Monday, March 17, 2025

विवाहसंस्थेचा इतिहास व त्याचे मेहेंदळेकृत विच्छेदन    इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे एक अतिशय गाजलेलं व महत्त्वाचं पुस्तक आहे. काही प्रकाशकांनी त्याच्या नवीन आवृत्त्या काढल्यामुळे सध्या ते बाजारात उपलब्ध झालंय ही चांगली गोष्ट आहे. या ग्रंथात राजवाड्यांनी वेदपुराणांचा दाखला देऊन काही स्फोटक व धक्कादायक वाटतील असे निष्कर्ष काढले आहेत. ते कितपत बरोबर आहेत हे समजून घेण्यासाठी वेदपुराणांचे गाढे अभ्यासक डॉ. म. अ. मेहेंदळे (१९१८-२०२०) यांना भारत इतिहास संशोधक मंडळाने राजवाड्यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान देण्यास आमंत्रित केलं होतं. हे व्याख्यान तेव्हा ९० वर्षांचे असलेल्या डॉ. मेहेंदळे यांनी ३१ डिसेंबर २००८ रोजी मंडळाच्या सभागृहात दिलं आणि त्याच वर्षीच्या त्रैमासिकात ते छापलंही गेलं. मूळ ग्रंथाएवढंच मेहेंदळे यांचं हे विश्लेषण महत्त्वाचं आहे. कारण ते न वाचल्यास राजवाडे यांच्या ग्रंथावरून अभ्यासकांचा विपरीत ग्रह होण्याचा संभव आहे. पण दुर्दैवाने कुठल्याही ग्रंथात हे विश्लेषण ग्रंथीत न झाल्यामुळे अभ्यासकांपर्यंत ते सहसा पोहोचत नाही. म्हणून मी त्यातला काही भाग इथे देत आहे. राजवाडे यांच्या ग्रंथात चार प्रकरणे असून ती एकूण ५९ पृष्ठे भरतात. मेहेंदळे यांच्या टीकापर लेखाची ६१ पृष्ठे आहेत. हे सगळं इथे देणं शक्य नसल्यामुळे मी फक्त राजवाड्यांच्या चारही प्रकरणांतील ठळक निष्कर्ष व मेहेंदळ्यांची त्यावरील टीका थोडक्यात देत आहे. अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी ही दोन्ही पुस्तके स्वतः मिळवून वाचावीत.                     डॉ. मेहेंदळे यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या सुरुवातीस राजवाडे यांचा प्रचंड व्यासंग व निरीक्षणशक्ती यांचा रास्त सन्मान केला आहे. त्यांच्या मते राजवाडे यांचा हा ग्रंथ लेटूर्नो (Charles Letourneao,१८३१-१९०२) या फ्रेंच मानववंश शास्त्रज्ञाच्या 'इव्होल्यूशन ऑफ मॅरेज' या ग्रंथावर इतका 'अवलंबी' झाला आहे, की तो ग्रंथ राजवाड्यांच्या वाचनात आला नसता, तर त्यांनी 'विवाहसंस्थेचा इतिहास' हा ग्रंथ लिहिण्याचा उद्योग केला नसता. परिणामी लेटूर्नो यांनी वर्णन केलेल्या पाश्चात्य देशांतल्या जुन्या रानटी चाली भारतीय प्राचीन समाजातही असल्याचं राजवाड्यांनी गृहीत धरलं व तसे काही संदर्भ वेदपुराणांमध्ये मिळतात का हे ते शोधू लागले. त्यामुळे त्यांचे अनेक निष्कर्ष ओढूनताणून काढले गेले आहेत. असो. आता विवाहसंस्थेच्या पहिल्या प्रकरणातील राजवाडे यांचे ठळक निष्कर्ष व त्यावरील डॉ. मेहेंदळे यांची टीका पाहू.            प्रकरण १ ले - स्त्रीपुरुष समागमसंबंधक कित्येक अतिप्राचीन आर्षचाली  या प्रकरणात संकीर्ण समागम, उघड्यावर समागम यांसारख्या चाली अतिप्राचीन काळी तत्कालीन समाजात चालू होत्या असं राजवाडे यांनी म्हटलं आहे. राजवाडे यांनी हा जो आर्ष समाज कल्पिलेला आहे, त्याचा स्थल-काल काही प्रमाणात तरी त्यांनी निश्चित करायला हवा होता, पण तसा प्रयत्न त्यांनी केलेला नाही असं प्रथम मेहेंदळे स्पष्ट करतात.  निष्कर्ष १ - 'प्राचीन काळी सख्खी भावंडे, चुलत भावंडे, चुलता-पुतणी यांचे शरीरसंबंध होत असत.' (पृ. ३१)हा निष्कर्ष काढण्यासाठी राजवाडे हरिवंशातील पहिले तीन अध्याय व महाभारताच्या आदिपर्वाच्या ६० व्या अध्यायात दिलेल्या माहितीचा आधार घेतात. यांमध्ये ब्रह्मदेवापासून क्रमाने झालेल्या पहिल्या प्रजोत्पत्तीविषयीची माहिती आहे. ब्रह्माच्या 'दक्ष' या मुलाचा ब्रह्माच्याच 'दक्षा' या मुलीशी झालेल्या समागमाने दक्षास ५० मुली झाल्या. त्यांतल्या १० कन्या दक्षाने ब्रह्म्याचा आणखी एक मुलगा 'धर्म' याला दिल्या आणि १३ कन्या ब्रह्माचा नातू 'कश्यप' याला दिल्या असं राजवाडे दाखवून देतात. या निष्कर्षांच्या पुष्ट्यर्थ आणखी एक पुरावा म्हणून राजवाडे ऋग्वेदातील (१०. १०) यम व यमी या भावंडांचा संवाद देतात. यमी आपल्या भावाला पतिभावाने वागावे, म्हणजे आपल्याशी संभोग करावा अशी विनंती करते. यमाला हे मान्य होत नाही, पण यमी त्याला सात वेळा तशी विनंती करते. हे सांगून राजवाडे प्राचीन काळी बहीण-भावाचा समागम होत असे हे सिद्ध होत असल्याचं जाहीर करतात.  खंडन - दक्ष आणि त्याने जिच्याशी समागम केला ती दक्षा यांना 'भाऊबहीण' असं महाभारत संबोधत नाही. कारण दक्ष हा ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून तर दक्षा ही डाव्या अंगठ्यापासून उत्पन्न झाली. तेव्हा त्यांना सहोदर भाऊबहीण म्हणता येणार नाही. यम व यमी या भाऊबहिणीचा संवादही राजवाडे पूर्ण देत नाहीत. यम हा यमीची विनंती सातही वेळा झिडकारून टाकतो. 'पूर्वी जे कुणी कधी केलं नाही, ते आपण करणं योग्य नाही ! तसे करणे पाप आहे !' असं यम समजावून सांगतो व त्या दोघांचा समागम होत नाही. पण राजवाडे हे सांगत नाहीत. तात्पर्य, सख्खी किंवा चुलत भावंडे आणि चुलता-पुतणी यांचे प्राचीन काळी शरीरसंबंध होत असत हा राजवाडे यांचा निष्कर्ष सिद्ध होत नाही.  निष्कर्ष २ - 'प्राचीन काळी बाप आणि मुलगी यांचे शरीरसंबंध होत असत.' या निष्कर्षाचं उदाहरण म्हणून राजवाडे वसिष्ठ प्रजापती व त्याची मुलगी शतरूपा यांच्या समागमाविषयी सांगतात. अशा संबंधांचं दुसरं उदाहरण ते वैवस्वत मनू व त्याची कन्या इला यांच्या शरीरसंबंधांचं देतात. तिसरं उदाहरण ते जन्हु व जान्हवी यांचं नमूद करतात. (पृ. ३२) या तीन उदाहरणांनी भागलं नाही म्हणून की काय, ते ऐतरेय ब्राह्मणातील (३. ३. ३३) एका पुराव्याचा उल्लेख करतात. त्या कथेतील 'प्रजापतीचे मन आपल्या मुलीवर गेले' एवढं एकच वाक्य वेगळं काढून तो बाप-लेकीच्या समागमाच्या चालीचा पुरावा म्हणून राजवाडे सादर करतात.  खंडन - हरिवंशाच्या २ ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीस वसिष्ठ प्रजापती व शतरूपा यांच्याविषयीची माहिती आहे, पण राजवाडे पूर्ण माहिती देत नाहीत. शतरूपा ही वसिष्ठाची औरस मुलगी नसून 'अयोनिजा' कन्या होती. अयोनिजा म्हणजे जिचे आईवडील कोण आहेत याची माहिती नाही अशी कन्या. दुसरं म्हणजे तिने पती म्हणून वसिष्ठाची निवड केली नसून स्वायंभुव मनू याची निवड केली होती. दुसऱ्या अध्यायातील ४ थ्या श्लोकात तसा स्पष्ट उल्लेख आहे. पण १ ल्या श्लोकात ज्याचा उल्लेख आहे, त्या वसिष्ठालाच राजवाडे यांनी पती ठरवून टाकलं आहे ! राजवाडे जर पुढचे श्लोक वाचते, तर त्यांना हे समजलं असतं. स्वायंभुव मनूपासून तिला 'वीर' नांवाचा मुलगा झाला होता हेही त्यांना कळलं असतं.  वैवस्वत मनू आणि त्याची कन्या यांच्या बाबतीतला राजवाडे यांचा निष्कर्षही चुकीचाच आहे. हरिवंशाच्या ९ व्या अध्यायात याविषयी समग्र माहिती दिलेली आहे. वैवस्वत मनूने पुत्रकामेष्टी केली. तिच्यात त्याने मित्र-वरुण यांना जी आहुती दिली त्यातून 'इडा' किंवा 'इला' ही मुलगी झाली. तिचा सोमपुत्र बुध याच्याशी संगम होऊन तिला 'पुरूरवस्' हा पुत्र झाला. नंतर मित्र-वरुणांच्याच वरामुळे इला ही वैवस्वत मनूची 'सुद्युम्न' नामक मुलगा झाली. अशी ही चमत्कारिक कथा आहे. त्यात कुठेही वैवस्वत मनू व इला यांचा संभोग झाल्याचं म्हटलेलं नाही. राजवाडे यांनी दिलेलं जन्हु व जान्हवी यांच्या शरीरसंबंधांचं ३ रं उदाहरणसुद्धा सिद्ध होत नाही. रामायणाच्या ४३ व्या अध्यायात गंगावतारणाची कथा आहे. त्यात जन्हुने गंगा पिऊन टाकली व दोन कानांनी पुन्हा सोडून दिली म्हणून तिला 'जान्हवी' म्हणतात असं म्हटलं आहे. हरिवंशाच्या २३ व्या अध्यायात स्पष्टपणे नमूद केलंय, की कावेरी ही जन्हुची पत्नी व जान्हवी ही त्याची मुलगी. वायुपुराण (९१. ५८) आणि ऋग्वेद (१. १६. १९ व ३. ५८. ६) यांमध्ये जान्हवी हा शब्द 'जन्हुची प्रजा' या अर्थाने आला आहे. वरीलपैकी कुठेही जन्हु व जान्हवी यांचा शरीरसंबंध असल्याचं म्हटलेलं नाही.चौथ्या उदाहरणात ऐतरेय ब्राह्मणातील प्रजापतीचं मन आपल्या मुलीवर गेल्याची हकीगत सांगून राजवाडे असा आभास निर्माण करतात, की त्याने त्याची कामनाही पूर्ण केली. पण तसं काहीही घडलेलं नाही. प्रजापतीची वासना लक्षात आल्यावर देवांना ती आवडली नाही. कारण पूर्वी कधीही कुणीही न केलेलं प्रजापती करू इच्छित होता. म्हणून देवांनी 'भूतवत्' नांवाचा देव निर्माण केला व त्याने प्रजापतीला बाण मारून त्याला शिक्षा केली असं त्या कथेत म्हटलं आहे. देवांना जे गर्ह्य व निंद्य वाटलं, ते राजवाडे यांना मात्र वाटलं नाही. निष्कर्ष ३ - 'प्राचीन काळी उघड्यावर किंवा चारचौघांत समागम करण्याची चाल होती.' उघड्यावर समागम करण्याच्या चालीचं उदाहरण म्हणून राजवाडे आदिपर्वाच्या ५७ व्या अध्यायातील सत्यवती व पराशर यांच्या चालत्या नौकेत केलेल्या समागमाचा उल्लेख करतात. (पृ. ३८)उघड्यावर समागमाच्या चालीचा दुसरा पुरावा म्हणून राजवाड्यांनी उतथ्यपुत्र दीर्घतमाच्या कथेचा उल्लेख केला आहे. 'दीर्घतमाने सर्व लोकांसमक्ष स्त्रीसमागम करण्यास प्रारंभ केला' असं वर्णन आदिपर्वाच्या ९८ व्या अध्यायात आढळतं असं राजवाडे म्हणतात. प्रकटमैथुनाचं आणखी एक उदाहरण म्हणून राजवाड्यांनी उत्तर पेशवाईतील 'घटकंचुकी' क्रीडेचाही उल्लेख केला आहे. या तीन उदाहरणांना पुष्टी देण्यासाठी म्हणून राजवाडे शांतिपर्वाच्या १८६ व्या अध्यायामधील १६ व्या श्लोकातील 'मैथुन एकांतात करावे' या ओळीचा दाखला देतात. "ज्याअर्थी हे मुद्दाम सांगितले आहे, त्याअर्थी चारचौघांत मैथुन करण्याची चाल पूर्वी अस्तित्वात असावी !" असं ते नमूद करतात. खंडन - सत्यवती व पराशर यांचा जो समागम दिवसाढवळ्या घडला असं राजवाडे म्हणतात, तो 'पराशराने धुकं निर्माण केल्यामुळे अंधार होऊन लोकांसमक्ष घडला नाही' असं आदिपर्वातच म्हटलं आहे. (श्लोक ५५ ते ६८) पण राजवाडे यांना ही महाभारतकारांची 'मखलाशी' वाटते. तेव्हा धुक्याची घटना आपण सोडून देऊ. पण पराशराने समागमाची इच्छा व्यक्त केल्यावर सत्यवती जे म्हणते, ते तरी विचारात घ्यावं लागेल ना? ती म्हणते, "भगवन्, पलीकडल्या काठावर ऋषीमंडळी उभी आहेत. ते आपल्याला पहात असताना आपण समागम कसा करायचा?" महाभारतकाली उघड्यावर समागम करण्याची चाल असती, तर सत्यवतीने अशी अडचण कशी सांगितली असती? आणि महाभारतकारांना तरी पराशराने धुके निर्माण केल्याची मखलाशी करण्याची गरज का पडली असती? तात्पर्य, एखाद्या कामार्त पराशराने सत्यवतीचे आढेवेढे न जुमानता तिच्याशी उघड्यावर समागम केला यावरून त्या काळी तशी चाल होती असं मानणं गैरलागू आहे. उघड्यावरील समागमाचं राजवाडे यांनी दिलेलं दुसरं उदाहरणही याच प्रकारचं आहे. आधी राजवाडे ही कथाही पूर्ण व नीट सांगत नाहीत. या कथेत पुढे म्हटलं आहे, की दीर्घतमाने अशा प्रकारच्या वर्तनास सुरुवात केल्यावर त्याच्या मुलांनी त्याचा त्याग केला. म्हणजे त्यांना वडिलांचं वागणं पसंत नव्हतं. त्यामुळे प्रकटमैथुनाची तेव्हा चाल नव्हती हेच उलट सिद्ध होत आहे. तिसऱ्या उदाहरणात राजवाड्यांनी केलेला 'घटकंचुकी' चा उल्लेखही चुकीचाच आहे. हा प्रकार बंदिस्त खोलीत होत असे, उघड्यावर नव्हे. काही लैंगिक विकृती असणाऱ्या लोकांचे जे चाळे होते, त्याला राजवाडे 'चाल' म्हणत आहेत हे योग्य नाही.