Sunday, December 5, 2021
आदी शंकराचार्यांचा काळ
देशभरातील बौद्ध धर्माचा प्रभाव हटवून आदी शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली असं सामान्यतः मानलं जातं. गोनंद (तिसरा) हा राजा काश्मीरच्या गादीवर येण्यापूर्वीच बौद्धांचा वैदिक हिंदू धर्मीयांना किती जाच सुरु झाला होता हे काश्मीरचा इतिहासकार कल्हण याने 'राजतरंगिणी' ग्रंथात नमूद केलं आहे. (तरंग १, श्लोक १७७ ते १८४). अशा परिस्थितीत केरळातील पेरियार अथवा पूर्णा नदीच्या काठी कालडी (किंवा कालटी) गावात जन्मलेल्या शंकराचार्यांनी वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी देशभर प्रवास केला, अनेक विद्वानांना वादांमध्ये पराभूत केलं आणि तत्कालीन राजेरजवाड्यांना परत एकदा हिंदू धर्माची दीक्षा दिली. त्याचबरोबर देशाच्या चार कोपऱ्यांमध्ये खालील चार पीठे स्थापन करून हिंदू धर्म शाश्वत जिवंत राहील याची काळजीही घेतली.
१. दक्षिणेला यजुर्वेद प्रधान शृंगेरी शारदा पीठम
२. उत्तरेला अथर्ववेद प्रधान बदरी ज्योतिर्मय पीठम
३. पूर्वेला ऋग्वेद प्रधान पुरी गोवर्धनमठ पीठम
४. पश्चिमेला सामवेद प्रधान द्वारका शारदा पीठम
भारताच्या व हिंदू धर्माच्या दृष्टीने इतकं महत्वाचं कार्य करणाऱ्या शंकराचार्यांचा नेमका काळ मात्र अजूनही ठरवता आलेला नाही. केवळ बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शंकराचार्यांचे वेगवेगळे काळ ठरवले गेले आहेत ते खालीलप्रमाणे;
१. द्वारका पीठ आणि गोवर्धन पीठ इथे असलेल्या पूर्वापार नोंदींप्रमाणे शंकराचार्यांचा काळ इ. स. पूर्व ५०९ ते इ. स. पूर्व ४७७ हा आहे. पण हा काळ चुकीचा आहे हे पुढील उहापोहावरून लक्षात येईल. काश्मीरमध्ये दाल लेकजवळ शंकराचार्यांच्या नांवाची एक टेकडी आहे. या टेकडीवरील मंदिरालाही शंकराचार्यांचं मंदिर असंच म्हटलं जातं. पण मुळात ते ज्येष्ठेश्वराचं (म्हणजे शिवशंकराचं) मंदिर असून आदी शंकराचार्यांनी त्याला भेट देऊन त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळेच त्याला 'शंकराचार्य मंदिर' असं संबोधलं जाऊ लागलं. हे ज्येष्ठेश्वर मंदिर काश्मीरचा राजा गोपादित्य याने बांधल्याचं कल्हण याने 'राजतरंगिणी' ग्रंथात निःसंदिग्धपणे म्हटलं आहे. (तरंग १, श्लोक ३४१) त्यानेच नमूद केल्याप्रमाणे गोपादित्याचा काळ इ. स. पूर्व ३६९ ते इ. स. पूर्व ३०९ हा येतो. याचा अर्थ शंकराचार्यांचा काळ त्यानंतरचा असणार हे उघड आहे. त्यामुळे इ. स. पूर्व ५०९ ते ४७७ हा काळ चुकीचा ठरतो.
२. १३ व्या शतकातील भाष्यकार आनंदगिरी यांनी शंकराचार्यांचा जन्म इ. स. पूर्व ४४ व मृत्यू इ. स. पूर्व १२ मध्ये झाल्याचं म्हटलं आहे. पण त्याचा कुठलाही आधार त्यांनी दिलेला नाही.
३. डॉ. रामकृष्ण भांडारकर यांनी शंकराचार्यांच्या जन्माचा काळ इ.स. ६८० असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. पण या अंदाजालाही भक्कम आधार नाही.
४. मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी इ. स. ७८८ ते ८२० हा काळ नक्की केला आहे.
वरीलपैकी कुठल्याही काळाला ठोस असा आधार नाही. त्यामुळे शंकराचार्यांचा नक्की काळ समजणं कठीण झालं आहे.
आदी शंकराचार्यांची मुख्यतः खालील चार प्राचीन चरित्रसाधने उपलब्ध आहेत.
अ) 'शंकर दिग्विजय'.
ब) व्यासावलकृत 'शंकर विजय'.
क) आनंदगुरु रचित 'शंकर विजय'.
ड) माधवाचार्य रचित 'शंकर विजय'.
