Sunday, December 21, 2014


आर्य- एक संस्कृती !
(Aryan Culture : Article published in Maharashtra Times on Sunday, 21-12-2014) 


१९ व्या शतकाच्या सुरुवातीला ‘आर्यवंश’ नामक एक प्राचीन वंश अस्तित्वात असून त्याच वाडमय आणि संस्कृती अत्यंत संपन्न होती असा समज पसृत झाल्यावर आपण (सुद्धा !) आर्य असल्याची घोषणा अनेक देशांनी करून टाकली. ग्रीक लोकांचंच उदाहरण घेऊ. पूर्वी ते स्वतःला ‘हेलनिक’ म्हणजे ट्रोजन युद्धातल्या हेलनचे वंशज म्हणवत असत. पण पुढे ऑटोमन साम्राज्याविरुद्ध उभारलेल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दरम्यान (१८२१ ते १८३२) स्वतःच्या आर्यत्वाची संकल्पना त्यांनी प्रथम मांडली. आपल्या आर्यत्वाच्या आधारावर युरोपातील अन्य देशांची मदत घेण हा त्यामागचा उद्देश होता. कारण आर्यवंशाच्या श्रेष्ठत्वाचं मिथक नुकतंच निर्माण झालं होतं आणि आपण त्याच वंशातले आहोत असा दावा युरोपातल्या अनेक देशांनी केला होता. ग्रीकांची ही युक्ती यशस्वी झाली आणि युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया वगैरे देशांची मदत मिळवून ते स्वतंत्र झाले.

पुढे जर्मनांनी तर मोठ्या अभिनिवेशाने आपण आर्यवंशीय असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्याच देशातले
विर्को सारखे संशोधक; टोल्किन, मान यांच्यासारखे साहित्यिक किंवा विल्यम फोदोर सारखे पत्रकार यांनी हा दावा हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. आणि ते खरंही होतं. कारण या लोकांच्या इतिहासात ‘आर्य’ हा शब्द तोवर कधी आलेला नव्हता, आर्यांची संस्कृती यांच्या संस्कृतीहून भिन्न होती आणि इतिहासही वेगळा होता.

जर्मनांप्रमाणेच रोमन लोकांच्या इतिहासातही ‘आर्य’ हा शब्द आढळत नाही किंवा आर्य संस्कृतीच्या खुणा सापडत नाहीत. इसवी सनापूर्वी सातव्या शतकात ग्रीक लोक इटलीच्या सिसिली वगैरे भागात जाऊन स्थायिक झाले म्हणून काही देवघेव झाली एवढंच. तरीही रोमन लोक आर्य असल्याचा दावा करण्यात येतो. रोमन भाषा ‘इंडो-युरोपियन’ भाषा समूहातली एक भाषा आहे एवढाच या दाव्याला आधार. मुळात ‘इंडो-युरोपियन भाषा समूह’ ही संकल्पना सुद्धा तशी फसवी आहे. थोमस यंग या १९ व्या शतकातील इंग्रज शास्त्रज्ञाने ही संकल्पना प्रथम मांडली. युरोपातील ४०० भाषांपैकी कमीतकमी निम्म्या भाषांचं संस्कृतशी साधर्म्य आढळ्त असं त्याचं म्हणणं होतं. अर्थात तसं म्हणणारा तो पहिलाच नव्हता. १६ व्या शतकात जेव्हा युरोपियन प्रवासी आणि अभ्यासक भारतभेटीसाठी येऊ लागले तेव्हा संस्कृत आणि युरोपियन भाषा यांच्यात काही शब्द सारखे असल्याचं त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं. संस्कृत मधील देव, सर्प, सप्त, अष्ट, नव वगैरे शब्द आणि रोमन भाषेतील दिओ (Dio), सेर्पे (Serpe), सेत्ते (Sette),  ओट्टो (Otto),  नोवे (Nove) अशासारखे शब्द यांच्यात साम्य आढळल्यामुळे भाषिक अभ्यासाला सुरुवात झाली. याच दरम्यान संस्कृत वाडमय समृद्ध असल्याचे आणि आर्य संस्कृती पुरातन असल्याचे पुरावे बाहेर पडत होते. या सगळ्याचा परिपाक म्हणून ‘इंडो-युरोपियन भाषा समूहातल्या भाषा बोलणारे ते आर्य’ असा एक निष्कर्ष काढला गेला. पण हा निष्कर्ष सपशेल चूक होता.