शांतिपर्वाच्या १६ व्या श्लोकातील एका ओळीवरून राजवाडे यांनी त्यांना सोयीस्कर असा निष्कर्ष काढणे म्हणजे बुडत्याला काडीचा आधार शोधण्यासारखं आहे. महाभारतात किंवा स्मृतिग्रंथांत जेव्हा एखादा आचार सांगण्यात येतो तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो, की त्यापूर्वी विरोधी आचार होत असत. उदा. राजवाडे यांनी उल्लेखिलेल्या श्लोकाचा पूर्वार्ध असा आहे, की 'सूर्योदयापूर्वी उठावे, नग्नस्त्रियांकडे बघू नये'. यावरून राजवाडे असं म्हणणार आहेत का, की त्यापूर्वी लोक सूर्योदयानंतर उठत असत व नग्न स्त्रियांकडे पहात बसत म्हणून ? यापूर्वीच्या १५ व्या श्लोकात म्हटलं आहे, की 'गुरूला आसन देऊन अभिवादन करावे.' याचा अर्थ असा नव्हे, की शांतिपर्वात हे सांगण्यापूर्वी मुलं हे करत नसत. तात्पर्य, प्राचीन काळी उघड्यावर समागम करण्याची चाल होती हा राजवाडे यांचा निष्कर्ष त्यांनी दिलेल्या उदाहरणांच्या निकषांवर टिकत नाही.  न - 'पुरातन काळी मातृगमनाची, मातामहीगमनाची किंवा प्रपितामहीगमनाची चाल होती.'सोप्या शब्दांत सांगायचं तर राजवाड्यांचं म्हणणं असं, की आर्षकाली आपली आई, आजी किंवा पणजी वगैरे स्त्रियांशी रत होण्यात पुरुषांना वावगं वाटत नसे. हा निष्कर्ष काढण्यासाठी राजवाडे लेटूर्नो याच्या पुस्तकातील रानटी लोकांची साक्ष काढतात. त्यानंतर ते महाभारतात (आदिपर्व, ४५ व ४६) वर्णन केलेल्या उर्वशी व अर्जुन यांच्या भेटीचं उदाहरण देतात. अर्जुनाचं मन उर्वशीवर गेलं आहे असं वाटून इंद्र उर्वशीला अर्जुनाकडे पाठवतो. उर्वशी अर्जुनाकडे भोगयाचना करते पण अर्जुन ठामपणे नकार देतो. कारण अर्जुनाचा पूर्वज पुरुरवा हा काहीकाळ उर्वशीचा पती होता. शिवाय उर्वशी ही इंद्राची भोग्य अप्सरा होती. या दोन्ही नात्यांनी एकप्रकारे ती अर्जुनाला मातृस्थानीच होती. तेव्हा त्याचं मन वळवण्यासाठी उर्वशी त्याला म्हणते, "पुरुच्या वंशातले जे कुणी पुत्र व पौत्र इंद्रलोकी येत असतात, ते आमच्याशी रममाण होत असतात ! त्यामुळे त्या कारणास्तव तू माझी विनंती फेटाळू नकोस." यावरून राजवाडे असं अनुमान काढतात, की अर्जुनाच्या काळी जरी मातृगमनाची चाल अनीतिकारक वाटत होती, तरी उर्वशीच्या काळात ती अनीतिकारक मानली जात नव्हती. म्हणजेच पुरातन काळी आपल्याकडे मातृगमनाची चाल होती. (पृ. ३५)  खंडन - लेटूर्नो त्याच्या पुस्तकात कुठेही रानटी टोळ्यांमध्ये मातृगमनाची चाल असल्याचं म्हणत नाही. तो केवळ 'The chippeways frequently cohabit with their mothers' एवढंच म्हणतो. मग राजवाडे त्याच्या पलीकडे का उडी मारतात? (Cohabit याचा अर्थ एकत्र किंवा जोडप्याने राहणे असा होतो. संभोग करणे असा होतोच असं नाही.)उर्वशी-अर्जुन भेटीविषयी सांगायचं तर चिकित्सक आवृत्तीत तो प्रसंग प्रक्षिप्त मानला आहे. त्यामुळे खरं तर प्रश्न इथेच संपला आहे. पण राजवाड्यांचा त्यात दोष नव्हता. कारण त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी चिकित्सक आवृत्ती निघाली. तेव्हा त्यांच्या त्या म्हणण्यात काही तथ्य आहे का हे आपण तपासून पाहू. पहिलं म्हणजे उर्वशी ही इंद्राची भोग्य अप्सरा असल्याचं कधी वाचनात आलेलं नाही. पण समजा ती असली, तरीही ती अर्जुनाची पितामही ठरत नाही. कारण ती इंद्राची पत्नी नव्हती. त्यामुळे पितामही ठरवायची तर ती इंद्राची पत्नी 'शची' ही ठरू शकते. (इंद्र हा अर्जुनाचा प्रत्यक्ष बाप म्हणून.)दुसरं, उर्वशी ही 'देवलोका'तली असल्यामुळे 'चिरतरुण' व म्हणून समागमास योग्य ठरू शकते. पण मानवांत एखादी आजी किंवा पणजी आपल्या नातवा-पणतवापेक्षा वयाने किती वडील असेल याचा राजवाड्यांनी विचार केला नाही का? हे शक्य तरी आहे का? एकदा दिलेला लेख प्रसिद्धीस देण्यापूर्वी राजवाडे वाचत नसावेत असं वाटतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जो समागम अर्जुनाच्या नकारामुळे झालाच नाही, तो एखादी चाल ठरवण्यास सक्षम कसा असू शकतो हे समजत नाही. सारांश, राजवाड्यांचा हा निष्कर्ष अगदीच बिनबुडाचा असून त्याला काहीही आधार नाही.  निष्कर्ष ५ - 'एकेकाळी आपल्या समाजातील स्त्रियांचा श्रेष्ठ समाजातील पुरुषांशी समागम घडवून आणण्याची चाल आपल्याकडे होती.' राजवाड्यांच्या म्हणण्याप्रमाणे 'देव' नामक एक समाज होता, तो आर्यांपेक्षा प्रगत होता. त्या देवांपैकी जर कुणी आपल्या स्त्रियांच्या ठायी गर्भाधान केलं तर आपलं भाग्य शिखरास पोहोचलं असं आर्यांना वाटे. त्याकरिता आर्यांनी देवांना 'अग्रोपभोगा'चा अधिकार दिला होता. यासाठी पहिलं उदाहरण राजवाडे कुंतीच्या पोटी यमधर्म, वायू व इंद्र यांनी आणि माद्रीच्या पोटी नासत्याने गर्भधारणा केल्याचं देतात. राजवाडे पुढे म्हणतात, 'देवांचा एवढा दरारा, की स्त्री अपत्य जन्माला आल्यावर पहिला हक्क देवांचा असे.' यासाठी राजवाडे ऋग्वेदातील  'सोम: प्रथमो विविदे गंधर्वो विविद उत्तर:' (१०. ८५. ४०) या मंत्राचा हवाला देतात. म्हणजे सोम, गंधर्व आणि अग्नी हे मुलीचे तीन पती आणि चौथा पती मानव. देवांच्या या अग्रहक्कातून त्यांना धान्याच्या लाह्या देऊन आर्यलोक आपल्या मुली सोडवून आणत. आपल्याकडे लग्नात जो 'लाजाहोमा'चा विधी असतो त्यामधून हा खुलासा होतो असंही राजवाडे पुढे म्हणतात. त्या विधीनुसार वर हा वधूला देवांच्या तावडीतून सोडवून आणतो आणि त्याकामी वधूच्या भावाचं सहाय्य घेतो यामधून ही चाल सिद्ध होते असं प्रतिपादन राजवाडे करतात.  खंडन - राजवाड्यांच्या या मांडणीत फार गोंधळ आहे. कुंती व माद्री यांचं त्यांनी दिलेलं उदाहरण नियोगाचं आहे. देवांचा त्यात खरोखरच काही संबंध नव्हता. देवांची नांवे घेण्यामागे गर्भधारणा करणाऱ्या पुरुषांची नांवे गुप्त ठेवणे एवढाच हेतू होता हे उघड आहे.दुसरं, राजवाड्यांनी जो ऋग्वेदमंत्र उद्धृत केला आहे, त्याचा अर्थ करताना 'पति' शब्दाचा हल्ली सामान्यतः जो 'नवरा' असा अर्थ होतो, तो त्या संदर्भात घ्यायचा नसून 'रक्षणकर्ता' हा पुरातन अर्थ घ्यायचा आहे. ('राष्ट्रपती' किंवा 'सभापती' यांमध्ये 'पती' शब्द ज्या अर्थाने वापरला जातो तो भाव काहीसा तसाच आहे.) मनुस्मृतीत वचन आहे, 'पिता रक्षति कौमारे' (९. ३) तोच अर्थ इथे घ्यायचा आहे. कारण मुलगी अजून फार लहान आहे. ऋग्वेदातील पुढल्याच मंत्रावरून हे स्पष्ट होतं (१०. ८५. ४१). त्या ऋचेप्रमाणे आधी सोमाने, मग गंधर्वाने, आणि नंतर अग्नीने आपल्या छायाछत्राखाली तिला संरक्षण दिल्यावर 'पित्याने द्यावी' तशी अग्नीने ती वराला द्यायची आहे. स्वतः भोगायची असा अर्थ होत नाही. राजवाडे अर्थाचा अनर्थ करत आहेत. राजवाडे यांचा 'लाजाहोमा'चा खुलासाही खुळचटपणाचा वाटतो. प्रश्न असा पडतो, की देवांच्या तावडीतून वधूला सोडवून आणण्याइतका जर वर शूर होता, तर त्याला वधूच्या भावाचं सहाय्य का लागावं? आणि भावानेही मोठा पराक्रम गाजवला असं नव्हे, तर नुसत्या चार लाह्या देवांना दिल्या. म्हणजे उपभोगासाठी आणलेली वधू देवांनी चार लाह्या खायला मिळत आहेत म्हणून 'संतुष्ट होऊन' सोडून दिली? ही तर अघटित घटनाच म्हणावी लागेल ! या सर्वच मंत्रांचे अर्थ लावताना राजवाडे यांना विलक्षण ओढाताण करावी लागली आहे. आणि एवढं करून त्यातून निष्पन्न काहीच झालेलं नाही. तात्पर्य, देवांना दिलेला अग्रोपभोगाचा मुद्दा सिद्ध करण्यात राजवाडे अयशस्वी ठरले आहेत.  निष्कर्ष ६ - 'आर्षलोक आपल्या मुली विकत किंवा भाड्याने देत किंवा गहाण टाकत किंवा काही काळ आपल्या गुरूला वापरायला देत असत.'     हा निष्कर्ष काढण्यासाठी राजवाड्यांनी उद्योगपर्वातील माधवीची कथा (अध्याय १०४ ते १२०) सांगितली आहे. (पृ. ४५) त्या कथेप्रमाणे विश्वामित्राचा शिष्य गालव हा विश्वामित्राला गुरुदक्षिणा देण्यासाठी ८०० श्यामकर्णी शुभ्र अश्वांची ययाती राजाकडे मागणी करतो. पण ययातीकडे असे अश्व नसल्यामुळे अश्वांच्याऐवजी तो गालवाला आपली कन्या माधवी हिला देतो. तिला घेऊन गालव हर्यश्व, दिवोदास व औशीनर या राजांकडे जातो. ते माधवीला एकेक वर्षं पत्नी म्हणून जवळ ठेवून पुत्रप्राप्ती करवून घेतात आणि त्याबद्दल गालवाला दोनदोनशे अश्व देतात. तरीही २०० अश्व कमी पडतात. म्हणून गालव पुन्हा विश्वामित्राकडे जातो. तेव्हा विश्वामित्र हे ६०० अश्व व माधवी यांना ठेवून घेतो. एक मूल झाल्यावर तो माधवीला गालव याच्याकडे परत देतो व गालव तिला नंतर बापाकडे पोहोचवतो.  खंडन - ही एक अपवादात्मक कथा आहे व राजवाड्यांना तेवढीसुद्धा एखादी 'चाल' असल्याचं सिद्ध करण्यास पुरी होते. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ही कथाही ते नीट सांगत नाहीत. 'अती आग्रह धरू नये' हे पटवून देताना नारद ही कथा दुर्योधनाला सांगतात (५. १०४. ६). विश्वामित्र आपल्याला गुरुदक्षिणा नको म्हणून वारंवार सांगत असतानाही त्याचा शिष्य गालव त्याला ती घेण्याचा आग्रह करत राहतो म्हणून संतापून त्याची खोड मोडण्यासाठी विश्वामित्र त्याला ८०० श्यामकर्णी शुभ्र अश्व देण्यास सांगतो. त्यातून वर सांगितल्याप्रमाणे विचित्र कथा घडते. गालवाकडे किंवा ययातीकडे ८०० अश्व असते, तर हा प्रसंग आलाच नसता. ययातीने गालवाला आपली मुलगी 'भाड्याने' दिली नव्हती व भाडंही घेतलं नव्हतं. ती दिली तेव्हा ती परत येणार आहे हे त्याला माहीत नव्हतं. गालव याने वेगवेगळ्या राजांकडे माधवीला 'गहाण' टाकली नव्हती. ती त्यांच्याकडे 'पत्नी' म्हणून राहिली होती (पहा- ५. ११५. ७). माधवी ही गालवाची कन्या नसून ययातीची कन्या होती. त्यामुळे शिष्याने आपली कन्या गुरूला वापरायला दिली हे विधानही सिद्ध होत नाही. त्यामुळे भाड्याने देणे, गहाण टाकणे, गुरूला वापरायला देणे वगैरे राजवाड्यांचे शब्दप्रयोग अवास्तव आहेत. (डॉ. मेहेंदळे यांनी न लिहिलेली एक विसंगती इथे सांगायची आहे. पहिलं म्हणजे या कथेत ययाती, विश्वामित्र, गालव, माधवी वगैरे सर्वांचाच अधिक्षेप होत आहे. दुसरं, या कथेत प्रचंड कालविपर्यास असून त्यामुळेच ती प्रक्षिप्त असल्याचं सिद्ध होत आहे. ययाती हा मनूपासून ६ व्या पिढीत झाला, तर विश्वामित्र हा मनूच्याच वंशात ३७ पिढ्यांनी झाला होता. हर्यश्र्व विश्र्वामित्राच्या आधी ६ पिढ्या, तर औशीनर ३ पिढ्या पूर्वी होऊन गेला होता. ज्याला हे काहीही माहीत नाही, अशा एखाद्या पुराणिकाने ही काल्पनिक कथा रचली व राजवाडे तिचाच आधार घेत आहेत. याचा उहापोह 'आर्यभारत खंड २' या पुस्तकातील 'पुराणांमधील भाकडकथा' या प्रकरणात मी केला आहे तो वाचकांनी जरूर पहावा.- हर्षद सरपोतदार.)   निष्कर्ष ७ - 'नीतिभ्रष्ट प्राचीन आर्ष लोकांत पशुसमागमाची चाल होती.' ही चाल असल्याचं पहिलं उदाहरण राजवाडे देतात ते विभांडक ऋषीला मृगीपासून ऋष्यशृंग झाला त्याचं. दुसरं उदाहरण राजवाड्यांनी आदिपर्वाच्या १०९ व्या अध्यायातील दम (किंवा किंदम) ऋषीचं दिलं आहे. तो मृगीशी संभोग करत असताना पांडूच्या बाणाने विद्ध होऊन मरण पावला होता. तिसरं उदाहरण राजवाडे त्वाष्ट्री हिचं देतात. अश्वरूप धारण करणारी त्वाष्ट्री सूर्याची भार्या होती. यावरून राजवाडे म्हणतात, 'घोडीशी पुरुष कर्म करत असतात अशी कल्पना निदान व्यासकाली वाचल्या जाणाऱ्या ग्रंथांमध्ये खपत असे.'   खंडन - विभांडक ऋषीला मृगीपासून पुत्र झाला हे राजवाड्यांनी दिलेलं उदाहरण गैरलागू आहे. मृगीपासून मानवाचा जन्म शक्य नाही असं राजवाडे स्वतःच म्हणतात. (पृ. ४६) तेव्हा 'मृग' ही सर्प, नाग, गरुड, वानर यांच्याप्रमाणेच मनुष्यांची एक जमात असली पाहिजे हे उघड आहे. तसं मानल्यास हे पशुसमागमाचं उदाहरण कसं होईल? महाभारतातही प्रत्यक्ष पशुसमागम झाल्याचं म्हटलेलं नाही. विभांडक स्नान करत असताना त्याच्या दृष्टीस उर्वशी पडली. तिला पाहून त्याचं रेतस्खलन झालं ते पाण्यात पडलं. ते पाणी एक मृगी प्याली त्यामुळे तिला गर्भ राहिला असं वर्णन आहे (३. ११०. १२-१५).