Thursday, April 3, 2025
पानिपताच्या प्रतिशोधाचे खरे मानकरी
अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथील शौर्य स्मारकाच्या संदर्भाने विधिमंडळात केलेल्या भाषणात असं विधान केलं, की 'पानिपतच्या युद्धानंतर केवळ दहाच वर्षांत महादजी शिंदे यांनी नजीबखानाची कबर उध्वस्त केली, रोहिल्यांची कत्तल उडवली आणि दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचं निशाण फडकावलं !' फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांनी दहा वर्षांत पानिपतचा सूड उगवला ही गोष्ट खरी असली, तरी हे करण्याचं पूर्ण श्रेय महादजी याचं नाही हे फडणवीस यांना माहीत नसावं. महादजी हा महान सेनानी होता आणि पुढल्या काळात त्याने स्वराज्याची प्रचंड सेवा केली ही गोष्ट खरी आहे. परंतु बारभाईचं कारस्थान पार पडेपर्यंत महादजी हा दुय्यम स्थानावरच होता आणि घरच्या विरोधामुळे शिंद्यांची दौलत हाती घेऊन मनाप्रमाणे तिची व्यवस्था लावण्यास त्याला किमान दहाबारा वर्षं घालवावी लागली ही सुद्धा वस्तुस्थितीच होती. (पहा- पृ. ११८, १२०, १३३, २१२, २१३ मराठी रियासत खंड ५.) त्यात पुन्हा पदोपदी होळकरांशी त्याचे खटके उडत होते. या पार्श्वभूमीवर माधवराव पेशव्याची त्याला भक्कम साथ मिळाली म्हणूनच तो उत्तरेत उभा राहू शकला ही सत्य परिस्थिती आहे.
फडणवीस यांना हे माहीत नसावं आणि त्यात त्यांची काही चूकही नाही. सखोल अभ्यास न करणाऱ्या अनेकांचा तसाच समज असतो. अशा लोकांचा गैरसमज दूर करणं आणि पानिपताचा सूड उगवण्याचं मुख्य श्रेय रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले या दोन सरदारांकडे कसं जातं हे दाखवून देणं एवढंच हा लेख लिहिण्यामागचं प्रयोजन आहे.
रामचंद्रपंत कानडे
रामचंद्र गणेश कानडे याच्याविषयी फारशी माहिती मला मिळाली नाही. कुणाकडे असल्यास त्याने ती इथे द्यावी. रामचंद्र गणेश याने पेशवा सदाशिवरावभाऊ याच्या हाताखाली युद्धविषयक शिक्षण घेतलं होतं. माधवराव पेशव्याच्या कारकिर्दीत याचे बरेच उल्लेख येतात, त्यातले निवडक खाली देतो.
फेब्रुवारी १७६४ मध्ये स्वतः माधवराव पेशवा दक्षिणेत हैदरवर चाल करून गेला त्यावेळी सोबत रास्ते, कानडे, बिनीवाले वगैरे सरदार होते. ही लढाई फेब्रुवारी १७६५ पर्यंत लांबली व हैदर शरण आला. घोरपडे व सावनूरचा नवाब यांचा मुलुख त्याला परत द्यावा लागला. (संदर्भ - १. 'हिंदुराव घोरपडे घराण्याचा दक्षिणेकडील इतिहास'. २. 'म. रियासत खंड ५', पृ. ७८ ते ८६.) दि. ३०-०६-१७६८ रोजी पाटा तालुक्यातील मुल्हेर, साल्हेर, न्हावा, पिसोला, भामेर आणि देहेर हे राघोबादादाकडून घेतलेले सहा किल्ले रामचंद्रपंत कानडे आणि विसाजीपंत बिनीवाले यांचे हवाली करण्याकरिता पेशव्याने सनदा करून दिल्या. (पेशवे दप्तर खंड २९, पत्र २७३.)