आपण आर्य असल्याचा दावा युरोपियन देशांनी केवळ भाषेच्या आधारावर केला होता. पण नुसत्या भाषेच्या आधारावर असले निष्कर्ष काढणं पुरेसं नसतं. याबाबतीत एक उदाहरण द्यायला हरकत नाही. ‘लिथुआनिया’ हा बाल्टिक देश उत्तर युरोपात वसला असून त्याच्या सीमा पोलंड, रशिया, बेलारूस वगैरे देशांच्या सीमांना भिडलेल्या

आहेत. लिथुआनियन भाषेचं संस्कृत भाषेशी विलक्षण साम्य असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. पण हे साम्य सोडलं तर त्यांच्या आणि आर्यांच्या इतिहासात किंवा संस्कृतीत काहीच सारखेपणा आढळत नाही. त्यांच्या इतिहासात एवढाच उल्लेख आहे की इ.स.पूर्व १० व्या सहस्रकाच्या सुमारास एक मोठा प्रलय झाला, तेव्हा स्थलांतर करून हे लोक सध्याच्या जागी आले. यानंतर मधल्या काळातला इतिहास त्यांच्याकडे उपलब्ध नाही. जे वाडमय उपलब्ध आहे ते इ.स. १००९ च्या नंतर निर्माण झालेलं आहे. त्यातही आर्य संस्कृतीचं दर्शन घडवणारं काहीच नाही. त्यामुळे भाषा सारखी असूनही त्यांना आर्य म्हणून संबोधता येत नाही.   

अलिकडेच झालेल्या संशोधनावरून ग्रीक हे ‘अर्धवट आर्य आणि अर्धवट नॉर्डीक’ होते ही बाब स्पष्ट होत आहे.
ग्रीकच नव्हे; तर फ्रेन्च, रोमन, इंग्रज आदी बहुतेक युरोपियन हे ‘नॉर्डीक वंशीय’ असून घरे किंवा निळे डोळे, पांढरा वर्ण, सोनेरी केस, उंच बांधा ही त्यांची शारीरिक वैशिष्ठ्ये मानली जातात. हे लोक अर्यांपासून निराळे व कॉकेशीयन वंशाला जवळचे आहेत. जनुक संशोधनाने ही गोष्ट सिद्ध झाली असून केवळ फिनलंड मधील लोक युरोपियन लोकांपेक्षा वेगळे असल्याचं निष्पन्न झालं आहे. (इथे हेही सांगायला हरकत नाही, की नेशनल जीआग्रफिक सोसायटी, आय.बी.एम आणि बेल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जनुकीय प्रयोगांमधून ‘आर्य आणि द्रविड वेगळे नव्हते’ असा निष्कर्ष बाहेर पडला आहे.)

