Thursday, December 13, 2012

टीकास्वयंवर : एक सोक्षमोक्ष ! ('Tika Svayanvar' by Bhalchandra Nemade : Finally Exposed !)


अ) नेमाडे यांची मुक्ताफळे 
'टीका स्वयंवर' या कुप्रसिद्ध पुस्तकात भालचंद्र नेमाडे यांनी कुणाविषयी काय मुक्ताफळे उधळली आहेत ती आधी देतो.
१) कालिदासाचे मेघदूत - दुय्यम कलाकृती (पृष्ठ २५१)
२) टेनिसन, ब्राउनिंग, इलियट, बेकेट - दुय्यम दर्जाचे साहित्यिक (पृ. ११५)
३) शि. म. परांजपे - मराठी नीट न येणारा माणूस (पृ. २४८)
४) पु. शि. रेगे - अपरिपक्व कादंबरीकार (पृ. २२८)
५) खांडेकर, फडके, माडखोलकर, गाडगीळ, भावे, रेगे, खानोलकर, जोगळेकर - लैंगिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने बुभुक्षित (पृ. २५५)
६) इंदिरा संत - क्षीण आशयाच्या कविता लिहिणारी कवयित्री  (पृ. १५२)
७) पद्मा गोळे - शब्दभांडार उबवित राहणारी कवयित्री (पृ. १३३)
८) पुन्हा फडके, खांडेकर, माडखोलकर - क्षुद्र लेखक, कवी (पृ. ८७)
९) आचार्य अत्रे - (कायम 'प्रल्हाद अत्रे' असा तुच्छतेने केलेला उल्लेख) (पृ. ४०, १२२, २५६)
१०) श्री. के. क्षीरसागर - मास्तरकी, भुंकणारी शैली, अर्ध्या हळकुंडाने पिवळे, लटपटपंची, अपुरे ज्ञान, घमेंडखोर इ. (पृ. १६, २३, २६, २८, २९, ३१)
११) ग. दि. माडगुळकर व सरोजिनी बाबर - निकृष्ट दर्जाचे लेखक (पृ. ३७)
१२) नरहर कुरुंदकर - पोरकट लेखक (पृ. ३९)
१३) दिलीप चित्रे - धन्देबाजी करणारे, काडीचाही व्यासंग नाही, अडाणी, मराठीचा नीट अभ्यास नाही (पृ. ३९)
१४) अरुण कोलटकर - सांस्कृतिक क्षुद्र वृत्ती (पृ. ८३)
१५) बोरकर, बापट, अनिल, पाडगांवकर, आरती प्रभू - रविकिरण मंडळाची हास्यास्पद परंपरा सांभाळणारे कवी (पृ. ९२)
१६) पु. ल. देशपांडे - आधुनिकीकरणाला सुप्त विरोध (पृ. ९८)
१७) विजय तेंडूलकर - आधुनिकीकरणाला सुपर फ्याशन म्हणून कवटाळणारे  (पृ. ९८)
१८) चोखामेळा, ग्रेस - बावळट साहित्यिक (पृ. १८०) 
१९) रेगे, खानोलकर, दळवी - अडाणी लेखक (पृ. २६६)
२०) 'तुझे आहे तुजपाशी' - आपली वांग्मयिन संस्कृती किती खालच्या दर्जाची आहे हे या नाटकावरून लक्षात येते (पृ. ३४१) 
२१) एकूण समीक्षक - धंदेवाईक बदमाष. वास्तववादी समीक्षेची आपल्याकडे परंपराच नाही.  (पृ. ३७३, १७६, ३४२)
२२) एकूण साहित्यिक - गिधाडे (पृ. ४२)  
अशातर्हेने तमाम मराठी साहित्यिक आणि समीक्षकांचा नेमाडे नावाच्या अतृप्त आत्म्याने अक्षम्य अधिक्षेप केला आहे.