१७६८ सालच्या अखेरीस पेशव्याने उत्तरेत फौजा पाठवण्याची सिद्धता केली आणि रामचंद्र गणेश कानडे याजकडे मुख्य व्यवस्था नेमिली. (म. रियासत ५, पृ. १४३, पे. द. खं २९, पत्र २१९, २२२, २२४, २२९.)
या पत्रांवरून दिसून येतं की महादजी नव्हे, तर रामचंद्रपंत कानडे हाच पहिली काही वर्षं उत्तरेतील मोहिमेचा प्रमुख होता.
२५ नोव्हेंबर १७६८ या तारखेचं तुकोजी होळकर याचं उत्तरेच्या मोहिमेस लवकरच येऊन मिळतो म्हणून रामचंद्रपंतास आश्वासन देणारं पत्रही हेच स्पष्ट करतं. (पे. द. २९, पत्र २१९.)
३ मार्च १७६९ चं तुकोजी होळकर याचं 'महादजी माझं ऐकत नाही' म्हणून तक्रार करणारं कानडे आणि बिनीवाले यांना कोटा (राजस्थान) इथून लिहिलेलं एक संयुक्त पत्र आहे ते विसाजीपंताचा दर्जा जवळपास रामचंद्रपंताएवढाच असल्याचं सूचित करतं.
१५ डिसेंबर १७७० रोजी कानडे व महादजी इटाव्यातून फर्रुखाबादेवर चालून गेले. दुआबातील अहमद बंगशाचा सर्व प्रदेश व्यापला. मुसलमानांच्या कत्तली केल्या. (पृ. १४९.) जानेवारी १७७१ मध्ये दुआबात अहमद बंगशाला शरण आणल्यावर रामचंद्रपंताची सर्वत्र वाहवा झाली.(म. रियासत पृ. १४७.)
दिल्लीचा किल्ला काबीज केल्यावर नोव्हेंबर १७७१ मध्ये पेशव्याने रामचंद्रपंतास पुण्यास बोलावून घेतलं. त्याप्रमाणे बादशहास राज्यारोहण केल्यावर पंत पुण्यास निघून आला.
राघोबादादा आणि जानोजी भोसले यांच्यावरील मोहिमांमध्येही हा होता.
पुढे १२ डिसेंबर १७८० रोजी वसईच्या संग्रामात वज्रेश्वरी इथे इंग्रजांचा तोफगोळा लागून रामचंद्रपंत मरण पावला.
विसाजी कृष्ण बिनीवाले
याचं मूळ आडनांव चिंचाळकर. हा कोंकणातील राजापूर प्रांतातील तेरवणचा. कऱ्हाडे ब्राह्मण. याचा बाप पुरंदरास होता. नानासाहेब पेशव्याच्या हुजुरातील दौलतराव काटे याच्या पागेत याचा प्रवेश झाला. इ.स. १७५७ पासून कर्नाटकात बळवंतराव मेहेंदळे याच्या हाताखाली याने कामगिरी केली. पागेच्या बिनीवर हा असे म्हणून 'बिनीवाले' नांव पडले. माधवराव याच्यावर खूष असे. ('ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी', पृष्ठ ९५.)
'मराठी रियासत खंड ५' मध्ये बिनीवाले याच्या खालील हालचालींचा उल्लेख आहे,
१० ऑक्टोबर १७५९ रोजी नगरचा किल्ला निजामाच्या फौजांचा पराभव करून जिंकला. सदाशिवरावभाऊ बरोबर पानिपतच्या युद्धात हा लढला. १७६९ सालच्या मे महिन्यात रामचंद्र गणेश कानडे यांच्यासह हा उदयपूरला फौजा घेऊन गेला आणि ६० लक्ष खंडणी ठरवली. (पृ . १४२-१४३)
ऑक्टोबर १७६९ मध्ये बुंदेलखंडाचा अंमल पक्का बसवला व चहूकडच्या खंडण्या घेतल्या. (पृ. १४४)
५ एप्रिल १७७० रोजी गोवर्धन येथे कानडे व बिनीवाले या दोघांनी जाटांचा धुव्वा उडवला. समरू व माडेक या युरोपियन सेनानींचा त्यांनी पराभव केला. सोबत तुकोजी होळकरही होता. (पृ. १४५.)
