुस्तकाचा अनुवादही केलाय. कुठलाही हाडाचा मार्क्सवादी समता आणि मानवतावाद यांचा नेहमी उद्घोष करत असतो तसा फ्रॉम आणि त्यांचे शिष्य डॉ. साळुंखेही तो कायम करताना आढळतात.मात्र प्रत्यक्षात ही मंडळी द्वेषाची पेरणी करण्यात मग्न असतात. डॉ. साळुंखे यांनी चार्वाकावर चक्क 'पीएचडी' च केली असून त्याला त्यांनी 'आस्तिक शिरोमणी' ही ठरवून टाकलं आहे. आपल्या तल्लख नि लबाड युक्तिवादाने ते आर्य, वैदिक, ब्राहमण यांच्यावर सातत्याने झोड उठवून अनार्य, असुर, चार्वाक अशा आता अस्तित्वात नसलेल्या गोष्टी उकरून काढत असतात नि समाजाचा बुद्धिभेद करून मानसिक व भावनिक फूट पाडत असतात. वानगीदाखल त्यांचे 'ना गुलाम, ना उद्दाम', 'चार्वाक दर्शन', 'बळीवंश' वगैरे ग्रंथ वाचून पाहावेत. ते वाचले म्हणजे संभाजी ब्रिगेड सारख्या समाजद्रोही संस्था कुठल्या विचार प्रवाहातून निर्माण झाल्या आहेत हे ताबडतोब लक्षात येऊ शकतं. असो.
माझ्या परीने मी यातल्या बहुतेकांची मते 'साधार' खोडून काढली असून समाजातील एकात्मता व सौहार्द टिकवण्याचा नि आपल्या भव्य इतिहासाला चूड लागू न देण्याचा प्रयत्न माझ्या पुस्तकांमधून नि ब्लॉगमधून केला आहे. पण हा लेख लिहिण्यामागचा मुख्य हेतू तरुण इतिहास-अभ्यासकांनी सतत सावध राहून कोणतेही पूर्वग्रह न बाळगता आपला अभ्यास करावा हाच आहे. तो साध्य झाला तरच आपल्या पुराणेतिहासाला काही भवितव्य आहे.
No comments:
Post a Comment