ब) नेमाडे यांच्या विचारांमधील निवडक विसंगती 
आता नेमाडे यांचा वैचारिक गोंधळ सिद्ध करणाऱ्या त्यांच्या लेखनातल्या आणि मुलाखतींमधल्या निवडक दहा विसंगती सादर करतो.
१) क्षीरसागर यांना मराठी शब्दाला पुढे कंसात इंग्रजी प्रतिशब्द देण्याची सवय होती. उदा. सिनिक (cynic), ज्ञेयाच्या (object), सर्वसामान्य (standard) इ. 
त्याला अनुलक्षून 'प्रस्तुत टीकाकार आम्हांस हसवितात' असं हेटाळणीच्या सुरात नेमाड्यांनी 'टीकास्वयंवर' या टुकार ग्रंथात म्ह्टलं आहे. (पृ. २३)
प्रत्यक्षात नेमाडे हेच करतात. कानून (canons), स्वदेशीवाद (nativism), स्वदेशीवादी (nativistic), निर्मित वस्तू (end product), निर्मिणारी (creative), उतरंड (filtration), अधिकार (authority), ग्रंथहक्क (copyright) असले 'क्षुल्लक इंग्रजी शब्द' कंसात वारंवार देऊन नेमाडेही आम्हाला खदाखदा हसवतात. (पहा : पृ. २४१, २४२, २४४, २४६, २४७ वगैरे)  
२) 'क्षीरसागर यांची बुद्धी तरुण होती तेव्हा त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव पडला, तोच पुढे कायम राहिला' अशी टीका नेमाडे करतात. (पृ. २९) स्वतः नेमाड्यांचंही असंच आहे. बालकवी, चंद्रशेखर, शिरुरकर, तुकाराम, सानेगुरुजी यांचा बाल वयात त्यांच्यावर प्रभाव पडला आणि तेच त्यांचे कायमचे आवडते बनून गेले याची कबुली त्यांनी दिली आहे. (पृ. ३३७, ३३९, ३४०, ३४१) 
३) 'फडतूस ब्राह्मण साहित्यिकांचं उगीचच कौतुक होतं. वस्तुतः आज महार मांगांचीच भाषा खर्या अर्थाने सतेज आहे' (पृ. ३४४) असा निर्वाळा देणारे नेमाडे चांगल्या भाषेची उदाहरणे देताना मात्र गोडसे भटजी, लोकहितवादी, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, चिं. वि. जोशी, माडगुळकर, भाऊ पाध्ये इत्यादी बहुतांशी ब्राह्मण लेखकांच्या भाषेचाच दाखला देतात. (पृ. ३४४)
४) ग्रेस यांना 'बावळट साहित्यिक' (टी.स्व. पृ. १८०) अशी शिवी हासडणार्या नेमाड्यांनी 'मला त्यांची कविता कळत नाही' असं केशव सद्रे यांना दिलेल्या मुलाखतीत कबूल केलं आहे. (पहा : 'नेमाडे यांचे साहित्य : एक अन्वयार्थ' प्रा. केशव सद्रे पृ. १५९) 
५) 'जीए यांना ज्ञानपीठ मिळायला हवे' (टी.स्व. पृ. ३८३) असं म्हणणारे नेमाडे सद्रे यांना दिलेल्या उपरोल्लेखित मुलाखतीत 'जीएंच्या कथा समजत नाहीत. लहान मुलांसाठी म्हणूनसुद्धा त्या सकस नाहीत. जीए हे गोंधळून गेलेले आहेत. त्यांना काय सांगायचंय, काय नाही, हे कळत नाही.' असं म्हणून मोकळे होतात. (सद्रे पृ. १५९) शिवाय 'लघुकथा हा निव्वळ मासिकं चालवणारा क्षुद्र वांग्मयप्रकार आहे.' असं सांगायलाही ते कमी करत नाहीत. (टी.स्व. पृ. २५२, ३४१ व सद्रे पृ. १५९) 
६) दळवी यांना 'लैंगिकतेचे व्यापारी', 'लैंगिकता तंत्र म्हणून टिकविणारे' (टी.स्व. पृ. २६५), अडाणी (पृ. २६६), 'रीतीनिष्ठ लैंगिकतेकडे झुकलेले'  (पृ. २७८) अशा शेलक्या शिव्या घालून झाल्यावर 'दळवी हे ज्ञानपीठ पात्र' असल्याचं मुळी, विसपुते आणि पाटील यांना दिलेल्या मुलाखतीत नेमाडे सांगून टाकतात. (पृ. ३८४)
७) 'फडके-खांडेकर हे स्वतः ला 'युग प्रवर्तक' म्हणवणारे लेखक प्रत्यक्षात 'थिटे' आहेत. ते टिकणार नाहीत. (टी.स्व. पृ. ३३) उलट नवी नैतिकता आपल्या कादंबर्यांमधून मांडणारे मनोहर तल्हार, मनोहर शहाणे, ए.वि.जोशी, किरण नगरकर, अनंत कदम, दीनानाथ मनोहर इत्यादी लेखक 'थोर' असल्या'चं नेमाडे सुचवतात. (टी. स्व. पृ. २७८) प्रत्यक्षात फडके-खांडेकर अजून तरी टिकले आहेत आणि हे तथाकथित 'थोर' लेखक आज कुणाला माहीत नाहीत ही वस्तुस्तिथी आहे. 
८) केशव सद्रे यांना दिलेल्या मुलाखतीत नेमाडे सुचवतात की 'कविता ही सर्व साहित्य प्रकारात केंद्रीय असते. कारण अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. त्यामुळे कवितेत माणूस जास्तीत जास्त प्रामाणिक असतो.' (सद्रे पृ. ६९ व ७०) हेच नेमाडे पुढे म्हणतात, 'बर्याचदा माणूस कवितेत इमोशनल होऊन खोटे बोलू शकतो.' (सद्रे पृ. १४९)
९) 'ऐतिहासिक सत्याचे विकृतीकरण करणारी कादंबरी' म्हणून नेमाडे 'स्वामी' या कादंबरीचं उदाहरण देतात. (टी.स्व. २१४) मग '१९६० सालानंतर दरवर्षी एकतरी चांगली कादंबरी येऊ लागली आहे' असं  म्हणून 'स्वामी'चा उल्लेख करतात. (पृ. २४९) आणि परत २६० व २६१ या पृष्ठांवर 'कर्तुत्वशून्य पिढीच्या अपेक्षा पूर्ण करणारी कादंबरी' म्हणून 'स्वामी'वर उपरोधिक टीका करून जातात. 
१०) दिलीप चित्रे आणि अरुण कोलटकर यांना वर लिहिल्याप्रमाणे साहित्यदृष्ट्या क्षुद्र, अडाणी, अव्यासंगी वगैरे बर्याच शिव्या घालून झाल्यावर स्वतःच्या 'मोजक्या आवडत्या' कवींमध्ये नेमाडे या दोघांचा समावेश करतात. (टी.स्व. पृ. ३४१)