दम ऋषीविषयी आदिपर्वाच्या १०९ व्या अध्यायातील २६ व २७ व्या श्लोकांत म्हटलं आहे, की 'किंदम ऋषीला मृगीशी रममाण होण्याची इच्छा झाली, पण गावात तसं करण्याची लाज वाटल्यामुळे तो रानात गेला. तिथे तो 'मृगवृत्तीने' रहात होता. तिथेच मृगीशी रममाण होत असताना त्याला पांडूचा बाण लागला. एखाद्या किंदम ऋषीच्या लैंगिक विकृतीचं हे उदाहरण आहे. त्यावरून प्राचीन चालीचा निष्कर्ष काढणं अस्थानी आहे.  (खुलासा - 'हे एक उदाहरण पशुसंभोगाचं होऊ शकेल' असं डॉ. मेहेंदळे यांनी इथे म्हटलं आहे. मेहेंदळे यांचं हे भाष्य आश्चर्यकारक आहे. एकदा मृग ही मनुष्यांची जमात असल्याचं मान्य केल्यावर त्या जमातीतील एखाद्या स्त्रीशी रममाण होणं हे पशुसमागमाचं उदाहरण कसं काय होऊ शकेल? - हर्षद सरपोतदार.) तिसऱ्या उदाहरणात 'घोडीशी पुरुष कर्म करत असत' हे वाक्य व्यासकाळी खपत असे असं राजवाडे म्हणतात. न खपायला काय झालं? आजही खपेल ! कारण अशा देवादिकांच्या गोष्टी कोणी दैनंदिन व्यवहाराच्या पातळीवर पडताळून पाहण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणून मानव असे वागत असत असं मानणं अयोग्य ठरेल. एकतर मृगीशी समागमाची कल्पना तरी करणे शक्य आहे, पण घोडीची उंची लक्षात घेता अश्वीमैथुनाची कल्पनाही करणे शक्य नाही. (मृगी कदाचित पाय झाडणार नाही, पण घोडी लाथा मारेल ते निराळंच !) त्वाष्ट्रीचा हा उल्लेख ज्या आदिपर्वात आहे (१. ६०. ३४), त्यात सूर्याने घोडीशी संगम केला असं म्हटलेलं नाही. घोडी झालेल्या त्वाष्ट्रीने अश्विनांना जन्म दिला असं म्हटलं आहे. देवादिकांच्या उत्पत्तीवेळची ही गोष्ट आहे. 'अश्विनांची' उत्पत्ती सांगायची असल्यामुळे गर्भवती त्वाष्ट्री प्रसूतीकरिता घोडी बनली असं श्लोकात सांगायचं आहे. एवढ्यावरून पशुसमागमाची चाल होती हे अजिबात सिद्ध होत नाही.                             प्रकरण २ रे - स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतीसंस्था   या दुसऱ्या प्रकरणात वंशप्रवर्तकत्व प्रथम स्त्रियांकडे होतं व पाशव अवस्थेतून बाहेर पडून यूथावस्थेत आल्यावर ते पुरुषाकडे आलं असं प्रतिपादन राजवाडे करतात.त्यांच्या मते ही माहिती व्यासांना नव्हती. व्यासांना फक्त वंशप्रवर्तकत्व पुरुषाकडे आल्यानंतरची माहिती आहे असं ते म्हणतात. राजवाड्यांना आधीची माहिती पण आहे. गंमत म्हणजे ही माहिती ते व्यासांच्याच ग्रंथांतून मिळवतात. असो, पण या विषयाला हात घालण्यापूर्वी पुन्हा एकदा ते सरमिसळ समागमाचा उहापोह करतात. या प्रकरणातले त्यांचे काही निष्कर्ष पाहू.  निष्कर्ष ८ - 'स्त्री गर्भार नसताना तिच्याशी तिचा भाऊ, धनी किंवा जार यांपैकी कुणीही समागम करू शके.' ऋग्वेदातील एका ऋचेमध्ये (१०. १६२. ५) 'गर्भार स्त्रीशी तिचा भाऊ, धनी किंवा जार यांपैकी जर कुणी समागम करेल, तर त्याचे आम्ही पारिपत्य करू' असं म्हटलं आहे. या श्लोकाचा दाखला देऊन राजवाडे दावा करतात, की 'यावरून असा ध्वनी निघतो, की स्त्री गर्भार नसताना तिच्याशी तिचा भाऊ, धनी किंवा जार यांपैकी कुणीही समागम करू शकत असे व तसे करण्याला मुभा होती.' थोडक्यात हा मंत्र हे तत्कालीन सरमिसळ समागमाचं एक उदाहरण ठरतं.   खंडन - राजवाडे यांचा मंत्राचा अर्थ आणि ध्वनी दोन्ही योग्य नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे भ्राता आणि जार यांच्या जोडीला ते धन्याला (म्हणजे पतीला) कसे बसवतात? धन्याने स्त्रीशी ती गर्भार नसताना संभोग करू नये का? सदर मंत्रात गर्भाचा नाश करणारा एकच कल्पिलेला आहे व तो म्हणजे भ्राता. मुख्य संदर्भ गर्भाचं रक्षण करण्याचा आहे, संभोग करण्याचा नाही. एखादा विकृत मनोवृत्तीचा भाऊ जर बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या बहिणीशी पतीप्रमाणे किंवा जाराप्रमाणे वागू लागून तिच्या गर्भाचा नाश करू पहात असेल, तर मंत्राने त्या गर्भाचं रक्षण करायचं आहे. अशा एखाद्या अपवादात्मक भावाच्या उदाहरणाने स्त्री गर्भवती नसताना तिच्याशी मुक्तपणे कुणालाही समागम करता येण्याची चाल होती असं मुळीच सिद्ध होत नाही. दुसऱ्या एका संदर्भाने या श्लोकाचा अर्थ असाही होऊ शकतो, की 'गर्भार स्त्रीचा नवरा वारल्यामुळे तिने तिच्या दिराशी विवाह केला असेल व मृत पतीचा तो भ्राता जर समागम करून तिच्या गर्भाचा नाश करू पहात असेल, तर आम्ही त्याचे पारिपत्य करू !' पण हा अर्थ घेतला तरीही राजवाड्यांचा निष्कर्ष टिकत नाहीच. कारण मग स्त्रीच्या भावाने तिच्याशी समागम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.     निष्कर्ष ९ - 'सोदर भगिनी झोपड्या करून विभक्त रहात व यूथातले पुरुष त्यापैकी कुणाशीही संभोग करू शकत.' (पृ. ५३)या निष्कर्षांच्या पुष्ट्यर्थ राजवाडे हरिवंशाच्या ३ ऱ्या अध्यायाचा पुरावा देतात. त्या अध्यायात नमूद केल्याप्रमाणे दक्षाला ज्या ६० मुली झाल्या; त्या त्याने धर्म, कश्यप, सोम व अरिष्टनेमी यांना अनुक्रमे १०, १३, २७ व ४ अशा दिल्या आणि भृगु, अंगिरस व कृशाश्व यांना प्रत्येकी २ दिल्या. राजवाड्यांना प्रश्न पडतो, की या ७ पुरुषांना दक्षाने सारखी वाटणी करून प्रत्येकी सुमारे ९ मुली का दिल्या नाहीत? त्याचं उत्तर ते स्वतःच देतात ते असं आहे, की ज्या सोदर बहिणी होत्या, त्या दक्षाने एकेका पुरुषाला दिल्या.  (खुलासा - पृष्ठ ३०-३१ वर राजवाडे दक्षाला ५० कन्या झाल्या असं म्हणतात व आता पृष्ठ ५३ वर ६० कन्या झाल्या असं म्हणतात. असं का, याचा खुलासा राजवाडे व डॉ. मेहेंदळे या दोघांनीही केलेला नाही. मात्र ६० हीच संख्या बरोबर आहे. दुसरं म्हणजे दक्षाची वंशावळ राजवाडे आदिपर्वाच्या ६६ व्या अध्यायात आल्याचं म्हणतात आणि मेहेंदळे ती ६० व्या अध्यायात आल्याचं सांगतात. याचं कारण म्हणजे राजवाडे संदर्भाकरिता महाभारताची 'निळकंठी' प्रत वापरत होते, तर मेहेंदळे 'चिकित्सक' आवृत्तीचा वापर करतात. यामुळे काहीवेळा हा फरक दिसतो हे वाचकांनी समजून घ्यावं. - हर्षद सरपोतदार)  खंडन - राजवाड्यांच्या या विवेचनाला काही आधार नाही. त्यांनी उल्लेख केलेल्या हरिवंशानुसारच (३. २३) दक्षाच्या ६० मुली दक्षाला 'वैरणी' या एकाच स्त्रीपासून झाल्या होत्या, म्हणजे सर्व ६० मुली सहोदरच होत्या. तेव्हा राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे १०, १३, २७ व ४ मुलींच्या आया वेगवेगळ्या नव्हत्या.  निष्कर्ष १० - 'पुढल्या काळात सोदर बहिणी सोदर भावांजवळ राहू लागल्या व त्यातूनच एकपतिक, बहुपत्नीक किंवा बहुपतिक कुटुंबसंस्था निर्माण झाली.'     वरील निष्कर्षांचं उदाहरण म्हणून राजवाडे पुन्हा हरिवंशाच्या ३ ऱ्या अध्यायातील माहितीचा पुरावा देतात. दक्षाच्या काही मुली आपापल्या आवडीप्रमाणे धर्माजवळ तर काही सोम, अरिष्टनेमी व कश्यपाजवळ राहू लागल्या. यातून बहुपत्नीक कुटुंबव्यवस्था निर्माण झाली. दुसरं उदाहरण ते मारिषा हिचं देतात. हरिवंशाच्या २ ऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे १० प्रचेतस् भावांनी 'मारीषा' नामक वृक्षकन्येशी समागम केला. हे बहुपतिक व्यवस्थेचं उदाहरण आहे असं राजवाडे म्हणतात.  खंडन -  हे सगळे राजवाड्यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळेस दक्षाच्या ६० सोदर बहिणींशिवाय स्त्रियाच नव्हत्या. आधी राजवाडे 'दक्षाने  त्या निरनिराळ्या पुरुषांना दिल्या' असं म्हणतात (पृ. ५३) आणि पुढच्याच पानावर (पृ. ५४) 'त्या आपल्या पसंतीने धर्म, कश्यप वगैरे पुरुषांजवळ राहिल्या' असंही म्हणतात. यात सुसंगती नाही. कारण तसं असेल तर दक्षाने मुली अमुक एका संख्येने त्या त्या पुरुषांना देण्याचं ठरवल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वर लिहिल्याप्रमाणे एकदा लिहिलेलं राजवाडे बहुधा पुन्हा तपासून बघत नसावेत.दहा प्रचेतस् भावांनी एकाच वृक्षकन्येशी समागम केल्याचं हरिवंशातील जे उदाहरण आहे, ते एकेकाळी प्रजेचा पूर्ण क्षय होऊन सारी प्रजा नाश पावल्यावेळचं आहे. त्यावेळी हे १० प्रचेते, मनू आणि मारीषा यांच्याखेरीज कुणी नव्हतेच, तर अशी बहुपतिक, एकपत्नीक कुटुंबे कुठून असणार? तो एक आपत्काली स्वीकारलेला मार्ग होता. राजवाडे त्यालाच बहुपतिक कुटुंबव्यवस्थेचं उदाहरण ठरवून टाकतात हे योग्य नाही.              प्रकरण ३ रे - आतिथ्याची एक आर्षचाल  या प्रकरणात राजवाडे आतिथ्याच्या अतिप्राचीन चालीविषयी सांगतात. आर्षकाली एखादा पुरुष घरी आलेल्या अतिथीला तसंच आपल्या मित्राला स्वतःची स्त्री अर्पण करत असे अशी मांडणी ते करतात. त्यासाठी लेटूर्नोच्या पुस्तकाचा त्यांना आधार मिळत नाही. म्हणून ते प्लुटार्क या ग्रीक लेखकाच्या लिखाणाचा आधार घेतात आणि आपल्याकडे तसं काही मिळतं का हे शोधू लागतात. निष्कर्षांची सुरुवात ते मित्राला स्त्री अर्पण करण्यापासून करतात. निष्कर्ष ११ - 'संकटसमयी आपली स्त्री समागमाकरिता आपल्या मित्राला देण्याची पूर्वी पद्धत होती.'हा निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी राजवाडे उद्योगपर्वाच्या ४५ व्या अध्यायातील १२ व्या व १३ व्या श्लोकाचा पुरावा देतात. खऱ्या मित्राची लक्षणे धृतराष्ट्राला सांगताना सनत्सुजात ऋषी म्हणतात, "संकटसमयी मित्राला आपली स्त्री देखील निर्मळ अंतःकरणाने अर्पण करावी !" हे अवतरण देऊन राजवाडे म्हणतात, 'सनत्सुजात म्हणजे कुणी अलबत्ये गलबत्ये नव्हते, महान तपस्वी होते. तेव्हा एकेकाळी भारतीयांमध्ये मित्राला स्वस्त्री संभोगार्थ देण्यामध्ये नीतिभंग होतो असे मानीत नव्हते असे विधान सप्रमाण करता येते !' (पृ. ६३)   खंडन - पहिलं म्हणजे राजवाडे ज्या श्लोकाचा उल्लेख करतात, तो 'इष्टान् जुत्रान् विभवान्' हा श्लोक नीलकंठी पाठातला असून चिकित्सक आवृत्तीमध्ये तो 'प्रक्षिप्त' ठरविण्यात आला आहे. तरीही आपण त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे का हे तपासून बघू. राजवाडे यांनी या श्लोकाचा अर्थही त्यांच्या रिवाजाप्रमाणे नीट दिलेला नाही. अर्थ देताना 'संकटसमयी' हे शब्द त्यांनी पदरचे घातले आहेत. जर 'संकटसमयी मित्राला भार्या द्यावी' असं श्लोकात म्हटलं असतं; तर तो आपद्धर्म ठरला असता, नेहमी पाळण्याचा धर्म ठरला नसता. संपूर्ण श्लोकाचा खरा अर्थ असा आहे : "आपल्या जवळील वस्तू, ज्या दुसऱ्या कुणी मागणे योग्य नाही अशा असल्या, तरी जर एखादा मित्र सारखा मागत राहिला तर त्याला शुद्ध भावनेने त्या देणे योग्य आहे. अशा वस्तू म्हणजे आपले प्रिय पुत्र, वैभव आणि आपली पत्नी." प्रसंग पडल्यास मित्रासाठी मोठा त्याग करावा हे सांगण्याचा या श्लोकाचा हेतू आहे. अशी विधाने पराकोटीला जाऊन केलेली असतात. या श्लोकातले मित्राचे लक्षण अपवादरूप आहे हे उघड आहे. असा एखादा मित्र क्वचितच असेल, की जो त्याच्या मित्राजवळ त्याचे मुलगे, वैभव आणि पत्नी मागेल. आणि वैभव किंवा पत्नी मागितली तर ती कायम स्वतःकडे ठेवण्यासाठीच मागणार. म्हणजे पत्नी तात्पुरत्या समागमासाठी मागितलेली नसणार. तेव्हा या श्लोकावरून मित्राला पत्नी अर्पण करण्याची चाल होती असं मानणं योग्य ठरणार नाही.  निष्कर्ष १२ - 'पाणिनीकाली स्वस्त्री संभोगार्थ मित्राला देण्याची रूढी होती हे 'द्वैमित्री' या शब्दप्रयोगावरून सांगता येते.' आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी राजवाडे ४. १. १८ या पाणिनीसूत्राचा आधार घेतात आणि म्हणतात, की 'प्राचीन ग्रीक व रोमन लोकांत मित्राला स्वस्त्री देण्याची जी पद्धत होती, तीच चाल पाणिनीकाली भारतात होती हे सिद्ध होते'. 