ही सर्व चरित्रे संस्कृत भाषेत असून त्यापैकी कुठल्याही चरित्रात शंकराचार्यांचा काळ दिलेला नाही. मराठीत शंकराचार्यांची दोन जुनी चरित्रे उपलब्ध आहेत. एक, महादेव राजाराम बोडस यांचं 'श्री शंकराचार्य व त्यांचा संप्रदाय' (१९२३) आणि दुसरं, रामचंद्र गोविंद कोलंगडे लिखित 'श्री जगद्गुरू आद्य शंकराचार्य' (१९६६). या चरित्रांमध्ये काही तत्कालीन राजांची नांवे आली आहेत. हे राजे असे;
१. केरळ नरेश राजशेखर (पृ. २ व ५०, कोलंगडे.) :- याचा उल्लेख स्वतः शंकराचार्यांनी 'शिवानंदलहरी' तील ७० व्या श्लोकात 'अगणित फलदायकः प्रभुर्मे, जगदधिको हृदि राजशेखरोस्ति' असा केला आहे. या नांवाचे दोनतीन प्रसिद्ध राजे सापडतात पण त्यांचा काळ बराच नंतरचा- म्हणजे ९ व्या शतकापासून पुढचा आहे. उदाहरणार्थ, राम राजशेखर या मध्य केरळमधील कोडांगलूर येथील चेर राजाचा काळ इ. स. ८७० ते ८८३ हा आहे. पंडालम येथील दुसरा एक पांड्य राजा राजशेखर वर्मा याचा काळ इ. स. ९०३ पासून सुरु होतो. संशोधकांनी साधक बाधक विचार न करता शंकराचार्यांची सांगड यापैकी एका राजाशी घालायचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या मते शंकराचार्यांना भेटलेला राजशेखर हा एक लहानसा स्थानिक राजा असावा.
२. कर्नाटक प्रांतातील राजा व शंकराचार्यांचा शिष्य सुधन्वा (पृ. ११९ व २२६, कोलंगडे.) :- या राजाच्या ताम्रपटात युधिष्ठिर शक २६६३ चा (म्हणजे इ. स. पूर्व ४७६) उल्लेख आल्याचं राजराजेश्वर कृत 'विमर्श' मध्ये पृष्ठ ३२ नमूद केल्याचं बोडस यांनी म्हटलं आहे. हे राजराजेश्वर पुढे स्वतः द्वारकापीठाचे शंकराचार्य बनले. परंतु, ते म्हणतात तो ताम्रपट कुठेच उपलब्ध नसल्यामुळे या माहितीवर विश्वास ठेवता येत नाही.
३. कांची येथील राजा राजसेन (पृ. २२९, कोलंगडे.) :- अशा नांवाचा राजा मला तरी सापडला नाही. हाही कदाचित एखादा लहानसा तत्कालीन संस्थानिक असावा.
४. नेपाळ नरेश शिवदेव (पृ. २५६, कोलंगडे.) :- नेपाळच्या शिवदेव (पहिला) या लिच्छवी राजाचा काळ इ. स. ५९० ते ६०५ हा आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरीस शंकराचार्य नेपाळमध्ये गेले होते व या राजाशी त्यांची भेट झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. जर शिवदेव याचा काळ बरोबर असेल व हाच तो शिवदेव असेल, तर शंकराचार्यांचा काळही नक्की होतो असं म्हणावं लागेल.
५. महिष्मती जवळील प्रदेशाचा राजा अमरु किंवा अमरुका (पृ. १७४, कोलंगडे.) :- एका वादाच्या निमित्ताने मंडनमिश्र यांची पत्नी शारदा हिने शंकराचार्यांना कामजीवनाविषयी काही प्रश्न विचारले. तेव्हा बालब्रह्मचारी असलेल्या शंकराचार्यांना त्यावर काही बोलता आलं नाही. म्हणून त्यांनी मुदत मागून घेतली व राजा अमरु याच्या विलासमहालात राहून सहा महिने त्यांनी कामजीवनाचा अभ्यास केला. नंतर शारदा हिला भेटून त्यांनी तिला वादात पराभूत केलं अशी आख्यायिका आहे. (या विषयावर 'अमरु शतक' नामक शृंगारिक ग्रंथही शंकराचार्यांच्या नांवावर आहे.) पण अमरु नांवाचा राजा सापडत नाही. मात्र महिष्मतीवर इ. स. ५७५ ते ६०० या काळात राज्य करणारा एक कलचुरी राजा स्वतःला 'शंकरगण' म्हणजे 'शंकराचा शिष्य' असं म्हणवून घेतो. यातील 'शंकर' म्हणजे शंकराचार्य असण्याची शक्यता आहे व तसं असेल तर हा राजा अमरु असू शकेल. याचा काळही नेपाळ नरेश शिवदेव याच्या काळाशी जुळतो.
वरील निष्कर्षाला पाठबळ देणारा आणखी एक पुरावाही देता येईल. शृंगेरी पीठाचे सध्याचे शंकराचार्य श्री. भारती तीर्थ हे त्या पीठाच्या दाव्यानुसार त्यांचे सलग ३६ वे शंकराचार्य आहेत. २०२१ साली यांच्या कारकिर्दीला ३२ वर्षं पूर्ण झाली व ते अजूनही विद्यमान आहेत. त्यापूर्वीच्या तीन शंकराचार्यांचा काळ असा होता :
-३५ वे शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ (१९५४-१९८९) = ३५ वर्षं
-३४ वे शंकराचार्य चंद्रशेखर भारती तिसरे (१९१२-१९५४) = ४२ वर्षं
-३३ वे शंकराचार्य नृसिंह भारती (१८७२-१९१२) = ४० वर्षं
यावरून एका शंकराचार्यांची कारकीर्द सरासरी ४० वर्षं धरायला हरकत नसावी. त्याप्रमाणे गणित केल्यास ३५ शंकराचार्यांची कारकीर्द १४०० वर्षांची येते. (३५ x ४०). १९८९ पासून १४०० वर्षं मागे गेल्यास इ. स. ५८९ हे वर्ष मिळतं. हा काळ शंकरगण आणि शिवदेव या राजांच्या काळाशी जुळतो. त्यामुळे इ. स. च्या ६ व्या शतकाचा उत्तरार्ध हाच आदी शंकराचार्यांचा काळ असावा असा निष्कर्ष काढता येतो.
- हर्षद सरपोतदार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment