'ना गुलाम, ना उद्दाम' - एक अप्रामाणिक पुस्तक !
('Na Gulam, Na Uddam' by Dr. A.H.Salunkhe : A Dishonest book !)
('Na Gulam, Na Uddam' by Dr. A.H.Salunkhe : A Dishonest book !)
अलिकडेच डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'ना गुलाम, ना उद्दाम' हे पुस्तक वाचनात आलं आणि समाजात व फेसबुकसारख्या सामाजिक संकेतस्थळावर वाहणाऱ्या एका विशिष्ठ विचारप्रवाहाचा उगम कुठून झाला असावा याचं कोडं उलगडलं. आह यांचं 'हुएन त्संग' हे पुस्तक माझ्या संग्रही आहे व ते वाचून त्यांच्या विद्वत्तेबद्दल माझं चांगलं मत झालं होतं. त्या पुस्तकाबाबत माझा एकमेव आक्षेप त्यांच्या 'इंग्रज धार्जिणेपणा' विषयी होता. (तसा तो अनेक विद्वानांविषयी आहे.) 'ना गुलाम' पुस्तक ग्रंथालयातून आणून वाचल्यावर या आक्षेपांमध्ये अजून थोडीफार भरच पडली आहे. या पुस्तकाचा खाली सारांशरूपाने परामर्श घेतो.
१) पुस्तकाच्या पहिल्या भागात महाभारतातील स्त्रियांना कशी हीन वागणूक देण्यात आली आहे याविषयीचं विवेचन केलं आहे. या विवेचनाच्या पुष्ट्यर्थ आहंनी ज्या भाकडकथा दिल्या आहेत त्या नंतर घुसडलेल्या असल्याचं त्यांनी स्वतःच मान्य केलं आहे. आणि हे योग्यच आहे. कारण महाभारत मूळ २४००० श्लोकांचं होतं आणि कालांतराने भर पडत पडत ते १००००० श्लोकांचं बनलं असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. चिकित्सक आवृत्ती तयार करण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झाली. मग प्रश्न असा पडतो की ज्या भाकडकथा नंतर घुसडलेल्या आहेत त्या खऱ्या धरून आह महाभारतावर तोंडसुख का घेत आहेत ? तर त्याचं उत्तर असं की या कथा ब्राह्मणांनी स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी घुसडलेल्या आहेत असं आह यांचं प्रतिपादन आहे. पण आपल्या परंपरेप्रमाणे इतिहास व पुराणे लिहिण्याचं काम ब्राह्मणांच नसून सूत नामक लोकांचं होतं. आणि इतिहास पुराणांमध्ये कुणीही घुसडाघुसड करू शकत असेल तर ब्राह्मणांवर तोहमत घेण्यासाठी शाक्त किंवा अन्य कुणी ही घुसडाघुसड केली असं का मानू नये ? कारण शाक्तांनी तशी घुसडाघुसड वैदिक वाड्मयात अनेक ठिकाणी केली असल्याचं दयानंद सरस्वती यांनी (सत्यार्थप्रकाश १८७५) दाखवून दिलं आहे. आणि समजा ही घुसडाघुसड खरी असेल, तर 'महाभारतातील स्त्रिया' असं शीर्षक आहंनी कशासाठी दिलं आहे ? त्याचं प्रयोजन काय ? प्रमाण म्हणून दिलेल्या कथा जर 'घुसडलेल्या' असतील तर महाभारतात स्त्रियांना हीन लेखलं आहे असा निष्कर्ष आह कसा काय काढू शकतात ?