'द्वैमित्री' चा अर्थ दोन मित्रांचं अपत्य. एका मित्राने आपली बायको काहीकाळ मित्राला दिली आणि त्या बायकोला अपत्य झालं तर अशा परिस्थितीत पितृत्व दोघा मित्रांकडे जाई. (बायको एकाची आणि बीजप्रद पिता दुसरा म्हणून.)  खंडन - या निष्कर्षाविषयी पहिला आक्षेप हा, की 'द्वैमित्री' हा शब्द प्राचीन नाही. या सूत्रावरील पतंजलीच्या महाभाष्यात किंवा काशिका वृत्तीत हे उदाहरण नाही. हे उदाहरण प्रथम भट्टोजी दीक्षितांच्या (१७ वे शतक) सिद्धांतकौमुदीत आढळतं. तेव्हा या शब्दाला पाणिनीच्या काळाएवढी प्राचीनता नाही. आणि दुसरं असं, की एखाद्या मित्राला गंमत म्हणून कोण आपली स्त्री समागमासाठी देईल? एखाद्या पुरुषाला मूल होत नसेल तर नियोगपद्धतीने अपत्य व्हावं म्हणून पत्नीला मित्राशी समागम करण्यास संमती देणं शक्य कोटीतील बाब आहे. तेव्हा नियोगपद्धतीचा अवलंब मित्राच्या मदतीने केल्यामुळे झालेल्या अपत्याला 'द्वैमित्री' म्हणत असत असा खुलासा करणं संयुक्तिक ठरेल. तात्पर्य, केवळ एका शब्दाची ओढाताण करून पाणिनीकाली स्वस्त्री संभोगार्थ मित्राला देण्याची रूढी किंवा चाल होती असं मानता येणार नाही.  निष्कर्ष १३ - 'प्राचीन काळी आर्यांमध्ये स्वस्त्री समागमासाठी अतिथीला देण्याची चाल होती.' मित्राला स्वस्त्री अर्पण करण्याचा विषय संपल्यावर राजवाडे आता अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याच्या विषयाकडे वळतात. आपल्या निष्कर्षाचं उदाहरण म्हणून ते अनुशासन पर्वाच्या २ ऱ्या अध्यायातील इक्ष्वाकुकुलोत्पन्न 'सुदर्शन' नामक राजाची कथा सांगतात. त्या कथेप्रमाणे सुदर्शन हा आपल्या 'ओघवती' या पत्नीसह कुरुक्षेत्री गृहस्थाश्रमी जाऊन राहिला होता. आलेल्या अतिथीला कधीही असंतुष्ट परत पाठवायचं नाही असं व्रत त्याने घेतलं होतं. आपलं हे व्रत त्याने बायकोला समजावून सांगितलं होतं. एकदा समिधा आणण्यासाठी सुदर्शन रानात गेलेला असताना एक ब्राह्मण अतिथी घरी आला. ओघवती हिने त्याचा चांगला आदरसत्कार केला. परंतु तिच्याशी समागम करण्याची इच्छा ब्राह्मणाने व्यक्त केली. त्याप्रमाणे दोघांनी समागम केला. जेव्हा सुदर्शन घरी आला व त्याला आतल्या खोलीतूनच ओघवतीने लाजत लाजत आपण अतिथीशी समागम केल्याचं सांगितलं, तेव्हा सुदर्शनाने "आज मी धन्य झालो !' असे उद्गार काढले आणि बायकोचं कौतुक केलं. खंडन - या कथेतील राजवाड्यांना अनुकूल नसलेला भाग ते वाचकांना सांगत नाहीत. ते हे सांगत नाहीत, की सुदर्शन याने मृत्यूला जिंकण्याची लोकविलक्षण प्रतिज्ञा केली होती आणि त्यासाठी अतिथीला सर्वस्व अर्पण करण्याचं व्रत घेतलं होतं. ते हेही सांगत नाहीत, की ब्राह्मणाने समागमाची इच्छा व्यक्त केल्यावर ओघवतीने पुष्कळ आढेवेढे घेतले होते आणि समागम टाळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी नाइलाजाने (नवऱ्याच्या व्रताला बाधा येऊ नये म्हणून-) ब्राह्मणाशी समागम केल्यावर ती भयंकर लज्जित झाली होती आणि म्हणूनच ती आतल्या खोलीत बसून राहिली होती. ते हेही सांगत नाहीत, की प्रत्यक्ष यमधर्म हाच सुदर्शनाची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाचं रूप घेऊन आला होता आणि संभोग झाल्याचं समजल्यावर सुदर्शन क्रोधीत झाला, की व्रतभंग झाला म्हणून तो सुदर्शनाला मारणार होता. पण सुदर्शन क्रोधीत न झाल्यामुळे संतुष्ट होऊन यमधर्माने त्याला 'मृत्युंजयी' होण्याचा वर दिला. थोडक्यात, भार्यार्पण हे अपवादरूप असल्याचंच एकप्रकारे या कथेतच सूचित केलं आहे. तरीही राजवाडे म्हणतात, 'एकेकाळी स्वस्त्री अतिथीला अर्पण करण्याची चाल आर्यांमध्ये होती हे या कथेवरून दिसते आणि त्यासाठी दुसरा आधार धुंडाळण्याची जरुरी नाही !' (पृ. ६४) वस्तुस्थिती अशी आहे, की दुसरे आधार नाहीतच. असते, तर राजवाडे त्यातला एखादा तरी दिल्याशिवाय राहिले नसते. निष्कर्ष १४ - 'अतिथीपूजनाची चाल नंतरच्या काळात गर्ह्य समजली जाऊ लागली असली तरी त्या चालीचा पगडा अद्याप कमी झाला नव्हता.'आपल्या या निष्कर्षाच्या पुष्ट्यर्थ राजवाडे शांतिपर्वाच्या २५८ व्या अध्यायात सांगितलेली चिरकारीची कथा सांगतात. गौतमपुत्र चिरकारी हा नांवाप्रमाणेच सतत विचार करत बसणारा, लवकर कृती न करणारा असा होता. एकदा गौतम ऋषी बाहेर गेला असताना इंद्र ब्राह्मणाच्या रूपात अतिथी म्हणून घरी आला. गौतमपत्नीने त्याचं आदरातिथ्य केलं आणि त्याच्या आग्रहानुसार त्याच्याशी समागमही केला. गौतम घरी आल्यावर जेव्हा त्याला पत्नीकडून ही घटना समजली तेव्हा संतप्त होऊन त्याने चिरकारी याला त्याच्या आईचा वध करण्याची आज्ञा दिली व स्वतः रानात तप करण्यास निघून गेला. कालांतराने राग शांत झाल्यावर त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला व घाईघाईने तो घरी आला. इकडे आपल्या आईचा वध करावा की करू नये यावर चिरकारीचं प्रदीर्घ चिंतन चालू असल्यामुळे त्याने अद्याप वध केला नव्हता. ते पाहून गौतमाला आनंद झाला आणि त्याने आपली आज्ञा रद्द केली. यातून असा अर्थ निघतो, की गौतमाच्या काळात त्याच्यासारख्या एखाद्याला जरी अतिथीपूजनाची ही चाल मान्य नव्हती, तरी पत्नीवर अजून जुने संस्कार असल्यामुळे तिने अतिथीच्या इच्छेप्रमाणे केलं होतं व त्यात तिची काही चूक नव्हती.  डॉ. मेहेंदळे यांचं भाष्य व स्वीकार - चिरकारी याचं नांव समर्पक आहे हे दर्शवण्यासाठी या कथेची रचना केली आहे हे उघड आहे. तथापि, स्त्रीने अतिथीला आत्मसमर्पण केल्यास तिचा दोष नाही असं या कथेत म्हणता येऊ शकत होतं. त्यामुळे तशी चाल पूर्वकाली अस्तित्वात असली पाहिजे हे स्पष्ट होतं. राजवाडे यांचे यापूर्वीचे निष्कर्ष मला मान्य नाहीत, पण या कथेवरून त्यांनी जो निष्कर्ष काढला आहे, तो मला मान्य आहे.  निष्कर्ष १५ - 'परशुराम व राम यांच्या काळात अतिथीला स्त्रीनिवेदन करण्याची चाल बंद पडली होती.' ही पायरी सिद्ध करण्यासाठी राजवाडे प्रथम जमदग्नीच्या कथेचा आधार घेतात. जमदग्नीची पत्नी रेणुका हिच्या मनात चित्ररथ गंधर्वाकडे पाहून कामवासना जागी झाली हे अंतर्ज्ञानाने ओळखून जमदग्नी संतापतात व परशुरामाला तिचा वध करण्याची आज्ञा देतात. (पृ. ६५) त्यानंतर रावणाने सीतेला पळवल्याची हकीगत सांगून राजवाडे म्हणतात, 'अतिथीला स्वशरीर अर्पण करण्याची चाल सीतेला मान्य असती, तर रामायणाचा पुढील कथाभाग घडलाच नसता !' खंडन - या संदर्भात जमदग्नीची कथा देणं गैरलागू आहे. चित्ररथ गंधर्व 'अतिथी' म्हणून रेणुकेकडे गेला नव्हता. रेणुकेला त्याने पाहिलंसुद्धा नव्हतं. तो नदीवर स्त्रियांशी क्रीडा करत असताना रेणुकेने त्याला पाहिलं होतं व तिच्या मनात कामवासना जागृत झाली होती. (खुलासा - ज्या गौतम ऋषीची कथा वर दिली आहे, त्या गौतमाचा काळ जमदग्नीनंतरचा आहे. मनुपासून जमदग्नी ३७ व्या तर गौतम ५० व्या पिढीत जन्मला. म्हणजे १३ पिढ्यांचं अंतर पडतं. (पहा- आर्यभारत खंड १, पृष्ठ ११६-११७.) मग गौतमाच्या काळातील रूढी जमदग्नीच्या काळात बंद पडली असं कसं म्हणता येईल? सुदर्शनाच्या कथेचं तेच आहे. इक्ष्वाकु कुळात सुदर्शन नामक राजा ९२ व्या पिढीत होऊन गेला. जर तोच आधीच्या कथेतील सुदर्शन असेल, तर तिथेही मोठाच कालविपर्यास होईल. राजवाडे व मेहेंदळे पिढ्या लावून न घेताच भाष्य करत आहेत याचं नवल वाटतं. दुसरं, भागवतपुराण वगळता एकाही जुन्या पुराणात वा हरिवंशात जमदग्नीची कथा नाही. भागवत पुराणात ज्या अनेक वेडगळ कथांची भरताड आहे, त्यात ही कथा सांगितली आहे. तिथून ती महाभारतात 'उचलली' आहे. ती 'प्रक्षिप्त' कशी आहे याचा उहापोह मी 'आर्यभारत खंड २' मध्ये 'पुराणांमधील भाकडकथा' या प्रकरणात केला आहे तो वाचकांनी पहावा. - हर्षद सरपोतदार.) रामायणातील रावण अतिथी रूपात सीतेकडे आला याचाही बादरायण संबंध राजवाडे आत्मसमर्पणाच्या चालीशी जोडतात. रावणाने समागमाची इच्छा सीतेकडे व्यक्त केली नव्हती. तिचा एकवार उपभोग घेऊन जायला तो आला नव्हता. तिचं अपहरण करून तिच्याशी विवाह करण्याच्या उद्देशाने तो आला होता. (पहा- वाल्मिकी रामायण, उ. ४५. १, २४, २७, ४७ इत्यादी.)तात्पर्य, या निष्कर्षासाठी दिलेले दोन्ही संदर्भ असंबद्ध असल्यामुळे त्यांमधून काहीच सिद्ध होत नाही. निष्कर्ष १६ - (इथपर्यंत विवेचन करून झाल्यावर राजवाडे पुन्हा एकदा यूथावस्थेचा आढावा घेतात व हा निष्कर्ष काढतात.) 'कृतयुगात समागमासाठी आई-बाप-भाऊ-बहीण हा भेद नव्हता. कुणीही कुणाशीही समागम करत असे. त्रेतायुगात स्त्रीपुरुष आपापल्या आवडीप्रमाणे समागम करत असत. द्वापारयुगात मैथुनधर्म- म्हणजे जोडप्याने राहणे- सुरु झाले. आणि कलियुगात विवाहसंस्था म्हणतात ती उदयाला आली.' हा निष्कर्ष काढण्यासाठी राजवाडे शांतिपर्वाच्या २०० व्या अध्यायातील 'न चैषां मैथुनो धर्मो' या श्लोकापासून पुढल्या ३ श्लोकांचा आधार घेतात. (१२. २००. ३५, ३६, ३७)  खंडन - आपल्या विचित्र मताला आधार मिळवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं राजवाड्यांनी वरील श्लोकांचा केलेला अर्थ हे एक उदाहरण आहे. शांतिपर्वातील या श्लोकांचा अर्थ असा होत नाही. खरा अर्थ असा होतो- "चराचर सृष्टी उत्पन्न झाल्यावर मनुष्यांत मैथुन धर्म- म्हणजे प्रजोत्पत्तीसाठी स्त्रीपुरुष समागम- लगेच आवश्यक ठरला नाही. कृतयुगात नवराबायको दोघांच्या मनात 'अपत्य व्हावं' असा नुसता विचार आला तरी गर्भधारणा होई. त्रेतायुगात नवराबायकोने एकमेकांना स्पर्श केला तरी प्रजोत्पत्तीसाठी तो पुरेसा असे. द्वापारयुगात स्त्रीपुरुषांना प्रथम मैथुनधर्म स्वीकारावा लागला आणि पुढे कलियुगातही तीच स्थिती चालू राहिली." थोडक्यात पहिल्या दोन युगांत प्रजोत्पत्तीसाठी समागम आवश्यक नव्हता व पुढल्या दोन युगांत समागम आवश्यक ठरला हे त्या श्लोकांतून स्पष्टपणे सांगितलं आहे. पण त्या श्लोकांचा अत्यंत विपरीत असा अर्थ काढून राजवाडे वर काय करतात? तर इतक्या प्राचीन काळी समाजशास्त्रीय परंपरा इतकी नामी सांगणाऱ्या भीष्माविषयी आदर व्यक्त करून त्याची पाठ थोपटतात ! भीष्म राजवाड्यांच्या काळात हयात असते, तर त्यांनी देखील असा अर्थ श्लोकांतून काढून दाखवल्याबद्दल राजवाड्यांची पाठ थोपटली असती.वरील श्लोकांत 'मैथुनो धर्म:' याचा राजवाड्यांनी 'विवाह करून स्त्रीपुरुषांनी जोडप्याने राहणे' असा जो अर्थ केला आहे, तो चूक आहे. 'मैथुन धर्म' म्हणजे स्त्री-पुरुष या मिथुनाने, जोडप्याने, आचारावयाचा धर्म. आणि 'अपत्यमुदपद्यत', 'जायते प्रजा:' अशा वरील श्लोकांत आढळणाऱ्या शब्दप्रयोगांनी प्रजोत्पत्ती अभिप्रेत असल्याने प्रस्तुत संदर्भात 'मैथुनो धर्म:' चा अर्थ नवरा-बायको या जोडप्याने करावयाचा समागम असाच आहे. प्रजोत्पत्तीसाठी स्त्रीपुरुष समागम आरंभापासूनच आवश्यक होता, की नंतर केव्हातरी सुरु झाला हे या श्लोकांत सांगितलं आहे. तात्पर्य, राजवाडे यांचं सर्व विवेचन हा एक कल्पनेचा खेळ असून त्यांनी लावलेल्या चुकीच्या अर्थावर तो आधारलेला आहे.  प्रकरण ४ थे - अग्नि व यज्ञ  या प्रकरणात राजवाडे अग्नीला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचं स्थान का प्राप्त झालं याचा उहापोह करतात. अग्नीला साक्ष ठेवूनच भारतीय लोक विवाह संपादन करतात म्हणजे आर्ष पूर्वजांचं अग्नीने काहीतरी मोठं कार्य केलं असलं पाहिजे असं मानून राजवाड्यांचे तर्क सुरु होतात. अग्नीमुळे हिंस्त्र श्वापदांपासून रक्षण, मग पाकसिद्धी, झोपडीत खाचा करून त्यांत अग्नी जतन करणं, त्यातून झालेली प्रगती, मग अग्नी हा पूर्वजांचा सुखकर्ता दुःखहर्ता देव बनणे या सगळ्याचं वर्णन करण्यात राजवाडे रंगून जातात. मग खालीलप्रमाणे ते एक एक निष्कर्ष काढू लागतात.  निष्कर्ष १७ -  'भारतीयांचे रानटी पूर्वज रात्री अग्निकुंडाच्या भोवती सारवलेल्या जमिनीवर झोपून उघड्यावर  सरमिसळ समागम करत असत.' या निष्कर्षाच्या पुष्ट्यर्थ राजवाडे ऋग्वेदातील ५ व्या व ६ व्या मंडलातील त्यांना सहजगत्या आढळलेल्या ६ ऋचांचा पुरावा देतात. या ऋचांमधून यजमानाने अग्नीकडे संततीची, प्रजेची याचना केली आहे. असं का? तर राजवाड्यांच्या मते अग्नीजवळ समागम होत असला पाहिजे म्हणूनच त्याच्याकडे संततीची वा प्रजेची मागणी केली जात असली पाहिजे.   खंडन - राजवाड्यांनी जी ६ उदाहरणे दिली आहेत, त्यांत ५ व्या मंडलातील एकही उदाहरण नाही. आणि ६ व्या मंडलातील केवळ एकच उदाहरण आहे. उर्वरित ऋचांपैकी ३ तिसऱ्या मंडलातील तर २ चौथ्या मंडलातील आहेत. (३. १. २३, ३. १६. ६, ३. १६. १, ४. २. ५, ४. ११. ३ व ६. १३. ६) राजवाडे नेमकेपणाविषयी कसे दक्ष असत नाहीत हे दाखवणं एवढाच हेतू हा तपशील देण्यामागे आहे. शिवाय प्रत्येक सूक्ताचा किंवा ऋचेचा नेमका संदर्भही ते सांगत नाहीत. अग्नीजवळ ऋषी केवळ प्रजाच मागतात असं नसून रत्न, धन, पुष्टी, वीरपुत्रयुक्त यशही मागतात. शिवाय देवाला यज्ञाकडे किंवा यज्ञाला देवाकडे नेण्याची प्रार्थनाही करतात. उपासकाचं भद्र आणि स्वस्ति करण्यास आळवतात. याच गोष्टी ते अन्य देवतांकडेही मागतात, केवळ अग्नीकडेच मागतात असं नाही. त्यामुळे अग्नीजवळ संततीची किंवा प्रजेची मागणी करणे हा त्याच्या सान्निध्यात प्रजोत्पादन होत असे याचा सबळ पुरावा होऊ शकत नाही.   निष्कर्ष १८ - 'बर्हि नामक गवत अग्निकुंडाभोवती अंथरून व त्यावर झोपून वेगवेगळे प्रजापती आणि त्यांच्या स्त्रिया समागम करत असत.' हा निष्कर्ष काढण्यासाठी राजवाडे तैत्तरीय संहितेमधील  (१. ७. १४) 'बर्हिषा वै प्रजापतिः प्रजा असृजत I'  या ऋचेचा आधार घेतात. या वाक्याचा राजवाडे अर्थ करतात तो असा, 'बर्हिस् नामक गवत अंथरून त्यावर प्रजापतीने प्रजा उत्पन्न केल्या.' (पृ. ७५)  पुढे ते म्हणतात, 'या वाक्याचा अर्थ यजुर्वेदकालीन ऋषींना समजेनासा झाला होता. काही अतर्क्य दैवी रीतीने बर्हि घेऊन प्रजापती प्रजा उत्पन्न करीत असा चुकीचा अर्थ हे ऋषी करीत. पण खरा अर्थ हा असा आहे.  खंडन - प्राचीन ऋषींना जो अर्थ कळला नाही तो विसाव्या शतकातील राजवाडे यांना कळला म्हणजे राजवाडे यांचा आत्मविश्वास किती दांडगा असला पाहिजे ! ऋषींना अज्ञानी ठरवण्यापूर्वी राजवाड्यांनी हे विचारात घ्यायला हवं होतं, की त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ जर व्हायला हवा असेल तर ऋषींनी आधिकरणार्थी सप्तमीचं रूप वापरलं असतं. 'बर्हिषा' असं करणार्थी तृतीयेचं रूप वापरलं नसतं. खेरीज एकवचनी रूप न वापरता (झोपायला एक बर्हि पुरत नाही, अनेक लागतात.) अनेकवचनी रूप वापरलं असतं. थोडक्यात ऋषींनी 'बर्हिषा' असं न म्हणता 'बर्हि:षु' असं म्हटलं असतं. तेव्हा ऋषींनी मंत्रातील करणार्थे तृतीयेचा योग्य तोच अर्थ केला होता. आणि हा अर्थ घेतला, की राजवाड्यांचा सदर निष्कर्ष टिकत नाही.  निष्कर्ष १९ - 'कालांतराने सुधारलेल्या वैदिक समाजात यज्ञसंस्था निर्माण झाली. तथापि आपल्या रानटी पूर्वजांप्रमाणेच अश्वमेध यज्ञात यभन करण्याची नक्कल त्यांनी चालू ठेवली.' याचा खुलासा करताना राजवाडे यजुर्वेद (१. ७. ४) तै. संहिता (७. ४. १९) आणि वाजसनेयि संहिता (अध्याय २३) या पुराव्यांचा आधार घेऊन सांगतात, की "यज्ञ या शब्दाचा अर्थ 'जननार्थ समागमक्रिया करणे' हा आहे. अग्निकुंडाभोवती आपले पूर्वज सोमरस पिऊन बेहोष होत, नाचत, अश्लील बोलत व रतिक्रिया करत. एखाद्या स्त्रीस जर कोणा पुरुषाने धरलं नाही तर ती स्त्री विलाप करी. याचीच नक्कल अश्वमेध यज्ञात झाली. अश्वमेध यज्ञात घोडा मृत होऊन पडल्यावर त्याच्यावर वस्त्र पांघरून यजमानपत्नीला (राणीला) त्याच्या शेजारी निजवीत. कल्पना अशी असे, की बलाढ्य पुत्र होण्याकरिता घोडा व राणी यांचा समागम होतो आहे. मग मंत्र म्हणून ऋत्विज घोड्याचे लिंग राणीच्या योनीजवळ आणी..." इत्यादी.  खंडन - राजवाड्यांनी शब्दच्छल करून केलेला 'यज्ञ' शब्दाचा अर्थ चुकीचा आणि यास्कालाही लाजवणारा आहे. 'अग्नीत टाकलेल्या आहुतीद्वारा देवांची आराधना करणे' हा यज्ञ या शब्दाचा योग्य अर्थ आहे. पूर्वाश्रमीचे आर्य असलेल्या पारश्यांच्या झेंद अवेस्तामध्ये यज्ञ या शब्दाप्रमाणे 'यस्न' हा शब्द असून त्याचाही अर्थ तोच आहे. त्यात असं काहीही अश्लील सांगितलेलं नाही. वर राजवाड्यांनी दिलेल्या संदर्भांमध्ये अश्वमेधाच्या प्रसंगी बोलल्या जाणाऱ्या अश्लील संवादांचा खुलासा मात्र मला करता येत नाही. अन्य कुणी केला असल्यास तो मला माहीत नाही. त्रेतायुगात रामाने अग्निकुंडापाशी सीतेची सोन्याची प्रतिमा ठेवून अश्वमेध यज्ञ केला होता. पण त्यात अश्लील कृती किंवा संवादांचा उल्लेख आलेला नाही. द्वापारयुगात युधीष्ठीराने अश्वमेध केला त्यावेळी द्रौपदीला मृत घोड्याच्या शेजारी निजवल्याचं म्हटलं असलं (१४. ९१. २), तरी अश्लील संवाद घडल्याचं म्हटलेलं नाही. इसवी सनाच्या पहिल्या शतकात काही राजांनी अश्वमेध यज्ञ केल्याचं डॉ. पां. वा. काणे यांच्या 'History of Dharmasastra Literature' या ग्रंथात म्हटलं आहे (खंड २. २. १२३९, २. २. १०२८). पण तिथेही अश्लील भाषेचा उल्लेख नाही. राजवाड्यांनी बारीक टाईपात दोन पृष्ठे भरून (७७ व ७८) जो अर्वाच्य मजकूर या ग्रंथात धिटाईने उतरवला आहे, तो इथे देण्याचं धैर्य माझ्यात नाही. पण त्यात त्यांनी काही पदरची वाक्ये घातली असावीत असा संशय येतो. उदा. 'मंत्र म्हणून ऋत्विज घोड्याचे लिंग राणीच्या योनीजवळ आणी' हे वर दिलेलं वाक्य तैत्तरीय संहितेत अजिबात नाही. राजवाड्यांचं असं निराधार लेखन अत्यंत आक्षेपार्ह आहे. (टीप - अश्वमेधाच्या प्रसंगी बोलल्या जाणाऱ्या अश्लील संवादांचा खुलासा दयानंद सरस्वती यांनी केला आहे. त्यांच्या मते हे सर्व पंचमक्कारांनी- म्हणजे वामपंथी शाक्त किंवा चार्वाकांनी- नंतर घुसडलेलं आहे. मृत घोड्यापाशी राणीला निजवणे व अश्लील संवाद करणे हा वैदिक धर्माचा व अश्वमेध यज्ञाचा भाग कधी नव्हता व आजही नाही. (पहा- 'पृष्ठ २६८ पासून पुढे, 'सत्यार्थ प्रकाश', दयानंद सरस्वती, करवीर आर्यसमाज कोल्हापूर, १९५६.) दयानंद सरस्वतींचं हे म्हणणं लक्षात घेता या अश्लील गोष्टी रामायणाच्या नंतरच्या व महाभारताच्या आधीच्या काळात कधीतरी घुसडल्या गेल्या असतील असं वाटतं. - हर्षद सरपोतदार.)  निष्कर्ष २० - 'इथपर्यंत जे विवेचन केले त्यावरून स्पष्ट होते, की अग्निकुंडाभोवती रानटी पूर्वज प्रजोत्पादनाचे कार्य उरकीत म्हणूनच भारतीय आर्यांमध्ये विवाह अग्नीच्या समक्ष व्हावा लागतो.'या आपल्या निष्कर्षाला बळ देण्यासाठी राजवाडे पुन्हा एकदा पेटलेली अग्निकुंडे, उघड्यावरील समागम, पुरुषाचे रेतस् म्हणजे एकप्रकारचे तेज कसे असते वगैरे मांडणी आणि कल्पनाविलास करत राहतात.  खंडन - राजवाड्यांच्या या निष्कर्षाला काडीचाही आधार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. भारतीयांचे विवाह अग्नीच्या साक्षीने का होतात याचा खुलासा अन्य प्रकारे होऊ शकतो. मित्र व वरुण या दोन आदित्यांविषयी ऋग्वेदकाळी जी कल्पना होती, ती लक्षात घेतली म्हणजे अग्नीच्या साक्षीची आवश्यकता स्पष्ट होते. मित्र या वेदांमधील शब्दाप्रमाणेच अवेस्तामध्ये 'मिथ्र' हा शब्द असून दोन्हीचा बोध 'करार देवता' म्हणूनच होत असतो. तर वरुण ही 'शपथ देवता' आहे. वरुण आणि मित्र म्हणजे जणु एकाच नाण्याच्या दोन बाजू असावेत इतका त्यांचा घनिष्ट संबंध आहे. वरुणाचा वास (राहण्याची जागा) पाण्यात असतो हे ऋग्वेदात व इतर अनेक ठिकाणी स्पष्ट आहे. (उदा. ऋ. १. २१६. १, ७. ४९. ३)  त्याचप्रमाणे मित्राचा वास वनस्पतीमध्ये (त्याला 'उर्वरा' असा शब्द आहे) असतो. वाळलेल्या उर्वरा म्हणजे काष्ठे एकमेकांवर घासून जो अग्नी निर्माण होतो, तो म्हणजे मित्रदेवतेचे व्यक्त स्वरूप होय. तेव्हा अग्नीच्या साक्षीने एखादा करार करणे म्हणजे मित्रदेवतेच्या साक्षीने करार करणे असा अर्थ आहे. ऋग्वेदात मित्रदेवतेला उद्देशून स्वतंत्र असं एकच सूक्त आहे त्यात ही कल्पना स्पष्ट झाली आहे. (३. ५९)  त्या सूक्तामधील १ ल्या ऋचेतील त्याचप्रमाणे ५ व्या ऋचेतील वाक्ये (जी मेहेंदळे यांनी सविस्तर दिली आहेत) अग्नीमध्ये आहुती देण्याचा विधी चालू असताना अग्नीच्या साक्षीने मित्राचे नांव उच्चारून करार होत असल्याचं दर्शवतात. अग्नीच्या- म्हणजेच मित्रदेवतेच्या- साक्षीने करार होत असल्यामुळे करार पाळण्याचं बंधन करार करणाऱ्यांवर (म्हणजे वधु-वरांवर) येतं. करार करणारे तो पाळणार असल्यामुळे मित्रदेवतेची सुमती व सौमनस्य त्यांना लाभो अशी प्रार्थना ते अग्नीला करत असतात. थोडक्यात, लग्न हा वधुवरांनी केलेला एक करार आहे. अग्नीच्या साक्षीने तो संपन्न झाल्यामुळे त्याला संस्काराचं स्वरूप येतं. त्यामुळे वैवाहिक बंधन पाळण्याची व एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची जबाबदारी वधुवरांवर येते. विवाहसंबंध संपुष्टात आणणे याला आपल्याकडे 'काडीमोड घेणे' असा जो शब्दप्रयोग आहे त्याचा खुलासाही वर सांगितल्याप्रमाणे करता येतो. मित्रदेवतेचा वास काष्ठात असतो त्यामुळे ती काष्ठरूप काडी मोडली की लग्नाचा करार आणि संस्कार मोडल्याचं मानलं जातं. विवाहविच्छेदाला 'घटस्फोट' असा दुसराही शब्द आहे. वरुण या देवतेचा वास पाण्यात असतो. काडीप्रमाणे पाणी मोडता येत नाही म्हणून पाणी भरलेला घट फोडला की 'धर्मे चार्थे च कामे च नातिचरामि' ही अग्निपाशी घेतलेली शपथ भंग केली जाते व विवाहाचा शेवट केला जातो. अशाप्रकारे करारदेवता व शपथदेवता यांना साक्षी ठेवून केलेला विवाह त्यांनाच साक्षी ठेवून मोडला जातो. तात्पर्य; मित्रवरुण, अग्नी, पाणी आणि विवाहसंस्कार यांचे परस्पर संबंध अशा प्रकारचे आहेत. राजवाडे म्हणतात तसे नाहीत.  समारोप  इतिहासाचार्य राजवाडे यांनी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकात केलेलं विवेचन आणि काढलेले निष्कर्ष आपण पाहिले. विवाहसंस्था म्हटली की स्त्रीपुरुष समागम आणि प्रजोत्पादन ही दोनच लक्षणे राजवाड्यांच्या डोळ्यासमोर येतात. पण एखादा अपवाद वगळता त्यांचे कुठलेही निष्कर्ष त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर टिकू शकत नाहीत हे वर दाखवलं आहे. विवाहसंस्था अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळात राजवाडे म्हणतात तशा संकीर्ण समागमाच्या चाली वगैरे अस्तित्वात असतीलही. त्यासाठी पुरावा नाही एवढंच म्हणायचं आहे.  - हर्षद सरपोतदार  मुख्य संदर्भ :-  १. 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' - वि. का. राजवाडे - लोकवाङ्मयगृह, १९८६.  २. डॉ. म. अ. मेहेंदळे यांचे व्याख्यान - भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक - वर्ष ८५, अंक १ ते ४, शके १९३१.                                                                                                                                                                                                                                                                                                                    

Sunday, December 5, 2021

आदी शंकराचार्यांचा काळ 

देशभरातील बौद्ध धर्माचा प्रभाव हटवून आदी शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली असं सामान्यतः मानलं जातं. गोनंद (तिसरा) हा राजा काश्मीरच्या गादीवर येण्यापूर्वीच बौद्धांचा वैदिक हिंदू धर्मीयांना किती जाच सुरु झाला होता हे काश्मीरचा इतिहासकार कल्हण याने  'राजतरंगिणी' ग्रंथात नमूद केलं आहे. (तरंग १, श्लोक १७७ ते १८४). अशा परिस्थितीत केरळातील पेरियार अथवा पूर्णा नदीच्या काठी कालडी (किंवा कालटी) गावात जन्मलेल्या शंकराचार्यांनी वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी देशभर प्रवास केला, अनेक विद्वानांना वादांमध्ये पराभूत केलं आणि तत्कालीन राजेरजवाड्यांना परत एकदा हिंदू धर्माची दीक्षा दिली. त्याचबरोबर देशाच्या चार कोपऱ्यांमध्ये खालील चार पीठे स्थापन करून हिंदू धर्म शाश्वत जिवंत राहील याची काळजीही घेतली.   १. दक्षिणेला यजुर्वेद प्रधान शृंगेरी शारदा पीठम  २. उत्तरेला अथर्ववेद प्रधान बदरी ज्योतिर्मय पीठम  ३. पूर्वेला ऋग्वेद प्रधान पुरी गोवर्धनमठ पीठम  ४. पश्चिमेला सामवेद प्रधान द्वारका शारदा पीठम             भारताच्या व हिंदू धर्माच्या दृष्टीने इतकं महत्वाचं कार्य करणाऱ्या शंकराचार्यांचा नेमका काळ मात्र अजूनही ठरवता आलेला नाही. केवळ बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शंकराचार्यांचे वेगवेगळे काळ ठरवले गेले आहेत ते खालीलप्रमाणे; १. द्वारका पीठ आणि गोवर्धन पीठ इथे असलेल्या पूर्वापार नोंदींप्रमाणे शंकराचार्यांचा काळ इ. स. पूर्व ५०९ ते इ. स. पूर्व ४७७ हा आहे. पण हा काळ चुकीचा आहे हे पुढील उहापोहावरून लक्षात येईल. काश्मीरमध्ये दाल लेकजवळ शंकराचार्यांच्या नांवाची एक टेकडी आहे. या टेकडीवरील मंदिरालाही शंकराचार्यांचं मंदिर असंच म्हटलं जातं. पण मुळात ते ज्येष्ठेश्वराचं (म्हणजे शिवशंकराचं) मंदिर असून आदी शंकराचार्यांनी त्याला भेट देऊन त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळेच  त्याला 'शंकराचार्य मंदिर' असं संबोधलं जाऊ लागलं. हे ज्येष्ठेश्वर मंदिर काश्मीरचा राजा गोपादित्य याने बांधल्याचं कल्हण याने 'राजतरंगिणी' ग्रंथात निःसंदिग्धपणे म्हटलं आहे. (तरंग १, श्लोक ३४१) त्यानेच नमूद केल्याप्रमाणे गोपादित्याचा काळ इ. स. पूर्व ३६९ ते इ. स. पूर्व ३०९ हा येतो. याचा अर्थ शंकराचार्यांचा काळ त्यानंतरचा असणार हे उघड आहे. त्यामुळे इ. स. पूर्व ५०९ ते ४७७ हा काळ चुकीचा ठरतो.  २. १३ व्या शतकातील भाष्यकार आनंदगिरी यांनी शंकराचार्यांचा जन्म इ. स. पूर्व ४४ व मृत्यू इ. स. पूर्व १२ मध्ये झाल्याचं म्हटलं आहे. पण त्याचा कुठलाही आधार त्यांनी दिलेला नाही.          ३. डॉ. रामकृष्ण भांडारकर यांनी शंकराचार्यांच्या जन्माचा काळ इ.स. ६८० असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. पण या अंदाजालाही भक्कम आधार नाही.     ४. मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी इ. स. ७८८ ते ८२० हा काळ नक्की केला आहे.   वरीलपैकी कुठल्याही काळाला ठोस असा आधार नाही. त्यामुळे शंकराचार्यांचा नक्की काळ समजणं कठीण झालं आहे.               आदी शंकराचार्यांची मुख्यतः खालील चार प्राचीन चरित्रसाधने उपलब्ध आहेत.       अ) 'शंकर दिग्विजय'.       ब) व्यासावलकृत 'शंकर विजय'.       क) आनंदगुरु रचित 'शंकर विजय'.       ड) माधवाचार्य रचित 'शंकर विजय'.  ही सर्व चरित्रे संस्कृत भाषेत असून त्यापैकी कुठल्याही चरित्रात शंकराचार्यांचा काळ दिलेला नाही. मराठीत शंकराचार्यांची दोन जुनी चरित्रे उपलब्ध आहेत. एक, महादेव राजाराम बोडस यांचं 'श्री शंकराचार्य व त्यांचा संप्रदाय' (१९२३) आणि दुसरं, रामचंद्र गोविंद कोलंगडे लिखित 'श्री जगद्गुरू आद्य शंकराचार्य' (१९६६). या चरित्रांमध्ये काही तत्कालीन राजांची नांवे आली आहेत. हे राजे असे; १. केरळ नरेश राजशेखर (पृ. २ व ५०, कोलंगडे.) :- याचा उल्लेख स्वतः शंकराचार्यांनी 'शिवानंदलहरी' तील ७० व्या श्लोकात 'अगणित फलदायकः प्रभुर्मे, जगदधिको हृदि राजशेखरोस्ति' असा केला आहे. या नांवाचे दोनतीन प्रसिद्ध राजे सापडतात पण त्यांचा काळ बराच नंतरचा- म्हणजे ९ व्या शतकापासून पुढचा आहे. उदाहरणार्थ, राम राजशेखर या मध्य केरळमधील कोडांगलूर येथील चेर राजाचा काळ इ. स. ८७० ते ८८३ हा आहे. पंडालम येथील दुसरा एक पांड्य राजा राजशेखर वर्मा याचा काळ इ. स. ९०३ पासून सुरु होतो. संशोधकांनी साधक बाधक विचार न करता शंकराचार्यांची सांगड यापैकी एका राजाशी घालायचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या मते शंकराचार्यांना भेटलेला राजशेखर हा एक लहानसा स्थानिक राजा असावा.  २. कर्नाटक प्रांतातील राजा व शंकराचार्यांचा शिष्य सुधन्वा (पृ. ११९ व २२६, कोलंगडे.) :- या राजाच्या ताम्रपटात युधिष्ठिर शक २६६३ चा (म्हणजे इ. स. पूर्व ४७६) उल्लेख आल्याचं राजराजेश्वर कृत 'विमर्श' मध्ये पृष्ठ ३२ नमूद केल्याचं बोडस यांनी म्हटलं आहे. हे राजराजेश्वर पुढे स्वतः द्वारकापीठाचे शंकराचार्य बनले. परंतु, ते म्हणतात तो ताम्रपट कुठेच उपलब्ध नसल्यामुळे या माहितीवर विश्वास ठेवता येत नाही.          ३. कांची येथील राजा राजसेन (पृ. २२९, कोलंगडे.) :- अशा नांवाचा राजा मला तरी सापडला नाही. हाही कदाचित एखादा लहानसा तत्कालीन संस्थानिक असावा.     ४. नेपाळ नरेश शिवदेव (पृ. २५६, कोलंगडे.) :- नेपाळच्या शिवदेव (पहिला) या लिच्छवी राजाचा काळ इ. स. ५९० ते ६०५ हा आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरीस शंकराचार्य नेपाळमध्ये गेले होते व या राजाशी त्यांची भेट झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. जर शिवदेव याचा काळ बरोबर असेल व हाच तो शिवदेव असेल, तर शंकराचार्यांचा काळही नक्की होतो असं म्हणावं लागेल.  ५. महिष्मती जवळील प्रदेशाचा राजा अमरु किंवा  अमरुका (पृ. १७४, कोलंगडे.) :- एका वादाच्या निमित्ताने मंडनमिश्र यांची पत्नी शारदा हिने शंकराचार्यांना कामजीवनाविषयी काही प्रश्न विचारले.  तेव्हा बालब्रह्मचारी असलेल्या शंकराचार्यांना त्यावर काही बोलता आलं नाही. म्हणून त्यांनी मुदत मागून घेतली व राजा अमरु याच्या विलासमहालात राहून सहा महिने त्यांनी कामजीवनाचा अभ्यास केला. नंतर शारदा हिला भेटून त्यांनी तिला वादात पराभूत केलं अशी आख्यायिका आहे. (या विषयावर 'अमरु शतक' नामक शृंगारिक ग्रंथही शंकराचार्यांच्या नांवावर आहे.) पण अमरु नांवाचा राजा सापडत नाही. मात्र महिष्मतीवर इ. स. ५७५ ते ६०० या काळात राज्य करणारा एक कलचुरी राजा स्वतःला 'शंकरगण' म्हणजे 'शंकराचा शिष्य' असं म्हणवून घेतो. यातील 'शंकर' म्हणजे शंकराचार्य असण्याची शक्यता आहे व तसं असेल तर हा राजा अमरु असू शकेल. याचा काळही नेपाळ नरेश शिवदेव याच्या काळाशी जुळतो.             वरील निष्कर्षाला पाठबळ देणारा आणखी एक पुरावाही देता येईल. शृंगेरी पीठाचे सध्याचे शंकराचार्य श्री. भारती तीर्थ हे त्या पीठाच्या दाव्यानुसार त्यांचे सलग ३६ वे शंकराचार्य आहेत. २०२१ साली यांच्या कारकिर्दीला ३२ वर्षं पूर्ण झाली व ते अजूनही विद्यमान आहेत. त्यापूर्वीच्या तीन शंकराचार्यांचा काळ असा होता :  -३५ वे शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ (१९५४-१९८९) = ३५ वर्षं  -३४ वे शंकराचार्य चंद्रशेखर भारती तिसरे (१९१२-१९५४) = ४२ वर्षं  -३३ वे शंकराचार्य नृसिंह भारती (१८७२-१९१२) = ४० वर्षं   यावरून एका शंकराचार्यांची कारकीर्द सरासरी ४० वर्षं धरायला हरकत नसावी. त्याप्रमाणे गणित केल्यास ३५ शंकराचार्यांची कारकीर्द १४०० वर्षांची येते. (३५ x ४०). १९८९ पासून १४०० वर्षं मागे गेल्यास इ. स. ५८९ हे वर्ष मिळतं. हा काळ शंकरगण आणि शिवदेव या राजांच्या काळाशी जुळतो. त्यामुळे इ. स. च्या ६ व्या शतकाचा उत्तरार्ध हाच आदी शंकराचार्यांचा काळ असावा असा निष्कर्ष काढता येतो. - हर्षद सरपोतदार   

Thursday, March 4, 2021

इथे मूलनिवासी कुणीही नाही !   

