Sunday, December 5, 2021

आदी शंकराचार्यांचा काळ 

देशभरातील बौद्ध धर्माचा प्रभाव हटवून आदी शंकराचार्यांनी वैदिक हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली असं सामान्यतः मानलं जातं. गोनंद (तिसरा) हा राजा काश्मीरच्या गादीवर येण्यापूर्वीच बौद्धांचा वैदिक हिंदू धर्मीयांना किती जाच सुरु झाला होता हे काश्मीरचा इतिहासकार कल्हण याने  'राजतरंगिणी' ग्रंथात नमूद केलं आहे. (तरंग १, श्लोक १७७ ते १८४). अशा परिस्थितीत केरळातील पेरियार अथवा पूर्णा नदीच्या काठी कालडी (किंवा कालटी) गावात जन्मलेल्या शंकराचार्यांनी वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी देशभर प्रवास केला, अनेक विद्वानांना वादांमध्ये पराभूत केलं आणि तत्कालीन राजेरजवाड्यांना परत एकदा हिंदू धर्माची दीक्षा दिली. त्याचबरोबर देशाच्या चार कोपऱ्यांमध्ये खालील चार पीठे स्थापन करून हिंदू धर्म शाश्वत जिवंत राहील याची काळजीही घेतली.   १. दक्षिणेला यजुर्वेद प्रधान शृंगेरी शारदा पीठम  २. उत्तरेला अथर्ववेद प्रधान बदरी ज्योतिर्मय पीठम  ३. पूर्वेला ऋग्वेद प्रधान पुरी गोवर्धनमठ पीठम  ४. पश्चिमेला सामवेद प्रधान द्वारका शारदा पीठम             भारताच्या व हिंदू धर्माच्या दृष्टीने इतकं महत्वाचं कार्य करणाऱ्या शंकराचार्यांचा नेमका काळ मात्र अजूनही ठरवता आलेला नाही. केवळ बत्तीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शंकराचार्यांचे वेगवेगळे काळ ठरवले गेले आहेत ते खालीलप्रमाणे; १. द्वारका पीठ आणि गोवर्धन पीठ इथे असलेल्या पूर्वापार नोंदींप्रमाणे शंकराचार्यांचा काळ इ. स. पूर्व ५०९ ते इ. स. पूर्व ४७७ हा आहे. पण हा काळ चुकीचा आहे हे पुढील उहापोहावरून लक्षात येईल. काश्मीरमध्ये दाल लेकजवळ शंकराचार्यांच्या नांवाची एक टेकडी आहे. या टेकडीवरील मंदिरालाही शंकराचार्यांचं मंदिर असंच म्हटलं जातं. पण मुळात ते ज्येष्ठेश्वराचं (म्हणजे शिवशंकराचं) मंदिर असून आदी शंकराचार्यांनी त्याला भेट देऊन त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळेच  त्याला 'शंकराचार्य मंदिर' असं संबोधलं जाऊ लागलं. हे ज्येष्ठेश्वर मंदिर काश्मीरचा राजा गोपादित्य याने बांधल्याचं कल्हण याने 'राजतरंगिणी' ग्रंथात निःसंदिग्धपणे म्हटलं आहे. (तरंग १, श्लोक ३४१) त्यानेच नमूद केल्याप्रमाणे गोपादित्याचा काळ इ. स. पूर्व ३६९ ते इ. स. पूर्व ३०९ हा येतो. याचा अर्थ शंकराचार्यांचा काळ त्यानंतरचा असणार हे उघड आहे. त्यामुळे इ. स. पूर्व ५०९ ते ४७७ हा काळ चुकीचा ठरतो.  २. १३ व्या शतकातील भाष्यकार आनंदगिरी यांनी शंकराचार्यांचा जन्म इ. स. पूर्व ४४ व मृत्यू इ. स. पूर्व १२ मध्ये झाल्याचं म्हटलं आहे. पण त्याचा कुठलाही आधार त्यांनी दिलेला नाही.          ३. डॉ. रामकृष्ण भांडारकर यांनी शंकराचार्यांच्या जन्माचा काळ इ.स. ६८० असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. पण या अंदाजालाही भक्कम आधार नाही.     ४. मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी इ. स. ७८८ ते ८२० हा काळ नक्की केला आहे.   वरीलपैकी कुठल्याही काळाला ठोस असा आधार नाही. त्यामुळे शंकराचार्यांचा नक्की काळ समजणं कठीण झालं आहे.               आदी शंकराचार्यांची मुख्यतः खालील चार प्राचीन चरित्रसाधने उपलब्ध आहेत.       अ) 'शंकर दिग्विजय'.       