नंतर मराठ्यांच्या सेना अंतर्वेदीत शिरल्या. त्यांत कानडे व बिनीवाले यांचा समावेश होता हे त्यांनी १७.५.१७७० रोजी नाना फडणवीसाला लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होतं. (पे. द. खं. २९, पत्र क्र. २५६.)
सप्टेंबर १७७० मध्ये जाटांशी तह पूर्ण झाला.
ऑक्टोबर १७७० मध्ये कानडे व बिनीवाले यांनी नजीबखान रोहिल्याचा पराभव केला. (पृ. १४६-१४७.)
२१ जानेवारी १७७१ रोजी बंगशाची शरणागती. २२ लक्ष खंडणी ठरवली. पानिपतानंतर बळकावलेला सर्व प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. (पृ. १४९.)
१० फेब्रुवारी १७७१ रोजी विसाजीने दिल्लीचा किल्ला घेतला. (पृ. १५२-१५३)
विसाजी कृष्ण याच्या पराक्रमाविषयी माधवराव पेशव्याचे शिक्षक व राजदूत महादजी बल्लाळ करकरे गुरुजी यांनी बाबूराव ठाकूर यास दि. १७-०३-१७७१ रोजी लिहिलेल्या पत्रातील मजकूर असा,"...सांप्रतचे वर्तमान राजश्री विसाजीपंतदादा व महादजीबावा शिंदे वगैरे सरदारांनी सनदा करून दिल्ली घेऊन बंदोबस्त केला हे (विसाजीपंत) दादांचे पत्र सरकारांत आले व आपले पत्र घरास आले त्यावरून कळले. हे यश मोठे आले. श्रीमंतांचे मनासही ऐसेच होते म्हणून वारंवार पत्री आज्ञा जात होती असे असता राजश्री रामचंद्रपंततात्यास अनुकूल पडले. (विसाजीपंत) दादाच या यशास विभागी होते...." (पे. द. खं. २९, पत्र २६५.)
याच संदर्भात रामचंद्र शिवदेव याने बाबूरावांना लिहिलेल्या १७-०३-१७७१ च्या पत्रातील मजकूर असा,"... राजश्री विसाजीपंतदादा यांनी व राजश्री महादाजीबाबा शिंदे यांनी सारे सरदार मतांत मिळवून एकविचारे दिल्लीचा बंदोबस्त किल्ल्यासुद्धा केला म्हणून कळले. तर ही महाकृत्ये खावंदाचे सेवकाचे हाते घडावी हे फळ स्वामीसेवेवर एकनिष्ठ तिकडे आहे." (पे. द. खं. २९, पत्र २६६.)
याच संदर्भात 'ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी' पृष्ठ ९५ वर खालील मजकूर आहे, 'विसाजी कृष्ण बिनीवाले याने ११ फेब्रुवारी १७७१ रोजी दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण फडकावले. याने व महादजीने २५ डिसेंबर १७७१ रोजी शहाआलमास दिल्लीच्या तख्तावर बसविले.'
या समयी रामचंद्रपंत कानडे हा ही राज्यारोहणाला उपस्थित होता. (पहा- पे. द. खं. २९, पृष्ठ २)
वरील घटनाक्रमावरून दिल्लीच्या किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण लावण्याचं आणि बादशहाला गादीवर बसवण्याचं श्रेय महादजीला जाण्यापेक्षा मराठा सैन्याचे प्रमुख म्हणून रामचंद्रपंत कानडे आणि उपप्रमुख विसाजीपंत बिनीवाले यांना जातं असं दिसून येतं.