आर्य संस्कृती
आर्य हा ‘वंश’ किंवा ‘भाषासमूह’ असण्यापेक्षाही ती एक ‘संस्कृती’ (Civilization) होती.  ही संस्कृती अतिशय प्राचीन होती आणि या लोकांचं वाडमय फार समृद्ध होतं. आर्यांचं वाडमय म्हणजे संस्कृतमध्ये मौखिक पद्धतीने टिकवून ठेवलेले वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, अरण्यके, सूत्रे, पुराणे इत्यादी साहित्य आणि रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये.
या वाडमयातून आर्यांच्या संस्कृतीचंही दर्शन घडतं. त्याशिवाय इतिहास, अध्यात्म आणि निरनिराळ्या शास्त्रांच्या प्रगल्भ चर्चेमुळे हे वाडमय संपन्न मानलं गेलं. 
आर्यांची संस्कृती म्हणजे काय हे दयानंद सरस्वती यांचा दाखला देऊन थोडक्यात खालील प्रमाणे सांगता येईल,
-ओंकारस्वरूपी निराकार परमेश्वराची निर्गुण उपासना.
-वेदांवर श्रद्धा. 
-चतुर्वर्ण्य व जातिव्यवस्थेवर विश्वास.
-आत्म्याचे अमरत्व आणि पुनर्जन्म यावर विश्वास.
-यज्ञसंस्था व कुटुंबसंस्था यांना महत्व.
-गो पूजन, गुरु पूजन, अतिथी पूजन यांना महत्व.
एखाद्या मानवसमूहाने आपण आर्य असल्याचा दावा केला तर त्यांच्या संस्कृतीत वरील गोष्टी बसत होत्या का हे पाहण गरजेचं आहे. बसत असतील तर ते आर्य होते, नसतील तर नव्हते असं मानण भाग आहे. भारतात आज मूर्तीपूजा बोकाळलीय आणि निर्गुण उपासना अपवादानेच केली जाते, चतुर्वर्ण्य व्यवस्था अवलंबिली जात नाही; असं असलं तरी पूर्वी या गोष्टी आचारल्या जात होत्या याचे दाखले मिळतात. शिवाय जातिव्यवस्था, कुटुंबाला प्राधान्य, गुरुशिष्य परंपरा, अतिथीचं आदरातिथ्य हे सर्व आजही पाहायला मिळत. त्यामुळे भारतीयांच्या आर्यत्वाबद्दल शंका घेतली जाऊ शकत नाही. युरोपियन देशांच्या बाबतीत मात्र अशी शंका घेतली जाऊ शकते.                

 आर्नोल्ड टोइनबी यांचा १२ खंडात उपलब्ध असलेला ‘ए स्टडी ऑफ हिस्टरी’ हा गाजलेला ग्रंथ. या ग्रंथात जगातल्या २६ संस्कृतींचा (Civilizations) उदय आणि अस्त यांचा आढावा घेतला आहे. त्यात बेबिलोनियन, इजिप्शियन, अरेबियन, सिनिक, मेक्सिकन, मायन अशा निरनिराळ्या संस्कृतींचा समावेश आहे; मात्र आर्य संस्कृतीचा नाही.
त्या ऐवजी ‘इंडिक’ (म्हणजे सिंधू) आणि ‘हिंदू’ अशा दोन वेगवेगळ्या संस्कृती दाखवल्या आहेत. टोइनबी हे अन्य युरोपियन इतिहासकारान्प्रमाणेच ‘बायबलग्रस्त’ असल्यामुळे त्यांना कुठल्याही संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ४ थ्या सहस्रकाच्या पलीकडे न्यायची इच्छा नव्हती. (कारण त्यामुळे ‘जगाची उत्पत्ती केवळ चार हजार वर्षांपूर्वी झाली’ असं म्हणणारं बायबल खोटं ठरणार होतं !) हिंदू किंवा सिंधू संस्कृती ऐवजी ‘आर्य संस्कृती’ म्हटलं असत तर त्या संस्कृतीचा कालावधी सिंधू संस्कृतीच्याही मागे जाण्याचा धोका होता. त्यामुळे ‘वेदांचा काळ’ वगैरे चर्चेत ते पडलेच नाहीत. आर्यांच्या संस्कृतीचा धसका घेणारे असे बरेच इतिहासकार त्या काळात युरोपात होऊन गेले. 

मूळ स्थान व स्थलांतर
आर्यांच्या संस्कृतीचं दर्शन आज केवळ भारतातच घडत असल्यामुळे भारत हेच आर्यांचं मूळस्थान असल्याची भूमिका हिंदुत्ववादी संशोधक घेत असतात. इंग्रजांनी भारतीय इतिहासचं विकृतीकरण केलं असलं तरी ‘आर्य बाहेरून आले’ हे त्यांचं म्हणण चूक वाटत नाही. आर्यांचं मूळस्थान उत्तरध्रुव असल्याचा सिद्धांत लोकमान्य टिळक यांनी प्रथम मांडला.
या सिद्धांताला अन्य पुराव्यांचीही जोड मिळते. वराह मिहीर याने ‘पंचसिद्धान्तिका’ मध्ये मेरू पर्वत उत्तर ध्रुवावर असल्याचा निर्देश केला आहे. उत्तरायणात मृत्यू येणं हे पुण्यकारक मानण्याची परंपराही आपले पूर्वज उत्तर ध्रुवावरून आले हेच दाखवते. (कारण दक्षिणायनात तिथे पूर्ण अंधार असायचा व अग्नीचा शोधही तेव्हा लागलेला नव्हता त्यामुळे कमालीची गैरसोय होत असे.) पारशी हे मुळात आर्य. पारशांचा देव ‘अहुर माझदा’ याने त्यांच्यासाठी जे सोळा सुंदर प्रदेश निर्माण केल्याचं ‘अवेस्ता’ मध्ये म्ह्टलं आहे; त्या यादीत उत्तर ध्रुवाचा क्रम पहिला, बाल्हिकचा चौथा, जुन्या शरयू नदीचा सहावा, सरस्वती नदीचा दहावा तर सप्तसिंधूचा पंधरावा दिलेला आहे. (वेन्दिदाद :फर्गर्द १) यावरून आर्यांचा उत्तर धृवाकडून दक्षिणेकडे कसकसा प्रवास होत गेला याची कल्पना येते आणि सप्तसिंधू हे आर्यांचं पाहिलं नव्हे, तर बरच नंतरचं वसतीस्थान असल्याचं दिसून येतं. (या निमित्ताने पारशी लोक सरस्वती नदीपर्यंत येऊन परत इराणकडे गेले हेही समजतं. कारण अवेस्तात गंगा-यमुना नद्यांचा अजिबात उल्लेख नाही.) 

मनुची नौका आणि प्रलय यांची कथा बहुतेक सर्व धर्मग्रंथांत सांगितली आहे. प्रलयानंतर ही नौका ‘अरारत’ (Ararat) पर्वताच्या उतारावर पोहोचली असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतो. हा पर्वत तुर्कस्थानात असून त्यांच्या पूर्वेकडे १६ कि.मी. अंतरावर इराणची हद्द, तर उत्तरेकडे ३२ कि.मी. अंतरावर आर्मेनियाची हद्द येते. या पर्वताला पूर्वी ‘उरर्तु’ (Urartu) म्हणत. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मते हा ‘वृत्र’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होय.

इंद्र आणि वृत्र यांच्या पाण्याच्या प्रश्नावरून झालेल्या लढायांची वर्णने वैदिक वाडमयात सुप्रसिद्धच आहेत. यातील इंद्र म्हणजे ज्यांना आपण देव मानतो त्या ‘सुर’ नामक प्रगत लोकांचा पदसिद्ध राजा. अर्यानप्रमाणेच हे सुर लोकही प्रलयातून बचावून वृत्र पर्वताला लागून असलेल्या प्रदेशात स्थायिक झाले असावेत. सुरांचा प्रदेश म्हणून त्याला ‘सुर्य’ म्हणत. शेजारी लागून असलेल्या प्रदेशात असुरांची वसती झाली होती त्याला ‘असुर्य’ म्हटलं जाई. सुर्य म्हणजे आजचा ‘सिरीया’ व असुर्य म्हणजे आजचा ‘इराक’ होय. वेदांतल्या उल्लेखाप्रमाणे देवांच्या राज्याला पाणी पुरवणाऱ्या नद्या वृत्राच्या उंचावर असलेल्या प्रदेशातून खाली वाहत असत. पण वृत्र देवांचं पाणी बंद करत असे. म्हणून देवांचा राजा इंद्र हा वृत्रांचे किल्ले किंवा गड फोडी आणि पाणी मोकळं करी. या पाण्याचे लोंढे देवांच्या नि आर्यांच्या प्रदेशात तर वाहत असतच, पण समुद्रातही शिरत. हे वर्णन या ‘मेसापोटेमिया’च्या प्रदेशाशी अचूक जुळतं. सप्तसिंधू किंवा

सरस्वती नदीच्या बाबतीत जुळत नाही. कारण समुद्र तिथून शेकडो मैल लांब आहे. तात्पर्य, प्रलयाविषयीच्या पुराणकथा, मनुची नाव, अरारत पर्वत आणि इंद्र व वृत्र यांच्या लढाया हे सगळं एका सूत्रात बांधलं की पुढील गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. 