ब) व्यासावलकृत 'शंकर विजय'.       क) आनंदगुरु रचित 'शंकर विजय'.       ड) माधवाचार्य रचित 'शंकर विजय'.  ही सर्व चरित्रे संस्कृत भाषेत असून त्यापैकी कुठल्याही चरित्रात शंकराचार्यांचा काळ दिलेला नाही. मराठीत शंकराचार्यांची दोन जुनी चरित्रे उपलब्ध आहेत. एक, महादेव राजाराम बोडस यांचं 'श्री शंकराचार्य व त्यांचा संप्रदाय' (१९२३) आणि दुसरं, रामचंद्र गोविंद कोलंगडे लिखित 'श्री जगद्गुरू आद्य शंकराचार्य' (१९६६). या चरित्रांमध्ये काही तत्कालीन राजांची नांवे आली आहेत. हे राजे असे; १. केरळ नरेश राजशेखर (पृ. २ व ५०, कोलंगडे.) :- याचा उल्लेख स्वतः शंकराचार्यांनी 'शिवानंदलहरी' तील ७० व्या श्लोकात 'अगणित फलदायकः प्रभुर्मे, जगदधिको हृदि राजशेखरोस्ति' असा केला आहे. या नांवाचे दोनतीन प्रसिद्ध राजे सापडतात पण त्यांचा काळ बराच नंतरचा- म्हणजे ९ व्या शतकापासून पुढचा आहे. उदाहरणार्थ, राम राजशेखर या मध्य केरळमधील कोडांगलूर येथील चेर राजाचा काळ इ. स. ८७० ते ८८३ हा आहे. पंडालम येथील दुसरा एक पांड्य राजा राजशेखर वर्मा याचा काळ इ. स. ९०३ पासून सुरु होतो. संशोधकांनी साधक बाधक विचार न करता शंकराचार्यांची सांगड यापैकी एका राजाशी घालायचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या मते शंकराचार्यांना भेटलेला राजशेखर हा एक लहानसा स्थानिक राजा असावा.  २. कर्नाटक प्रांतातील राजा व शंकराचार्यांचा शिष्य सुधन्वा (पृ. ११९ व २२६, कोलंगडे.) :- या राजाच्या ताम्रपटात युधिष्ठिर शक २६६३ चा (म्हणजे इ. स. पूर्व ४७६) उल्लेख आल्याचं राजराजेश्वर कृत 'विमर्श' मध्ये पृष्ठ ३२ नमूद केल्याचं बोडस यांनी म्हटलं आहे. हे राजराजेश्वर पुढे स्वतः द्वारकापीठाचे शंकराचार्य बनले. परंतु, ते म्हणतात तो ताम्रपट कुठेच उपलब्ध नसल्यामुळे या माहितीवर विश्वास ठेवता येत नाही.          ३. कांची येथील राजा राजसेन (पृ. २२९, कोलंगडे.) :- अशा नांवाचा राजा मला तरी सापडला नाही. हाही कदाचित एखादा लहानसा तत्कालीन संस्थानिक असावा.     ४. नेपाळ नरेश शिवदेव (पृ. २५६, कोलंगडे.) :- नेपाळच्या शिवदेव (पहिला) या लिच्छवी राजाचा काळ इ. स. ५९० ते ६०५ हा आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरीस शंकराचार्य नेपाळमध्ये गेले होते व या राजाशी त्यांची भेट झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. जर शिवदेव याचा काळ बरोबर असेल व हाच तो शिवदेव असेल, तर शंकराचार्यांचा काळही नक्की होतो असं म्हणावं लागेल.  ५. महिष्मती जवळील प्रदेशाचा राजा अमरु किंवा  अमरुका (पृ. १७४, कोलंगडे.) :- एका वादाच्या निमित्ताने मंडनमिश्र यांची पत्नी शारदा हिने शंकराचार्यांना कामजीवनाविषयी काही प्रश्न विचारले.  तेव्हा बालब्रह्मचारी असलेल्या शंकराचार्यांना त्यावर काही बोलता आलं नाही. म्हणून त्यांनी मुदत मागून घेतली व राजा अमरु याच्या विलासमहालात राहून सहा महिने त्यांनी कामजीवनाचा अभ्यास केला. नंतर शारदा हिला भेटून त्यांनी तिला वादात पराभूत केलं अशी आख्यायिका आहे. (या विषयावर 'अमरु शतक' नामक शृंगारिक ग्रंथही शंकराचार्यांच्या नांवावर आहे.) पण अमरु नांवाचा राजा सापडत नाही. मात्र महिष्मतीवर इ. स. ५७५ ते ६०० या काळात राज्य करणारा एक कलचुरी राजा स्वतःला 'शंकरगण' म्हणजे 'शंकराचा शिष्य' असं म्हणवून घेतो. यातील 'शंकर' म्हणजे शंकराचार्य असण्याची शक्यता आहे व तसं असेल तर हा राजा अमरु असू शकेल. याचा काळही नेपाळ नरेश शिवदेव याच्या काळाशी जुळतो.             