क) नेमाडे यांच्या आचारामधील निवडक विसंगती
१) 'महाराष्ट्र टाइम्स' आणि त्याचे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर  यांच्यावर नेमाड्यांनी सडकून टीका केली आहे. 'निर्बुद्ध, अडाणीपणामुळे येणारी मग्रुरी, प्रसिद्धीच्या सत्तेचा मद, जातीय प्रवृत्ती, सत्यविपर्यास करणारे' इत्यादी विशेषणं त्यांनी त्यांना लावली आहेत. (टी.स्व. पृ. ३५८, ३५९) पण हेच नेमाडे एकदा अशोक शहाण्यांबरोबर तळवलकर यांना भेटायला गेले होते आणि इंग्लंड मधल्या आपल्या वास्तव्यावर आधारित लेख 'मटा' मध्ये छापा म्हणून त्यांना गळ घालत होते. तळवलकर यांनी ते छापले नाहीत म्हणून नेमाड्यांचा हा राग. (पहा : 'न छापण्याजोग्या गोष्टी' सुनील कर्णिक पृ. ११८) म्हणजे चीकित्सेपेक्षा व्यक्तिगत रागलोभ हीच नेमाड्यांच्या टीकेमागची प्रेरणा असते.
२) दुकानदार आणि साहित्यिक यांची तुलना करताना नेमाडे म्हणतात 'खपाऊ नाटके, कादंबर्या, विनोद इ. लिहून बँक ब्यालन्स वाढवणे या गोष्टींमध्ये एक हुकुमी इच्छाशक्ती असते. (टी.स्व. पृ. ३६) हेच नेमाडे १६ जानेवारी १९९१ रोजी म्हापसा सांस्कृतिक केंद्रात दिलेल्या मुलाखतीत काय म्हणतात बघा. 'कोसलाएवढ्या तुमच्या बाकीच्या कादंबर्या का गाजल्या नाहीत?' असा प्रश्न मुलाखतकाराने विचारल्यावर नेमाडे उत्तरतात 'त्या कादंबर्याही दुसर्या तिसर्या आवृत्तीत असून वर्षाला प्रत्येकीच्या पाच सहाशे प्रती खपत आहेत.' (पहा : सद्रे पृ. १४९) म्हणजे वांग्मयीन गुणवत्तेचा संबंध नेमाडेही अखेर 'खपा'शीच नेऊन जोडतात. 
३) नेमाड्यांच्या कादंबर्यांचा हा खप सुद्धा संशयास्पद आहे. 'कोसला' च्या पहिल्या आवृत्तीच्या न खपलेल्या सर्व प्रती २३ ऑक्टोबर १९७० रोजी स्वतः नेमाड्यांनीच प्रकाशक 'देशमुख आणि कंपनी'कडून विकत घेतल्या होत्या. त्यावेळी देय रकमेमधून बाजारभावाप्रमाणे ३३ टक्के कमिशन वसूल करायला ते विसरले नाहीत. मग देशमुखांनीही नेमाड्यांना पूर्वी दिलेला advance त्यामधून वळता करून घेतला. (पहा : 'कुरुंदकरांची निवडक पत्रे' सं. जया दडकर पृ. ११३ व २३०) 
४) दुसर्यांना वांग्मयीन धन्देबाजी आणि बाजारूपणाबद्दल उपदेशाचे डोस पाजणारे नेमाडे प्रकाशकाकडून advance घेतात, पुस्तकविक्रीचे कमिशन वसूल करतात, 'महाराष्ट्र फौंडेशन च्या पुरस्काराचे दोन लाख रुपये खिशात टाकतात नि अशातर्हेने स्वतःचा ब्यांक ब्यालन्स बेलाशक वाढवतात. 
५) कुणाची स्तुती करायची म्हटली की नेमाड्यांचा प्राण कंठाशी येतो. टीका स्वयंवर पृ. ४५ वर ते म्हणतात 'माणदेशी माणसं' लिहिणारे लेखक 'नाईलाजाने भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर मोठे होऊन पुण्या किंवा मुंबईत सुरक्षित, सुखकर जीवन जगत असतात.' यावर प्रश्न विचारावासा वाटतो की खुद्द नेमाडे इंग्लंडात किंवा गोव्यात कसल्या प्रकारचं जीवन जगत होते ? आणि त्यानंतर महाराष्ट्रात प्राध्यापकाचं 'चिरेबंद' जीवन ते सुखात जगले  की दुःखात ? मुलाखतकार नेमका हाच प्रश्न त्यांना विचारतो तेव्हा 'आदिलेखक होण्याचं धैर्य माझ्यात नाही.' असं म्हणून ते स्वतःची सुटका करून घेतात. (टी.स्व. पृ. ३५७, ३५८)   
६) उठसूठ दिल्लीला जाऊन पुरस्कार घेऊन येणाऱ्या लेखकांविषयी संताप व्यक्त करणारे नेमाडे (टी.स्व. पृ. ३३) काही वर्षांनंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी किंवा 'साहित्य अकादमी सदस्य' असल्याच्या सबबीवर दिल्लीच्या वार्या करत राहतात.              
७) साहित्य पुरस्कारांवर झोड उठवणार्या नेमाड्यांनी 'टीकास्वयंवर' ग्रंथाच्या मलपृष्ठावर (साकेत प्रकाशन, आवृत्ती २००१) त्या पुस्तकाला मिळालेल्या चिल्लर पुरस्कारांची यादीसुद्धा अगदी अभिमानपूर्वक दिली आहे. 'शासकीय पुरस्कार क्षुद्र, फालतू असतात. 'ते घेऊ नका' असं सांगणारे लेखकही नंतर ते निर्लज्जपणे स्वीकारतात. ते बंद केले पाहिजेत.' (टी.स्व. पृ. ८९, ३५७, ३८३) असा कंठशोष करणारे नेमाडे १९९१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मात्र त्याच 'निर्लज्जपणे' स्वीकारताना दिसतात.   
८) लेखकांच्या 'अड्डेबाजी' वर तुटून पडणारे नेमाडे (पहा : 'लेखकाचा लेखकराव' हा संपूर्ण लेख) १९९८ मध्ये अकादमी सदस्य झाल्यावर स्वतःही अड्डेबाजीचा धुमाकूळ घालताना दिसतात. १९९८-९९ पासून २००१-०२ पर्यंतचे अकादमी पुरस्कार नेमाड्यांचे  निकटवर्ती असणारे सदानंद मोरे, रंगनाथ पठारे, ना.धों.महानोर आणि राजन गवस यांना मिळाले हा योगायोग नव्हे. मोरे यांनी याबद्दल उघडपणेच नेमाड्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता. महानोर हे नेमाड्यांचे जवळचे मित्र. पठारे हेही नेमाडेपंथीच. आणि गवस यांनी तर नेमाड्यांवर एक पुस्तक संपादित करून पुरस्कार पदरात पडून घेतला. (पहा : 'नेमाडे पंथीय दहशतवाद' ले.पंकज कुरुलकर, म. टा. दि. १८ जानेवारी २००१.) कुरुलकरांच्या मुद्देसूद आरोपांना नेमाडे किंवा वरीलपैकी एकाही लेखकाने उत्तर दिल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आताशा 'लेखकराव' म्हटलं की झट्कन नेमाड्यांचीच आडव्या अंगाची मिशाळ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते.

ड) नेमाडे यांच्या मराठीच्या चुका  
ज्येष्ठ साहित्यिकांना 'मराठी नीट न येणारा माणूस' 'अडाणी' वगैरे संबोधून त्यांची हेटाळणी करणाऱ्या नेमाड्यांचं स्वतःचं मराठी काय लायकीचं आहे याची ही एक झलक.
१) ग्रंथाच्या नावापासूनच सुरुवात करू. 'टीकास्वयंवर' हा शब्द नेमाड्यांनी मुद्दाम 'सीतास्वयंवरा' सारखा वापरला आहे. एकेका साहित्यिकाला टीकास्वरूपी हार घालत जाण्याचं प्रतिक म्हणून 'स्वयंवर' शब्द योजला असावा. पण स्वयंवरात हार केवळ एकालाच घातला जातो, अनेकांना नव्हे. त्यामुळे या शब्दाचा शीर्षकातला वापर पूर्णपणे अशास्त्रीय आहे. 
२) पृ. १०२ वर 'साहित्य आणि रसिक या दोन घटकांचा बांधिलकीशी येणारा संबंध दूरान्वयाचा ठरतो' असं विधान आहे. इथे 'दूरचा ठरतो' हे पुरेसं होतं. 'दूरान्वयाचा' हे अनावश्यक. शिवाय 'दुरान्वये' हा शब्द नकारात्मक रचनेत वापरण्याचा संकेत आहे. उदा. 'दूरान्वयेही संबंध येत नाही.' 
३) पृ. २८५ वर 'वैफल्य म्हणजे हतबलता नव्हे, भ्रमनिरास म्हणजे निराशावाद नव्हे हे कृतीनेच ही कादंबरी सिद्ध करते' असं वाक्य आहे. इथे 'निराशावाद' या शब्दाची चुकीची योजना केली आहे. त्या ऐवजी 'नैराश्य' हवं होतं. किंवा नुसतं 'निराशा' ही चाललं असतं.
४) पृ. ३८४ वर 'आंतरराष्ट्रीय स्तरावरही नोबेल सारखी बक्षिसं असाहित्यिक कारणांवरूनच दिली जातात' असं लिहिलंय. इथे 'असाहित्यिक' हे चूक आहे. त्या ऐवजी 'साहित्यबाह्य' हा शब्द हवा. 
५) क्लिष्ट, लांबलचक वाक्यरचना आणि चुकीचं मराठी यांची ही चढाओढ पहा : 'सत्यदर्शन, जीवनदर्शन, कणखर वगैरे अनुभव आणि सामाजिकता, वास्तवता, इत्यादी अनेक गोष्टी बाजूला ठेवून अस्सल शब्दांचे शिल्प पाहू गेल्यास केकावलि किंवा गोदागौरव ह्यांतील शब्दयोजना इतकी झगमगीत वाटते की त्यापुढे पादाकुलक किंवा अक्षररचना किंवा मुक्तछंद यासारख्या सोप्या पद्यातूनच पण आठदहा ओळींपलीकडे क्वचितच जाणारे व त्यातील दोनेकच ओळींत कवितेचे सार ओतणारे नवे कवी आपले शब्दांचे अज्ञानच दाखवीत असतात असे म्हणावे लागेल.' (पृ.२३६, २३७) 
चुकीच्या मराठीची आणि क्लिष्ट वाक्यरचनेची अशी उदाहरणं पानोपानी आढळतात. एकूण नेमाडे या गृहस्थाच्या जाड कातडीवर आपल्या संत वांग्मयाचा जराही संस्कार झालेला दिसत नाही.                    

2 comments:

yogeshmore said...

ekun ha lekh suddha suud buddhinech lihilysarkha wattoy ..

yogeshmore said...

pan khup vichar karun lihilay ... tyache kautuk ... keep writing