२) त्यानंतरच्या एका भागात 'शिवधर्म' नामक नव्याने काढलेल्या धर्मावर आहंनी दिलेल्या व्याख्यानांचा समावेश आहे. ही व्याख्याने वाचायला सुरुवात केली की आहंसारखा सात्विक, साक्षेपी, समतोल, क्षमाशील वगैरे विद्वान महाराष्ट्रात दुसरा नाही असा समज होऊ लागतो. ब्राह्मण, दलित वगैरे सर्व 'भावंडे' असून आम्ही त्यांच्याशी 'द्वेषरहित' संबंध कायम ठेवणार आहोत असं आह सुचवतात. प्रत्यक्षात मात्र ते वैदिक-अवैदिक, ब्राह्मण-अब्राह्मण यांच्यात द्वेषाची दरी निर्माण करणारं विवेचन ते करत राहतात. (उदा. वैदिक किंवा ब्राह्मण हे शोषण करणारे आहेत, 'गुरु' होण्यासाठी ते लायक नाहीत वगैरे.) जगातल्या अन्य सर्व धर्मांची सुरुवात जणू काही 'वाईट' गोष्टी करण्यासाठीच झाली असावी असं या तथाकथित नव्या धर्माची त्यांनी केलेली भलावण वाचून वाटू लागतं. वैदिक धर्मियांनी केला तो 'बुद्धीभेद' आणि अवैदिकांनी चालवला आहे तो 'युक्तिवाद' असा एकूण आहंचा पवित्रा दिसतो. त्याचप्रमाणे धर्मात किंवा समाजात जी काही क्रांती किंवा प्रतिक्रांती झाली वा तशी खटपट झाली ती केवळ बहुजन समाजातील ब्राह्मणेतर व्यक्तींनी केली असा त्यांचा दावा आहे. तो करत असताना त्यांना विवेकानंद आठवले, पण दयानंद सरस्वती, लोकहितवादी, आगरकर, कर्वे, राजाराम मोहनराय यांची नावे आठवली नाहीत. ही 'विस्मृती' म्हणायची की 'आत्मवंचना' म्हणायची की 'कृतघ्नपणा' म्हणायचा हे समजत नाही. विवेकानंद हे कायस्थ, ब्राह्मण नव्हेत हे लक्षात घेता क्रांती करणाऱ्याची 'जात' आहंनी किती बारकाईने पहिली आहे हे लक्षात येतं. 'कुणीही कुणाला दीर्घ काळ फसवू शकत नाही' अशी एक उक्ती प्रसिद्ध आहे, पण आह मात्र हिंदू (किंवा वैदिक) धर्म हजारो वर्षे बहुजनांना फसवत आला अशी मांडणी करून बहुजनसमाज म्हणजे जणू काही बिनडोक लोकांचा एक जमाव होता असं सुचवून एकप्रकारे त्यांचा अपमानच करत आहेत. शिवाजीने 'शाक्त' पद्धतीने राज्याभिषेक करवून आधीचा वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक रद्द केला असा जावईशोध कुठलाही पुरावा न देता आह यांनी लावला आहे. आहंच्या खांद्याला खांदा लावून शिवधर्माचा उद्घोष करणारे पुरुषोत्तम खेडेकर यांना अलीकडेच स्त्रियांविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल हायकोर्टात बिनशर्त लेखी माफी मागायला लागली. पण या पुस्तकात स्त्री सन्मान आणि समतेची उठसूठ महती गाणाऱ्या आहंनी याबद्दल खेडेकर यांचा अन्यत्र कुठे जाहीर निषेध केल्याचं पाहण्यात आलं नाही.
३) पुढील एका भागात पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना दिल्या आहेत. त्यापैकी मनुस्मृतीविषयक पुस्तकावर लिहितांना शूद्रांवर अन्याय करणारे व ब्राह्मणांची भलावण करणारे अनेक श्लोक आहंनी उधृत केले आहेत. गंमत म्हणजे परस्पर विरोधी आशय असलेले असे अनेक श्लोक त्यांनी एकाखाली एक दिले आहेत आणि मनुस्मृतीत विसंगती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. याबाबतीत त्यांनी दयानंद सरस्वती यांचा 'सत्यार्थ प्रकाश' ग्रंथ वाचला असता तर त्यांना विसंगती असल्याबद्दल आश्चर्य वाटलं नसतं असं सुचवावंसं वाटतं. कारण मनुस्मृतीत ८०० पेक्षा जास्त प्रक्षिप्त श्लोक असल्याचं दयानंद यांनी उदाहरणे देऊन दाखवून दिलं आहे. (हे प्रक्षिप्त श्लोक मात्र स्वार्थी ब्राह्मण शास्त्री पुराणिकांनी घुसवले असावेत असं माझं स्वतःचं मत आहे.) 'फुले आणि चिपळूणकर' या आणखी एका पुस्तकावर लिहिताना व फुले यांची स्तुती करत असताना आहंना चिपळूणकर यांच्यात एकही गुण आढळू नये ही गोष्टही साक्षेपी विचारवंताला शोभेशी नाही. त्यांच्या दृष्टीने चिपळूणकर भले 'सैतान' आहेत असं मानलं तरी 'सैतानालाही योग्य गुणांचं श्रेय द्यायला हवं' हे जगन्मान्य तत्व बहुधा आह यांना मान्य नसावं. जणू काही चिपळूणकर यांनी उभ्या केलेल्या संस्था आणि चळवळी (उदा. न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण छापखाना, चित्रशाळा, किताबखाना, केसरी-मराठा वगैरे) फक्त ब्राह्मणांसाठीच होत्या.
४) महर्षि विठ्ठल रामजी शिंदे ही केवढी महान विभूति ! स्वतः जातीने मराठा असूनही आयुष्यभर त्यांनी दलितोद्धाराचं काम केलं. आंबेडकर यांच्याप्रमाणेच परदेशी जाऊन ते उच्च शिक्षण घेऊन आले होते. 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' सारखं अप्रतिम अभ्यासू लेखन त्यांनी केलं. Depressed Class Mission सारख्या अनेक संस्थाही त्यांनी स्थापन केल्या. पण शाहू-फुले-आंबेडकर यांचं उठता बसता नाव घेणारे आपले विचारवंत कधीही शिंदे यांचं नाव घेत नाहीत. आह यांनीही सदर पुस्तकात ते घेतल्याचं आठवत नाही. यामागचं इंगित काय असावं ? सांगतो. शिंदे हे 'प्रार्थनासमाजी' होते. या प्रार्थनासमाजाची स्थापना १८६७ साली दलितोद्धार, स्त्रीउद्धार, जातीअंत अशा उदात्त उद्दिष्टांसाठी करण्यात आली होती व योजिलेल्या कार्यासाठी नामदेव- तुकाराम आदींचं 'मराठा संतमत' आदर्श मानण्यात आलं होतं. म्हणजे या समाजाचं कार्य अत्यंत स्तुत्य व क्रांतिकारक होतं. मग आहंसारख्या विचारवंतांनी हा समाज व त्याचे अनुयायी यांना अनुल्लेखाने मारण्याचं कारण काय ? तर हा समाज स्थापना करणारे न्या. रानडे, भांडारकर, चंदावरकर, गोखले वगैरे ब्राह्मण होते आणि सदर विचारवंतांसाठी हीच मोठी अडचणीची गोष्ट होती. प्रार्थनासमाजाचं नि तो स्थापन करणाऱ्या ब्राह्मणानचं सोडा, पण किमान महर्षि शिंदे यांचा त्यांच्या महान कार्याबद्दल आपल्या पुस्तकात उल्लेखसुद्धा न करणे याला क्षुद्रपणाशिवाय दुसरं काय म्हणणार ?
५) या पुस्तकात आह यांनी जातिव्यवस्थेबद्दल जे मत व्यक्त केलं आहे ते अत्यंत वस्तुनिष्ठ आहे. ते म्हणतात, 'जातिव्यवस्था नष्ट होणं हे नजिकच्या काळात तरी अशक्यप्राय आहे. तेव्हा प्रत्येकाने निदान स्वतःच्या जातीअंतर्गत सुधारणा कशा होतील हे पाहावं.' मी या मताशी सहमत आहे कारण माझंही अगदी हेच मत आहे. प्रश्न उद्भवतो तो हा, की जातीअंत होणारच नसेल, तर मग शिवधर्म आणि हिंदूधर्म यात कितीसा फरक राहिला ? आणि स्वतः आहच त्याविषयी निराश झाले असताना त्यांच्या विचारांचे अनुयायी जातीअंताचे ढोल अहोरात्र कशासाठी बडवत आहेत ?
६) या पुस्तकातून आहंनी असं सुचवलं आहे की ब्राह्मणवर्गाने बहुजन समाजाचं व विशेषतः दलित समाजाचं शोषण केलं होतं व अजूनही करत आहेत. याबाबतीत आहंना खालील प्रश्न विचारावेसे वाटतात.