वैदिक आर्य बाहेरून भारतात आले की मूळचे भारतातीलच होते हा एक कायमचा वादाचा विषय बनला आहे. याचा गैरफायदा उठवून काही लोक विशिष्ट जातिसमूहाला 'तुम्ही मूलनिवासी नाही, तुम्ही बाहेरून आलात' असं हिणवून समाजात दुफळी माजवायचा प्रयत्न करत असतात. याउलट हिंदुत्ववादी लोक सर्वशक्तीनिशी आपण भारतातील मूलनिवासी असल्याचा दावा करत असतात. हे असले वाद म्हणजे या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या अडाणीपणाचे द्योतक आहेत. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या 'फोडा आणि झोडा' धोरणाचाच हा परिणाम आहे. मध्यंतरी माझ्याकडे 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' या शीर्षकाचं एक लहानसं चोपडं 'भारतीय विचार साधना' या संस्थेकडून कुणीतरी आणून दिलं; त्यातही डॉ. आंबेडकरांचा दाखला देऊन आर्य हे मुळात इथलेच कसे आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आढळला. (पृ. २५) माझ्या मते मूलनिवासी असल्याचा किंवा नसल्याचा हा भयगंड अकारण बाळगला जात आहे. याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे,   १. आधुनिक विज्ञानातील सिद्धांताप्रमाणे सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज जो Homo Erectus या नांवाने ओळखला जातो, तो आफ्रिकेतून भारतीय उपखंडात आला. त्यानंतर अंदाजे ५५,००० वर्षांपूर्वी पहिला आदिमानव (Homo Sapiens) याचं आफ्रिकेतूनच भारतात आगमन झालं. दरम्यान कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे किंवा आदिमानवासह झालेल्या संघर्षांमुळे Homo Erectus नामशेष झाला. असं असलं तरी आदिमानवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचे पुरावे मात्र ३०,००० वर्षांपलीकडे सापडत नाहीत. त्यापूर्वी भारतात मानवप्राणी नव्हता. (Page 1, 'A Population History of India') याचा अर्थ उघड आहे; की आर्य असोत, अनार्य असोत वा तथाकथित आदिवासी असोत, भारतात सर्वच उपरे आहेत.       २. डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्या प्रतिपादनानुसार आर्य हे बाहेरूनच आले. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. (Page 49-50, 'The Aryan Problem') मात्र त्यांनी कालनिश्चिती केलेली नाही. मी स्वतः ती केली असून आर्य इ. स. पूर्व ७८०० च्या सुमारास कश्यप समुद्राकडून (Caspian Sea) भारतात आले असा सिद्धांत मांडला आहे आणि तेव्हापासून यादवकाळापर्यंतचा राजकीय आणि सांस्कृतिक हिशेब नांवानिशीवार लावून दाखवला आहे. ('आर्यभारत खंड १ व २')  ३. आर्य भारतात आले तेव्हा इथे पणि, दास, यक्ष, नाग, याक, अज, शीघ्र, मुंड, भिल्ल, गोंड, व्रात्य वगैरे अनार्य जमाती आधीच स्थायिक झाल्या होत्या. आर्यांच्या आगेमागे असुर, गंधर्व, किन्नर, हस्ती, गो, कुकुर, काक इत्यादी लोक आले. (Page 83-84, 'Riddle' -11 by Dr. Ambedkar)  या सर्व जमाती कालांतराने आर्यांच्या वैदिक हिंदू धर्मात आपापल्या संस्कृतीसह विलीन होत गेल्या. ४. पुढल्या काळात शक, हूण, कुशाण, ग्रीक, पर्शियन आदी लोक भारतात आले आणि कालांतराने इथला धर्म स्वीकारून इथल्या संस्कृतीत विरघळून गेले. ही प्रक्रिया इतक्या बेमालूमपणे पार पडली की आज आपल्या धमनीत वाहणारं रक्त कुणाचं आहे, आपण नेमकी कुठली संस्कृती आचरत आहोत आणि कुणाच्या देवता पूजत आहोत हे सांगणं अशक्यप्राय आहे. एकप्रकारे हे समरस्य आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.    ५. निव्वळ महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तरी असंच आढळतं, की महाराष्ट्रातही मूलनिवासी कुणीही नव्हता आणि नाही. वि. का. राजवाडे यांच्या 'महाराष्ट्राची वसाहत' आणि 'महाराष्ट्र व उत्तर कोकणची वसाहत' या दोन लेखांत नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वप्रथम गुहेमध्ये राहणारे 'कातवडी' लोक अंदाजे चार हजार वर्षांपूर्वी आले. त्यानंतर नाग, वारली, कोळी आणि ठाकर हे आले. (पृ. १५२, 'राजवाडे लेखसंग्रह') पुढे मगधातील बौद्ध क्रांतीला कंटाळून तेथील चातुर्वर्ण्ययुक्त 'महाराष्ट्रिक' लोक दक्षिण अरण्यात शिरले. मागोमाग कुरुपांचाल प्रदेशातील 'राष्ट्रिक' हेही येते झाले. काही काळाने उत्तरकुरु आणि उत्तरमद्र येथील विराटाच्या राज्यातले 'वैराष्ट्रीक' जानपद सुद्धा महाराष्ट्रात आले. (पृ. ११८-११९, 'राजवाडे लेखसंग्रह') या सर्व लोकांचं एकत्रीकरण होऊन सध्याचे मराठी लोक कसे बनले याचं सविस्तर विवेचन राजवाडे यांनी अनेक संदर्भ देऊन या दोन लेखांमध्ये केलं आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही कुणाला 'मूलनिवासी' म्हणता येणार नाही. आपण सगळे इथेही उपरेच आहोत. तेव्हा यापुढे असले वाद घालणं संबंधितांनी बंद करावं हे बरं.                                                               संदर्भ :- १. 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' - रवींद्र साठे - भारतीय विचार साधना, पुणे, २००५.  २. 'A Population History of India' - Tim Dyson - Oxford University Press, UK, 2018.  ३. 'The Aryan Problem' - Editors Deo & Kamath - Bharatiy Itihas Sankalan Samiti, Pune, 1993. ४. 'आर्यभारत खंड १ व २' - हर्षद सरपोतदार - विहंग प्रकाशन, पुणे, २०१६ व २०१८.      ५. Volume IV, Dr. Ambedkar, Writings & Speeches, Govt. of Maharashtra, 1987.  ६. 'राजवाडे लेखसंग्रह' - सं. लक्ष्मणशास्त्री जोशी - साहित्य अकादमी, नवी दिल्ली, २००७. 

Thursday, December 17, 2020

कुतुबमिनार, की हिंदू विजयस्तंभ ?

 भा.ज.प. चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य भा.ज.प. चे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी हे एक लेखक आणि इतिहास अभ्यासकही आहेत. 'कुतुब मिनार - भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार' नामक त्यांचं पुस्तक (प्रकाशक- विराट प्रकाशन, पुणे.) अलीकडेच वाचनात आलं. त्यात त्यांनी कुतुब मिनार हा मुसलमानी मिनार नसून भारतीय हिंदू परंपरेतील विजयस्तंभ असावा अशी शंका प्रदर्शित केली आहे. त्यांचं म्हणणं थोडक्यात खाली मांडतो. 

१. कुतुब मिनार हा कुतुबुद्दीन ऐबक याने ११९३ साली हिंदुस्थानवरील स्वतःच्या विजयाचं स्मारक म्हणून बांधला असं आपल्याला शालेय इतिहासापासून शिकवलं जातं. पण हा स्तंभ आणि त्या परिसरातील इमारती मुसलमानी आक्रमण होण्यापूर्वीपासूनच तिथे उभ्या असल्याच्या वस्तुस्थितीला पुरावे आहेत. 

२. कुतुबुद्दीन ऐबक हा महंमद घोरी याचा आधी गुलाम आणि नंतर सेनापती होता. ११८० साली भारतात स्वारीच्या निमित्ताने आलेला कुतुबुद्दीन ११८६ मध्ये अफगाणिस्तानात परत गेला. १२०६ साली घोरीचा खून करून 'बादशाह' म्हणून तो भारतात परत आला आणि लवकरच १२१० साली त्याचा मृत्यू झाला. लाहोर ही त्याची राजधानी होती, त्याचा राज्याभिषेकही लाहोरला झाला आणि त्याचा मृत्यूही तिथेच झाला. या सगळ्या घटनाक्रमात कुतुब मिनारसारखं भव्य बांधकाम करण्याचं वेळापत्रक कसं जुळतं हे आजपर्यंत कुठल्याही इतिहासकाराने उलगडून दाखवलेलं नाही. त्याचप्रमाणे लाहोर आणि दिल्ली यांचा मनोरा बांधण्यापुरता काय संबंध? याचाही खुलासा कुणी केलेला नाही.   

३. मुहंमद घोरीने पृथ्वीराज चौहानवरील विजयाचं स्मारक म्हणून हा मिनार बांधायला घेतला असं काही 'मान्यवर' इतिहासकार सांगतात. पण घोरीने पानिपतजवळ तराई या ठिकाणी पृथ्वीराजचा पराभव केला असताना हा मनोरा दिल्लीजवळ का उभारला? आणि त्याचं नांव 'घोरी मनोरा' न ठेवता 'कुतुब मिनार' ठेवण्याचं कारण काय? या प्रश्नांचीही उत्तरे कुणी दिलेली नाहीत. 

४. मुळात दानस्तंभ किंवा विजयस्तंभ उभारण्याची परंपरा हिंदूंमध्ये आहे (उदा मौर्य किंवा गुप्त सम्राटांचे स्तंभ.) तशी मुसलनांमध्ये असल्याचं दिसत नाही. मशिदीला मनोरे असतात पण ते मशिदीपेक्षा उंच नसतात. कुतुब मिनारच्या परिसरातही (तथाकथित) मशीद आहे. पण त्या मशिदीपेक्षा हा मनोरा उंच कसा? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही. 

५. इब्न बतूता हा सुप्रसिद्ध मोरोक्कन प्रवासी इ. स. १३३३ ते १३३७ या काळात भारतात मोहंमद तुघलकच्या दरबारात न्यायाधीश म्हणून काम करत होता. तो या मिनारविषयी आपल्या पुस्तकात म्हणतो, 'हा स्तंभ कुणी उभा केला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही.' बतूता याने काही वेळा कुतुबुद्दीन ऐबक याचा उल्लेखही पुस्तकात केला आहे. पण हा मनोरा त्याने बांधला असं चुकूनही तो म्हणत नाही किंवा या मनोऱ्याचा 'कुतुब मिनार' असा उल्लेखही करत नाही. 

६. वस्तुस्थिती अशी आहे, की या मनोऱ्याचा 'कुतुब मिनार' असा पहिला उल्लेख सर सय्यद अहमद खान (१८१७-१८९७) यांनी १८५२ साली लिहिलेल्या 'असर-उस-सानादीद' नामक प्रबंधात प्रथम केला. गंमत म्हणजे या प्रबंधात 'ही इमारत व हा मनोरा हिंदूंचा असून पृथ्वीराज चौहान याने आपल्या मुलीसाठी हा मनोरा बांधवून घेतला' असं विधान त्यांनी केलं आहे. आणि तरीही ते त्याला 'कुतुब मिनार' का म्हणत आहेत याचा खुलासा होत नाही. अर्थात त्यांच्या कुठल्याच विधानाला त्यांनी कसलाही आधार किंवा संदर्भ सदर प्रबंधात दिलेला नाही.

७. कुतुब मिनारच्या आवारातील तथाकथित मशिदीचं बांधकाम अर्धवट अवस्थेतच आहे व त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर हिंदू मंगलकलशाचं चिन्ह कोरलेलं आहे. एवढंच नव्हे, तर त्या इमारतीत आणि संपूर्ण आवारात गणपती, महावीर, शिव-पार्वती, यक्ष, अप्सरा, सवत्स धेनू, घंटा, गोमुख अशी शेकडो हिंदू चिन्हे आणि मूर्ती कोरलेल्या आढळतात. खुद्द मनोऱ्याच्या भिंतीवरही वेलबुट्टी, साखळ्या, घंटा अशा हिंदू चिन्हांबरोबरच संस्कृतमधील मजकूरही आढळतो. 'घंटा' ही मुसलमानी परंपरेत निषिद्ध असून ते सैतानाचं वाद्य समजलं जातं. पण विरोधाभास म्हणजे या मनोऱ्याच्या व मशिदीच्या भिंतीवर सर्वत्र अनेक घंटा कोरलेल्या दिसून येतात. 

८. या मिनाराजवळ असणाऱ्या ज्या बांधकामाला सध्या 'मशीद' म्हणून संबोधलं जातं, तो वास्तविक हिंदू सभामंडप आहे हे हिंदूंच्याच नव्हे, तर तिथे फिरणाऱ्या परदेशी पर्यटकांचाही लक्षात आल्याशिवाय रहात नाही. कारण संपूर्ण वास्तुरचना व त्यावर कोरलेली चिन्हे ही पूर्णपणे हिंदू पद्धतीचीच आहेत. त्याचप्रमाणे ज्याला 'सराई' म्हटलं जातं असा तेथील भागसुद्धा कुठल्याही हिंदू परंपरेतील धर्मशाळेच्या ओवऱ्यांप्रमाणेच असून त्यावरही कित्येक हिंदू चिन्हे कोरलेली आहेत. 

९. आश्चर्याची बाब म्हणजे या परिसरात नेहरूंच्या काळात पुरातत्व विभागाने लावलेला एक फलक असून त्यावर 'कुतुबुद्दीन ऐबक याने २७ हिंदू व जैन मंदिरे उध्वस्त करून व त्या सामुग्रीचा वापर करून त्याच जागी हा मनोरा बांधला !' असं निःसंदिग्ध शब्दांमध्ये लिहून ठेवलं आहे. हिंदूंचा या मनोऱ्याशी असलेल्या निकटच्या संबंधांची ही एकप्रकारे कबुलीच आहे.      

१०. प्रा. एम. एस. भटनागर या संशोधकांनी १९६१ पासून सतत १५ वर्षं या मनोऱ्याचा आणि त्या परिसराचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे, की दिल्लीजवळचा 'मेहरौली' हा परिसर प्राचीन काळी सम्राट विक्रमादित्याच्या राजधानीचं ठिकाण होतं व सुप्रसिद्ध गणिती वराह मिहीर हा त्याच्या पदरी होता. (मिहीर वरूनच मेहरौली नांव पडलं.) हा मनोरा म्हणजे 'विष्णुस्तंभ किंवा ध्रुवस्तंभ' या नांवाने ओळखला जाणारा अवकाश निरीक्षणासाठी बांधलेला त्याच्या वेधशाळेचा भाग होता. विमानातून पाहिल्यास मनोऱ्याच्या माथ्यावर २४ पाकळ्यांचं कमळ स्पष्टपणे दिसतं असा दावा भटनागर यांनी केला आहे. 

वर दिलेल्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर माधव भांडारी यांचा हा दावा आधुनिक अभ्यासकांनी पुन्हा एकदा तपासून पाहणं अगत्याचं आहे.  

Wednesday, November 25, 2020

एक महत्वाचा दुर्लक्षित शक : सीरियन शक 

 माझ्या मते प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करत असताना अभ्यासकासाठी सीरियन शकाचा (Syrian Saka) संदर्भ लक्षात घेणं अपरिहार्य आहे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. त्यामुळे इतिहासाच्या मांडणीत मूलगामी चुका आढळतात. खालील विवेचनावरून हे स्पष्ट होईल.   


१. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी जेव्हा भारताचा कलकत्ता वगैरे प्रदेश बळकावला होता तेव्हा भारतात मुख्यतः खालील चार शक अस्तित्वात होते,
अ) युधिष्ठिर शक किंवा युगाब्ध - इ. स. पूर्व ३१०१ पासून चालू. 
ब) सीरियन शक - इ. स. पूर्व ५५७ पासून चालू. 
क) विक्रम संवत - इ. स. पूर्व ५७ पासून चालू. 
ड) शालिवाहन शक - इ. स. ७८ पासून चालू. 