कश्यप समुद्रापाशी वास्तव्य
वृत्र पर्वतापाशी पोहोचलेले आर्य कश्यप समुद्रापाशी जाऊन स्थायिक झाले. हा भाग सध्या आर्मेनिया, अझरबैजान  आणि इराण यांनी व्यापलेला आहे. कश्यप समुद्र हा जगातला सर्वात मोठा ‘बंदिस्त जलाशय’ असून कुरा, तेरेक, उरल, व्होल्गा आणि अमुदर्या या नद्या या जलाशयाला मिळतात. यापैकी केवळ कुरा ही एकमेव नदी अझरबैजान देशातून वाहते. या नदीवरूनच ‘कुरु’ किंवा ‘सायरस’ सारखी संबोधने निर्माण झाली आहेत. कश्यप समुद्राच्या काठी आर्य बराच काळ स्थायिक झाले असावेत. कारण नंतर ते स्वतःला ‘काश्यप’ म्हणवून घेऊ लागले. पुढे भारतात आल्यावर अर्यांमध्ये गोत्र सांगण्याची पद्धत रूढ झाली तेव्हा मागाहून त्या प्रदेशातून आलेल्या आणि गोत्र नसलेल्या ब्राह्मणांना ‘गोत्रस्य त्वपरिज्ञाने काश्यपम गोत्रमुच्यते’ या नियमानुसार ‘काश्यप’ हेच गोत्र दिलं जाई. किंबहुना आजही हा प्रघात चालू आहे. धर्मविषयक कर्मकांड करत असताना यजमानाला गोत्र माहीत नसेल तर भटजीलोक ते ‘काश्यप’ धरून पुढले विधी करतात. हा नियम किंवा प्रघात म्हणजे आर्य कश्यप समुद्राच्या परिसरातून आले याचा एक पुरावाच म्हणता येईल.                                                                                                        
भारतात येऊन पोहोचल्यावर स्थानिक अनार्यांशी आर्यांचा संबंध आला. त्यात दास, पणि, व्रात्य, नाग, गरुड, यक्ष, अज, शीघ्र, याक वगैरे जमाती होत्या. त्यांच्याशी आर्यांचा संघर्ष होणं साहजिकच होतं. मात्र कालांतराने संबंध सुधारले तेव्हा सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. वर्णव्यवस्था न मानणाऱ्या स्थानिकांना ‘अवर्ण’ म्हणून समाज व्यवस्थेत सामावून घेण्यात आलं. मूर्तीपूजा नि जातिव्यवस्था आर्यांनी स्थानिकांकडून उचलली. 


सिंधू संस्कृती ही तर आर्य आणि पणि यांची संयुक्त वसाहत असावी असा अंदाज आहे. कारण आर्यांच्या यज्ञकुंडांचे अवशेष तिथे मिळाले आहेत. अशातऱ्हेने स्थानिकांशी जुळवून घेत गेल्याने आर्य संस्कृती टिकून राहिली पण तिच्यात काहीशी सरमिसळ झाली. त्यामुळे आजच्या भारतीय नागरिकांची जात किंवा धर्म कोणताही असो, त्यांची संस्कृती मात्र एकच असते. हजारो वर्षं राजकीय आणि धार्मिक वर्चस्व गाजवणार्या आर्यांचीच संस्कृती म्हणून ती ओळखली जाण हे अपरिहार्य आहे. 

(आगामी ‘आर्यभारत’ या ग्रंथातून अंशतः उधृत.)      




***

                                                                                      

No comments: