डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. वसंत शिंदे यांनी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक व्याख्यान युट्यूबवर प्रसारित केलं आहे. 'Application of DNA Science to reconstruct authentic early Indian History' हा विषय युट्यूबवर घातला की ते ऐकता-पाहता येतं. या व्याख्यानात राखीगढी येथे झालेल्या संशोधनावर अधिक प्रकाश टाकला आहे.
१. डॉ. शिंदे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या राखीगढी संशोधनावर ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांची दखल घेतल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. परिणामी त्यावेळी काढलेले काही निष्कर्ष त्यांनी बदलले असल्याचं दिसून येत आहे. ते आता त्यांना 'निष्कर्ष' न म्हणता 'अनुमान' वा 'गट फिलिंग' म्हणत आहेत.
२. ऑगस्ट २०१८ च्या निष्कर्षांमधील अनेक बाबी त्यांनी या व्याख्यानात गाळल्या वा बदलल्या आहेत. उदा. राखीगढीमधील लोक वैदिक आर्य नव्हते, आर्यांपेक्षा दक्षिण भारतीयांशी वा द्रविडांशी त्यांचं साधर्म्य आहे, ते 'निलगिरी' मधील 'इरुला' जमातीचे असावेत, ते शेतीचं तंत्र पश्चिम आशियातून शिकले होते इत्यादी मुद्दे त्यांनी तेव्हा प्रामुख्याने मांडले होते. (पहा- Economic Times, 13-06-2018 व India Today, 31-08-2018.) पण या व्याख्यनात त्यांनी वेगळेच मुद्दे मांडले आहेत.
३. या देशातील लोकांचे पूर्वज ११००० वर्षांपूर्वी भारतात आले असं एकीकडे म्हणत असताना डॉ. शिंदे Aryan Invasion Theory नाकारत आहेत हे विसंगत आहे.
४. राखीगढीमधील सांगाड्यांचे डी. एन. ए., त्यांची भांडीकुंडी, घरे हे हल्लीच्या हरियाणातील लोकांच्या जीवनशैलीशी जुळत आहे असं आता डॉ. शिंदे म्हणत आहेत. मग 'इरुला' लोकांचं काय झालं ? आणि अन्य भारतीय वंशजांचं काय करायचं ?
५. वैदिक संस्कृती राखीगढीवाल्या लोकांनीच निर्माण केली असं आता डॉ. शिंदे सांगत आहेत. पण ऑगस्ट २०१८ मध्ये या लोकांचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचं ते सांगत होते.
६. काश्मीर ते केरळ आणि अफगाणिस्तान ते बंगाल यांमधील लोकांचे (त्यांचे जाती-धर्म कोणतेही असोत) पूर्वज हडप्पीयन लोकच होते कारण ६०% हून अधिक लोकांचे डीएनए जुळत आहेत असं या व्याख्यानात डॉ. शिंदे म्हणत आहेत. म्हणजे आर्य आणि द्रविड असा काही प्रकार नव्हता हे ते एकप्रकारे मान्य करत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी आर्य आणि द्रविड अशी विभागणी सांगितली होती.
७. शेती करायला सर्वप्रथम भारतातच (९००० वर्षांपूर्वी) सुरुवात झाली असं डॉ. शिंदे या व्याख्यानात म्हणत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये भारतीय इराण्यांकडून शेती करायला शिकले असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
८. हे सर्व सांगून झाल्यावर 'हे फारच लहान नमुन्यावरील संशोधन आहे' हे मान्य करून डॉ. शिंदे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. म्हणजे काही काळानंतर ही अनुमाने चुकीचीही निघू शकतील याचं सूतोवाच त्यांनी आताच करून ठेवलं आहे.
No comments:
Post a Comment