२. इंग्रजांचा इसवी सन मुळात ६ व्या शतकात सेंट डेनिस नामक माणसाने अंदाजातून निर्माण केला व त्याचा प्रत्यक्ष वापर इंग्लंडमध्ये ८ व्या शतकात हळूहळू सुरु झाला. भारतात हा सन इंग्रजांचं राज्य येईपर्यंत अजिबात वापरला जात नव्हता. (तपशील पहा- पृष्ठ १४-१५, 'आर्यभारत खंड १'.)     

३. वर दिलेल्या शकांपैकी सीरियन शक हा पर्शियन सम्राट सायरस द ग्रेट याने चालू केला होता व पुढे कित्येक शतके तो भारतासकट संपूर्ण आशियात वापरला जात होता. कारण  अनेक देशांमध्ये पर्शियन सम्राटाची राजवट चालू राहिली होती. सायरसनंतरचा सम्राट डोरियस याच्या 'बेहिस्तून' शिलालेखावर नजर फिरवली तरी त्या काळातील किमान तेवीस देशांवर त्याची सत्ता होती याचे दाखले मिळतात. (तपशील पहा- पृष्ठ ६५-६६,'आर्यभारत खंड ३'.) एवढ्या विशाल साम्राज्याची व्यवस्था पाहणं सुलभ व्हावं म्हणून कोणता तरी एकच शक वापरणं आवश्यक होतं व सीरियन शक हाच तो शक होता. (पहा- प्रा. हरगोविंद होले लिखित 'महाभारत कालगणनेतील षडयंत्र'.)      

४. वरील निष्कर्षाला 'नवरोज' मुळे पुष्टी मिळते. इराणी नववर्ष दिनाला 'नवरोज' (Nowruz) असं म्हणतात. सायरस याने ज्या दिवशी त्याच्या साम्राज्याची स्थापना केली त्या दिवसापासून नवरोज सुरु झाला असं मानलं जातं. दर वर्षी २१ मार्च या दिवशी नवरोज साजरा केला जातो. या वर्षी म्हणजे २०२० साली २५७९ हे नवरोज वर्ष आहे. याचा अर्थ इसवी सनापूर्वी ५५९ व्या वर्षी सायरस याने स्वतःचा शक स्थापन केला असा होतो. (दोन वर्षांचा जो फरक पडला आहे त्याचं कारण म्हणजे या पर्शियन पंचांगाप्रमाणे ३६० दिवसांचं एक वर्ष धरलं जातं व ऋतूंप्रमाणे दिवस जुळवून घेण्यासाठी प्रत्येक सहा वर्षांनी तेरावा महिना घातला जातो.) आजही इराण, इराक, जॉर्जिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान, उझबेकस्तान, किर्गिझस्तान, पाकिस्तान, भारत वगैरे वीस एक देशांमध्ये हा नववर्ष दिन 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा होत असतो.  यावरून पूर्वापार सीरियन शकाचा प्रभाव किती विशाल भू भागावर पडला होता याची कल्पना येते.         

५. याच काळात इ. स. पूर्व ४४९ ते इ. स. पूर्व ३४३ या १०६ वर्षांच्या काळात मगध राज्य पर्शियन साम्राज्याचा भाग बनला होता. (पहा: विष्णुपुराण ४-३४.) पुराणांमध्ये या पर्शियन राजांना 'यवन राजे' म्हटलं आहे. पश्चिमेकडून येणारे ते सर्व यवन अशी समजूत त्या काळी प्रचलित झाली असावी. या १०६ वर्षांच्या राजवटीमुळे भारतातही सीरियन शक वापरला जाऊ लागला. ११ व्या शतकात भारतात आलेला अरबी विद्वान अलबेरुनी गुप्तांची कारकीर्द शके २४१ च्या सुमारास सुरु झाली असं म्हणतो तेव्हा त्याला सीरियन शकच अभिप्रेत असतो. कारण शालिवाहन शक वगैरे त्याला माहीत असण्याचा मुळीच संभव नव्हता. त्याचप्रमाणे कनिष्काचा काळ शके ७८ हा होता असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ सीरियन शकाच्या ७८ व्या वर्षाचा तो उल्लेख असतो. पण इंग्रज विद्वानांनी जाणूनबुजून हा उल्लेख शालिवाहन शकाचा किंवा इसवी सनाचा ठरवून भारतीय इतिहास शेकडो वर्षांनी पुढे ओढण्याचा नादानपणा केला.

६. भारताच्या प्राचीन इतिहासाचा काळ पुढे ओढण्याचा उपक्रम इंग्रजांनी एकाच कारणासाठी केला व ते कारण म्हणजे बायबलमध्ये जगाची उत्पत्ती ख्रिस्तापूर्वी केवळ ४००४ वर्षांपूर्वी झाली असा अडाणीपणाचा सिद्धांत मांडला होता. (पहा- जेनेसिस १) तो खोटा ठरू नये म्हणून ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजांनी राज्य केलं, त्या त्या देशांमध्ये त्यांनी ऐतिहासिक घटनांचे काळ पुढे तरी ओढले किंवा त्या घटनाच दाबून टाकल्या. यामुळेच महावीर, बुद्ध, मौर्य, कनिष्क, गुप्त, हर्षवर्धन इत्यादींचे काळ सातशे ते हजार-बाराशे वर्षांनी पुढे दाखवले गेले आहेत व पुराणांमधील काळांशी ते जुळत नाहीत.

७. 'सीरियन शक' असा शब्दप्रयोग अद्याप तरी भारतीय वाङ्मयामध्ये मिळालेला नाही. कदाचित त्याला नुसतंच 'शक' म्हणून संबोधलं जात असावं किंवा नुसतेच आकडे नमूद केले असावेत. मात्र 'सीरिया' या प्रदेशाला आणि 'सीरियन' या संबोधनाला प्राचीन काळी फार महत्व होतं. आजच्या सीरिया, इराक, इराण वगैरे मेसापोटेमियातील विस्तीर्ण प्रदेशांत सुमेरियन, खाल्डियन, असुरियन, बॅबिलोनियन, नव-असुरियन वगैरे राजवटी होऊन गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय आणि भौगोलिक संदर्भ कायम बदलत राहिले होते. सायरस याने मोडकळीला आलेलं नव-असुरियन साम्राज्य संपवून बॅबिलोन या ठिकाणी आपली राजधानी केली. हे ठिकाण सध्या प्राचीन सुमेर किंवा सीरिया व आधुनिक इराक यांच्या दरम्यान आहे. यामुळेच पर्शियन सम्राटांना सीरियन राजे म्हटलं जात असावं. त्याचप्रमाणे सायरस याने चालू केलेल्या वरील शकाला 'सीरियन शक' हे नांव पडलं असावं. कारण असिरियन शक नामक एक शक त्यापूर्वी अस्तित्वात होता. सीरियन शकाची पार्श्वभूमी ही अशी आहे.                            

दुर्दैवाची गोष्ट अशी, की तत्कालीन भारतीय इतिहासकारांचा इंग्रजांच्या बनावट कालगणनेवर एवढा अंधविश्वास बसला, की आजही तीच बनावट कालगणना समोर ठेवून इतिहासाची चर्चा केली जात असते. आज सीरियन शक फारसा कुणाला माहीत नसण्याचं हेच मुख्य कारण आहे. निदान यापुढे  तरी प्राचीन शिलालेखावरील वा नाण्यावरील शकाचा विचार करताना तो सीरियन शक तर नसेल ना हा विचार इतिहासाचे अभ्यासक करतील अशी आशा व्यक्त करतो. अन्यथा चुकीच्या कालगणनेवर आधारित निरर्थक ग्रंथ आणि पीएचड्या निर्माण होतच राहतील यात शंका नाही. 

Saturday, August 8, 2020

रामजन्मभूमी वादातील खरे खलनायक  

पुरातत्व खात्याचे भूतपूर्व संचालक डॉ. के. के. मुहंमद यांनी मल्याळम भाषेत आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याचा 'मै भारतीय हूं !' हा हिंदी अनुवाद प्रभात प्रकाशन नामक संस्थेने प्रकाशित केला आहे. या आत्मचरित्राचा इंग्रजी किंवा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे का याची मला माहिती नाही. पण महाजालावर वाचायला मिळतं त्याप्रमाणे डॉ. मुहंमद यांनी या आत्मचरित्रात स्पष्टपणे म्हटलं आहे, की हिंदू आणि मुसलमानांमध्ये रामजन्मभूमीचा प्रश्न परस्पर सौहार्दाने सुटण्याच्या बेतात असताना प्रत्येक वेळी मार्क्सवादी विचारसरणीच्या इतिहासकारांनी त्यात जाणून बुजून मोडता घातला आणि तो प्रश्न चिघळत राहील असं पाहिलं. याबाबतीत रोमिला थापर, बिपीनचंद्र आणि सर्वपल्ली गोपाल या इतिहासकारांनी १९ व्या शतकाच्या पूर्वी मंदिर असल्याचा व ते पाडून मशीद बांधल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा आधारहीन दावा केला होता आणि इरफान हबीब, राम शरण शर्मा, डी. एन. झा, सुरज भान व अथर अली या अन्य डाव्या इतिहासकारांनी त्यांचा हा दावा उचलून धरला होता. या इतिहासकारांनी मुस्लिम पक्षकारांचं एकप्रकारे 'ब्रेन वॉशिंग' च केलं. अनेक डावे राजकीय पक्ष आणि संस्था यांनीही याचा फायदा उठवून हा प्रश्न सुटू नयेत म्हणून सातत्याने प्रयत्न केले. 

  
डॉ. मुहंमद यांच्या म्हणण्यानुसार २०१० साली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू आणि मुसलमान वादी-प्रतिवादींमध्ये हिंदूंनी रामजन्मभूमीची २/३ व मुसलमानांनी १/३ जागा वाटून घेण्याचा तोडगा मान्य होत असताना या डाव्या इतिहासकारांनी पुन्हा एकदा त्यात खो घातला. त्यामुळे त्यावेळीही हा प्रश्न सुटू शकला नाही.    

रामजन्मभूमीवरील उत्खननात जेव्हा हिंदू चिन्हांकित असलेले अनेक खांब मिळू लागले तेव्हा याच इतिहासकारांनी ते बौद्ध- जैन प्रभावाखालील बांधकाम असावं व हिंदू मंदिराचा त्याच्याशी काही संबंध नसावा असा आणखी एक आधारहीन निष्कर्ष हवेत सोडून दिला. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच बिकट होऊन बसला. कारण त्या निमित्ताने काही बौद्ध व जैन दावेदारांनीही या वादात उडी घेतली.              

अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुन्नी वक्फ बोर्डातर्फे जे तथाकथित 'तज्ज्ञ' साक्षीदार सादर करण्यात आले, ते सर्व म्हणजे सुविरा जयस्वाल, सुप्रिया वर्मा, शिरीन रत्नागर आणि जया मेनन हे कुठल्या ना कुठल्या (डाव्या विचारसरणीच्या) संस्थांमार्फत परस्परांशी जोडलेले असून न्यायालयात त्यांनी अत्यंत 'बेजबाबदार' आणि 'आधारहीन' विधाने केल्याचं निरीक्षण न्यायमूर्तीनी निकालपत्रात नोंदवलं होतं.  (संदर्भ -  How Allahabad HC exposed Experts...', Times of India, 9-10-2010.)  

सामाजिक तेढ वाढवणाऱ्या या डाव्या इतिहासकारांनी भारतीय इतिहासाचं आणि समाजाचं अतोनात नुकसान केलं आहे.       

Friday, April 17, 2020

राखीगढीचा 'यू टर्न' 

डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. वसंत शिंदे यांनी करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने एक व्याख्यान युट्यूबवर प्रसारित केलं आहे. 'Application of DNA Science to reconstruct authentic early Indian History' हा विषय युट्यूबवर घातला की ते ऐकता-पाहता येतं. या व्याख्यानात राखीगढी येथे झालेल्या संशोधनावर अधिक प्रकाश टाकला आहे. 
१. डॉ. शिंदे यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सादर केलेल्या राखीगढी संशोधनावर ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांची दखल घेतल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. परिणामी त्यावेळी काढलेले काही निष्कर्ष त्यांनी बदलले असल्याचं दिसून येत आहे. ते आता त्यांना 'निष्कर्ष' न म्हणता 'अनुमान' वा 'गट फिलिंग' म्हणत आहेत. 
२. ऑगस्ट २०१८ च्या निष्कर्षांमधील अनेक बाबी त्यांनी या व्याख्यानात गाळल्या वा बदलल्या आहेत. उदा. राखीगढीमधील लोक वैदिक आर्य नव्हते, आर्यांपेक्षा दक्षिण भारतीयांशी वा द्रविडांशी त्यांचं साधर्म्य आहे, ते 'निलगिरी' मधील 'इरुला' जमातीचे असावेत, ते शेतीचं तंत्र पश्चिम आशियातून शिकले होते इत्यादी मुद्दे त्यांनी तेव्हा प्रामुख्याने मांडले होते. (पहा- Economic Times, 13-06-2018 व India Today, 31-08-2018.) पण या व्याख्यनात त्यांनी वेगळेच मुद्दे मांडले आहेत. 
३. या देशातील लोकांचे पूर्वज ११००० वर्षांपूर्वी भारतात आले असं एकीकडे म्हणत असताना डॉ. शिंदे Aryan Invasion Theory नाकारत आहेत हे विसंगत आहे. 
४. राखीगढीमधील सांगाड्यांचे डी. एन. ए., त्यांची भांडीकुंडी, घरे हे हल्लीच्या हरियाणातील लोकांच्या जीवनशैलीशी जुळत आहे असं आता डॉ. शिंदे म्हणत आहेत. मग 'इरुला' लोकांचं काय झालं ? आणि अन्य भारतीय वंशजांचं काय करायचं ? 
५. वैदिक संस्कृती राखीगढीवाल्या लोकांनीच निर्माण केली असं आता डॉ. शिंदे सांगत आहेत. पण ऑगस्ट २०१८ मध्ये या लोकांचा वैदिक संस्कृतीशी काहीही संबंध नसल्याचं ते सांगत होते. 
६. काश्मीर ते केरळ आणि अफगाणिस्तान ते बंगाल यांमधील लोकांचे (त्यांचे जाती-धर्म कोणतेही असोत) पूर्वज हडप्पीयन लोकच होते कारण ६०% हून अधिक लोकांचे डीएनए जुळत आहेत असं या व्याख्यानात डॉ. शिंदे म्हणत आहेत. म्हणजे आर्य आणि द्रविड असा काही प्रकार नव्हता हे ते एकप्रकारे मान्य करत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांनी आर्य आणि द्रविड अशी विभागणी सांगितली होती. 
७. शेती करायला सर्वप्रथम भारतातच (९००० वर्षांपूर्वी) सुरुवात झाली असं डॉ. शिंदे या व्याख्यानात म्हणत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये भारतीय इराण्यांकडून शेती करायला शिकले असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 


८. हे सर्व सांगून झाल्यावर 'हे फारच लहान नमुन्यावरील संशोधन आहे' हे मान्य करून डॉ. शिंदे यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. म्हणजे काही काळानंतर ही अनुमाने चुकीचीही निघू शकतील याचं सूतोवाच त्यांनी आताच करून ठेवलं आहे.