प्रतिशोधाचा नायक विसाजी कृष्ण
नोव्हेंबर १७७१ मध्ये कानड्यांना परत बोलावून माधवरावाने उत्तरेची सूत्रे विसाजी कृष्णाकडे दिली. अशाप्रकारे विसाजी कृष्ण बिनीवाले हा उत्तरेतील मराठ्यांच्या मोहिमेचा प्रमुख बनला.
फेब्रुवारी १७७२ मध्ये विसाजी आणि महादजी यांनी शुक्रतालवार झबेताखानाचा फन्ना उडवून दत्ताजी शिंद्याचा सूड काढला. नजीबखानाची कबर फोडून तोफा आणि धनसंपत्ती लुटली आणि पानिपताचा सूड उगवला. रोहिल्यांशी ४० लाखांचा तह ठरवला. विसाजी कृष्णाचा हा पराक्रम माधवरावास एवढा अपूर्व वाटला, की तो पुण्यास येईल तेव्हा 'पुण्याच्या वेशीवर सुवर्णपुष्पे उधळून त्याचे स्वागत करावे' असं त्याने मृत्युपत्रात लिहून ठेवलं. (पे. द. खं. २९, पत्र २७६ व 'म. रियासत खंड ५', पृष्ठ १५९.)
दि. १२-०५-१७७२ च्या माधवराव पेशव्याने विसाजीपंताला लिहिलेल्या पत्रात 'महादजी शिंदे याच्याकडून चौदा लक्ष छपन्न हजार आठशे दहा रुपयांचे बरेच दिवसांचे येणे आहे ते वसूल करून पाठवून देणे' असा आदेशही दिला आहे. (पे. द. खं. २९, पत्र २७५.)
२२ जून १७७२ रोजी माधवराव पेशव्याने विसाजीपंतास लिहिलेल्या पत्रात "इंग्रजास जी गोष्ट न जाहली ती तुम्ही सिद्ध करून असाधारण लौकिक मिळविला !" असं कौतुक करून बादशहाकडून पैसा आणि मुलुख वसूल करायला विसरू नका असा सल्लाही दिला. (म. रियासत खं. ५, पृ. १५५.)
पुढे नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर राघोबादादा पुण्यास गादीवर असताना विसाजीपंत बावीस लक्ष रुपये, जवाहीर व जामदारखाना एवढा ऐवज घेऊन आला तेव्हा पुण्याच्या वेशीवर माधवरावाच्या इच्छेप्रमाणे सुवर्णपुष्पे उधळून राघोबाने त्याचं स्वागत केलं. विसाजीपंत आधी राघोबास सामील झाला. (पुरंदरे दप्तर खंड ३, पृ. १२५-१२७, काव्येतिहास संग्रह शकावली, म. रियासत खंड ५, पृ. ३४५.) मात्र वस्तुस्थिती कळल्यावर मार्च १७७४ मध्ये दादास सोडून तो बारभाईस सामील झाला. (पृष्ठ ३५४, 'म. रियासत खंड ५'.)
अशा या महापराक्रमी विसाजीपंत बिनीवाले या सरदारावर नागपूरच्या विजय प्रकाशनाने प्रकाशित केलेलं डॉ. सुनीता सरायकार लिखित 'विसाजी कृष्ण बिनीवाले - काळ आणि कर्तृत्व' हे एकमेव मराठी पुस्तक मला आढळलं. त्यातही संपूर्ण तपशील आले आहेत असं नाही. अभ्यासाला अजून भरपूर वाव आहे.
तात्पर्य, पानिपताचा प्रतिशोध घेणाऱ्या मराठ्यांच्या उत्तरेतील दैदिप्यमान यशाचा नायक महादजी शिंदे हा नसून विसाजी कृष्ण बिनीवाले हाच होता हे वर दिलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होतं.
- हर्षद सरपोतदार
मुख्य संदर्भ :-
१. मराठी रियासत खंड ५, गो. स. सरदेसाई, पॉप्युलर प्रकाशन आवृत्ती २०१०.
२. पेशवे दप्तर खंड २९.
३. ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, १९५७.
Subscribe to:
Posts (Atom)