Thursday, March 4, 2021

इथे मूलनिवासी कुणीही नाही !   

वैदिक आर्य बाहेरून भारतात आले की मूळचे भारतातीलच होते हा एक कायमचा वादाचा विषय बनला आहे. याचा गैरफायदा उठवून काही लोक विशिष्ट जातिसमूहाला 'तुम्ही मूलनिवासी नाही, तुम्ही बाहेरून आलात' असं हिणवून समाजात दुफळी माजवायचा प्रयत्न करत असतात. याउलट हिंदुत्ववादी लोक सर्वशक्तीनिशी आपण भारतातील मूलनिवासी असल्याचा दावा करत असतात. हे असले वाद म्हणजे या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या अडाणीपणाचे द्योतक आहेत. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या 'फोडा आणि झोडा' धोरणाचाच हा परिणाम आहे. मध्यंतरी माझ्याकडे 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' या शीर्षकाचं एक लहानसं चोपडं 'भारतीय विचार साधना' या संस्थेकडून कुणीतरी आणून दिलं; त्यातही डॉ. आंबेडकरांचा दाखला देऊन आर्य हे मुळात इथलेच कसे आहेत हे सिद्ध करायचा प्रयत्न केलेला आढळला. (पृ. २५) माझ्या मते मूलनिवासी असल्याचा किंवा नसल्याचा हा भयगंड अकारण बाळगला जात आहे. याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे,   १. आधुनिक विज्ञानातील सिद्धांताप्रमाणे सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज जो Homo Erectus या नांवाने ओळखला जातो, तो आफ्रिकेतून भारतीय उपखंडात आला. त्यानंतर अंदाजे ५५,००० वर्षांपूर्वी पहिला आदिमानव (Homo Sapiens) याचं आफ्रिकेतूनच भारतात आगमन झालं. दरम्यान कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे किंवा आदिमानवासह झालेल्या संघर्षांमुळे Homo Erectus नामशेष झाला. असं असलं तरी आदिमानवाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचे पुरावे मात्र ३०,००० वर्षांपलीकडे सापडत नाहीत. त्यापूर्वी भारतात मानवप्राणी नव्हता. (Page 1, 'A Population History of India') याचा अर्थ उघड आहे; की आर्य असोत, अनार्य असोत वा तथाकथित आदिवासी असोत, भारतात सर्वच उपरे आहेत.       २. डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्या प्रतिपादनानुसार आर्य हे बाहेरूनच आले. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. (Page 49-50, 'The Aryan Problem') मात्र त्यांनी कालनिश्चिती केलेली नाही. मी स्वतः ती केली असून आर्य इ. स. पूर्व ७८०० च्या सुमारास कश्यप समुद्राकडून (Caspian Sea) भारतात आले असा सिद्धांत मांडला आहे आणि तेव्हापासून यादवकाळापर्यंतचा राजकीय आणि सांस्कृतिक हिशेब नांवानिशीवार लावून दाखवला आहे. ('आर्यभारत खंड १ व २')  ३. आर्य भारतात आले तेव्हा इथे पणि, दास, यक्ष, नाग, याक, अज, शीघ्र, मुंड, भिल्ल, गोंड, व्रात्य वगैरे अनार्य जमाती आधीच स्थायिक झाल्या होत्या. आर्यांच्या आगेमागे असुर, गंधर्व, किन्नर, हस्ती, गो, कुकुर, काक इत्यादी लोक आले. (Page 83-84, 'Riddle' -11 by Dr. Ambedkar)  या सर्व जमाती कालांतराने आर्यांच्या वैदिक हिंदू धर्मात आपापल्या संस्कृतीसह विलीन होत गेल्या. ४. पुढल्या काळात शक, हूण, कुशाण, ग्रीक, पर्शियन आदी लोक भारतात आले आणि कालांतराने इथला धर्म स्वीकारून इथल्या संस्कृतीत विरघळून गेले. ही प्रक्रिया इतक्या बेमालूमपणे पार पडली की आज आपल्या धमनीत वाहणारं रक्त कुणाचं आहे, आपण नेमकी कुठली संस्कृती आचरत आहोत आणि कुणाच्या देवता पूजत आहोत हे सांगणं अशक्यप्राय आहे. एकप्रकारे हे समरस्य आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.    ५. निव्वळ महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तरी असंच आढळतं, की महाराष्ट्रातही मूलनिवासी कुणीही नव्हता आणि नाही. वि. का. राजवाडे यांच्या 'महाराष्ट्राची वसाहत' आणि 'महाराष्ट्र व उत्तर कोकणची वसाहत' या दोन लेखांत नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सर्वप्रथम गुहेमध्ये राहणारे 'कातवडी' लोक अंदाजे चार हजार वर्षांपूर्वी आले. त्यानंतर नाग, वारली, कोळी आणि ठाकर हे आले. (पृ. १५२, 'राजवाडे लेखसंग्रह') पुढे मगधातील बौद्ध क्रांतीला कंटाळून तेथील चातुर्वर्ण्ययुक्त 'महाराष्ट्रिक' लोक दक्षिण अरण्यात शिरले. मागोमाग कुरुपांचाल प्रदेशातील 'राष्ट्रिक' हेही येते झाले. काही काळाने उत्तरकुरु आणि उत्तरमद्र येथील विराटाच्या राज्यातले 'वैराष्ट्रीक' जानपद सुद्धा महाराष्ट्रात आले. (पृ. ११८-११९, 'राजवाडे लेखसंग्रह') या सर्व लोकांचं एकत्रीकरण होऊन सध्याचे मराठी लोक कसे बनले याचं सविस्तर विवेचन राजवाडे यांनी अनेक संदर्भ देऊन या दोन लेखांमध्ये केलं आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की भारताप्रमाणेच महाराष्ट्रातही कुणाला 'मूलनिवासी' म्हणता येणार नाही. आपण सगळे इथेही उपरेच आहोत. तेव्हा यापुढे असले वाद घालणं संबंधितांनी बंद करावं हे बरं.                                                               संदर्भ :- १. 'मूलनिवासी एक खोटी संकल्पना' - रवींद्र साठे - भारतीय विचार साधना, पुणे, २००५.  २. 'A Population History of India' - Tim Dyson - Oxford University Press, UK, 2018.  ३. 'The Aryan Problem' - Editors Deo & Kamath - Bharatiy Itihas Sankalan Samiti, Pune, 1993. ४. 'आर्यभारत खंड १ व २' - हर्षद सरपोतदार - विहंग प्रकाशन, पुणे, २०१६ व २०१८.      ५. Volume IV, Dr. Ambedkar, Writings & Speeches, Govt. of Maharashtra, 1987.  ६. 'राजवाडे लेखसंग्रह' - सं. लक्ष्मणशास्त्री जोशी - साहित्य अकादमी, नवी दिल्ली, २००७.