वरील निष्कर्षाला पाठबळ देणारा आणखी एक पुरावाही देता येईल. शृंगेरी पीठाचे सध्याचे शंकराचार्य श्री. भारती तीर्थ हे त्या पीठाच्या दाव्यानुसार त्यांचे सलग ३६ वे शंकराचार्य आहेत. २०२१ साली यांच्या कारकिर्दीला ३२ वर्षं पूर्ण झाली व ते अजूनही विद्यमान आहेत. त्यापूर्वीच्या तीन शंकराचार्यांचा काळ असा होता :  -३५ वे शंकराचार्य अभिनव विद्यातीर्थ (१९५४-१९८९) = ३५ वर्षं  -३४ वे शंकराचार्य चंद्रशेखर भारती तिसरे (१९१२-१९५४) = ४२ वर्षं  -३३ वे शंकराचार्य नृसिंह भारती (१८७२-१९१२) = ४० वर्षं   यावरून एका शंकराचार्यांची कारकीर्द सरासरी ४० वर्षं धरायला हरकत नसावी. त्याप्रमाणे गणित केल्यास ३५ शंकराचार्यांची कारकीर्द १४०० वर्षांची येते. (३५ x ४०). १९८९ पासून १४०० वर्षं मागे गेल्यास इ. स. ५८९ हे वर्ष मिळतं. हा काळ शंकरगण आणि शिवदेव या राजांच्या काळाशी जुळतो. त्यामुळे इ. स. च्या ६ व्या शतकाचा उत्तरार्ध हाच आदी शंकराचार्यांचा काळ असावा असा निष्कर्ष काढता येतो. - हर्षद सरपोतदार   

Thursday, March 4, 2021

इथे मूलनिवासी कुणीही नाही !   

वैदिक आर्य बाहेरून भारतात आले की मूळचे भारतातीलच होते हा एक कायमचा वादाचा विषय बनला आहे. याचा गैरफायदा उठवून काही लोक विशिष्ट जातिसमूहाला 'तुम्ही मूलनिवासी नाही, तुम्ही बाहेरून आलात' असं हिणवून समाजात दुफळी माजवायचा प्रयत्न करत असतात. याउलट हिंदुत्ववादी लोक सर्वशक्तीनिशी आपण भारतातील मूलनिवासी असल्याचा दावा करत असतात. हे असले वाद म्हणजे या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या अडाणीपणाचे द्योतक आहेत. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या 'फोडा आणि झोडा' धोरणाचाच हा परिणाम आहे. मध्यंतरी माझ्याकडे 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' या शीर्षकाचं एक लहानसं चोपडं 'भारतीय विचार साधना' या संस्थेकडून कुणीतरी आणून दिलं; त्यातही डॉ. आंबेडकरांचा दाखला देऊन आर्य हे मुळात इथलेच कसे आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आढळला. (पृ. २५) माझ्या मते मूलनिवासी असल्याचा किंवा नसल्याचा हा भयगंड अकारण बाळगला जात आहे. याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे,   १. आधुनिक विज्ञानातील सिद्धांताप्रमाणे सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज जो Homo Erectus या नांवाने ओळखला जातो, तो आफ्रिकेतून भारतीय उपखंडात आला. त्यानंतर अंदाजे ५५,००० वर्षांपूर्वी पहिला आदिमानव (Homo Sapiens) याचं आफ्रिकेतूनच भारतात आगमन झालं. दरम्यान कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे किंवा आदिमानवासह झालेल्या संघर्षांमुळे Homo Erectus नामशेष झाला. असं असलं तरी आदिमानवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचे पुरावे मात्र ३०,००० वर्षांपलीकडे सापडत नाहीत. त्यापूर्वी भारतात मानवप्राणी नव्हता. (Page 1, 'A Population History of India') याचा अर्थ उघड आहे; की आर्य असोत, अनार्य असोत वा तथाकथित आदिवासी असोत, भारतात सर्वच उपरे आहेत.       २. डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्या प्रतिपादनानुसार आर्य हे बाहेरूनच आले. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. (Page 49-50, 'The Aryan Problem') मात्र त्यांनी कालनिश्चिती केलेली नाही. मी स्वतः ती केली असून आर्य इ. स. पूर्व ७८०० च्या सुमारास कश्यप समुद्राकडून (Caspian Sea) भारतात आले असा सिद्धांत मांडला आहे आणि तेव्हापासून यादवकाळापर्यंतचा राजकीय आणि सांस्कृतिक हिशेब नांवानिशीवार लावून दाखवला आहे. ('आर्यभारत खंड १ व २')  ३. आर्य भारतात आले तेव्हा इथे पणि, दास, यक्ष, नाग, याक, अज, शीघ्र, मुंड, भिल्ल, गोंड, व्रात्य वगैरे अनार्य जमाती आधीच स्थायिक झाल्या होत्या. आर्यांच्या आगेमागे असुर, गंधर्व, किन्नर, हस्ती, गो, कुकुर, काक इत्यादी लोक आले. (Page 83-84, 'Riddle' -11 by Dr. Ambedkar)  या सर्व जमाती कालांतराने आर्यांच्या वैदिक हिंदू धर्मात आपापल्या संस्कृतीसह विलीन होत गेल्या. ४. पुढल्या काळात शक, हूण, कुशाण, ग्रीक, पर्शियन आदी लोक भारतात आले आणि कालांतराने इथला धर्म स्वीकारून इथल्या संस्कृतीत विरघळून गेले. ही प्रक्रिया इतक्या बेमालूमपणे पार पडली की आज आपल्या धमनीत वाहणारं रक्त कुणाचं आहे, आपण नेमकी कुठली संस्कृती आचरत आहोत आणि कुणाच्या देवता पूजत आहोत हे सांगणं अशक्यप्राय आहे. एकप्रकारे हे समरस्य आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.    ५. निव्वळ महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तरी असंच आढळतं, की महाराष्ट्रातही मूलनिवासी कुणीही नव्हता आणि नाही. वि. का. राजवाडे यांच्या 'महाराष्ट्राची वसाहत' आणि 'महाराष्ट्र व उत्तर कोकणची वसाहत' या दोन लेखांत नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वप्रथम गुहेमध्ये राहणारे 'कातवडी' लोक अंदाजे चार हजार वर्षांपूर्वी आले. त्यानंतर नाग, वारली, कोळी आणि ठाकर हे आले. (पृ. १५२, 'राजवाडे लेखसंग्रह') पुढे मगधातील बौद्ध क्रांतीला कंटाळून तेथील चातुर्वर्ण्ययुक्त 'महाराष्ट्रिक' लोक दक्षिण अरण्यात शिरले. मागोमाग कुरुपांचाल प्रदेशातील 'राष्ट्रिक' हेही येते झाले. काही काळाने उत्तरकुरु आणि उत्तरमद्र येथील विराटाच्या राज्यातले 'वैराष्ट्रीक' जानपद सुद्धा महाराष्ट्रात आले. (पृ. ११८-११९, 'राजवाडे लेखसंग्रह') या सर्व लोकांचं एकत्रीकरण होऊन सध्याचे मराठी लोक कसे बनले याचं सविस्तर विवेचन राजवाडे यांनी अनेक संदर्भ देऊन या दोन लेखांमध्ये केलं आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही कुणाला 'मूलनिवासी' म्हणता येणार नाही. आपण सगळे इथेही उपरेच आहोत. तेव्हा यापुढे असले वाद घालणं संबंधितांनी बंद करावं हे बरं.                                                               संदर्भ :- १. 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' - रवींद्र साठे - भारतीय विचार साधना, पुणे, २००५.  २. 'A Population History of India' - Tim Dyson - Oxford University Press, UK, 2018.  ३. 'The Aryan Problem' - Editors Deo & Kamath - Bharatiy Itihas Sankalan Samiti, Pune, 1993. ४. 'आर्यभारत खंड १ व २' - हर्षद सरपोतदार - विहंग प्रकाशन, पुणे, २०१६ व २०१८.      ५. Volume IV, Dr. Ambedkar, Writings & Speeches, Govt. of Maharashtra, 1987.  ६. 'राजवाडे लेखसंग्रह' - सं. लक्ष्मणशास्त्री जोशी - साहित्य अकादमी, नवी दिल्ली, २००७.