-पूर्वीच्या काळात शोषण झालं तेव्हा सत्ताधारी वर्ग कोणता होता ?
-स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या काळात सत्ताधारी कोण होते व आहेत ?
-Atrocity कायद्याखाली कुठल्या जातीतल्या लोकांवर सर्वात जास्त गुन्हे दाखल आहेत ?
-ब्राह्मण समाजावर तसा एक तरी गुन्हा दाखल आहे का ?
आह किंवा त्यांचे समर्थक या प्रश्नांची खरी उत्तरे कधीच देऊ शकणार नाहीत.
७) आहंनी या पुस्तकातून असं स्पष्ट विधान केलं आहे की 'गुरु' व्हायला हे (म्हणजे ब्राह्मण) कधीही लायक नव्हते व नाहीत. त्याविषयी खालील प्रश्न त्यांना विचारता येतील.
-चाणक्य हा ब्राह्मण चंद्रगुप्ताचा गुरु नव्हता का ? त्याला राज्य मिळवून देण्याची सगळी खटपट त्यानेच केली होती ना ?
- विद्यारण्य हे (विजयनगर साम्राज्याचे स्थापक) हरिहर व बुक्कराय यांचे गुरूच होते ना ? तेही ब्राह्मणच होते ना ?
- कुठल्याही गडावरच्या रहिवाश्यांना, गाईडना विचारा (जे राजांच्या मावळ्यांचे वंशज आहेत) ; शिवाजीराजांचे गुरु म्हणून ते शहाजी-जिजाऊ यांच्याबरोबरच दादोजी, सोनोपंत, रामदास यांचीच नावे घेतात ना ? ही मंडळी ब्राह्मण होती ना ?
- ज्या विवेकानंदांचं नाव आहंनी मोठ्या कौतुकाने घेतलं आहे त्या विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस हेही ब्राह्मणच होते ना ?
या प्रश्नांची उत्तरे आहंना निश्चितच माहीत आहेत. तरीही जाणीवपूर्वक ते अशा तऱ्हेची विधाने करत आहेत. हा एकप्रकारचा बुद्धीभेदच नव्हे काय ? आहंच्या मते ब्राह्मणांनी बहुजन समाजाचा बुद्धिभेद केला. पण या पुस्तकातून आह स्वतःच्याच समाजाचा बुद्धिभेद करत आहेत.
८) कुठल्याही धर्माची सुरुवात चांगल्या उद्दिष्ठांसाठीच होत असते व कालांतराने त्यात वाईट प्रवृत्ती शिरू शकतात. हिंदू धर्मातही तशा काही शिरल्या असतील यात अनैसर्गिक काहीच नाही. आर्नोल्ड टोयनबी हे बायबलग्रस्त इतिहासकार. पण 'History of World' या १२ खंडातील इतिहासात कण्हतकुथत का होईना, पण त्यांनाही हिंदू धर्माची 'उदार आणि सर्वसमावेशक' अशी स्तुती करणे भाग पडले आहे. कारण एखादा धर्म इतका काळ टिकून राहण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. संकुचित धर्म कधीही इतका काळ टिकू शकत नाही. हे ज्याअर्थी मला माहीत आहे त्याअर्थी व्यासंगी आहंनाही माहीत असणारच. मग ते शहामृगी पवित्रा घेत आहेत तो कशासाठी ? महाभारतात स्त्रियांना अत्यंत सन्मान प्राप्त झाला आहे असं मत अन्य विद्वान प्रकट करत असतात. उदा. १३-२-१५ च्या 'लोकसत्ता' मध्ये राम शेवाळकर यांचं एक व्याख्यान उधृत केलं आहे. त्याचं शीर्षकच 'महाभारतातील स्त्री पात्रे प्रभावी' असं असून व्यासांनी स्त्रीशक्तीचा कसा महान आविष्कार सादर केला आहे ते त्यात त्यांनी सांगितलं आहे.
पहा : http://www.loksatta.com/ vishesh-news/ram-shewalkar- speech-on-characters-in- mahabharata-1071088/
डॉ. पी. एल. भार्गव, डॉ. ह रा. दिवेकर, डॉ. म. अ. मेहेंदळे यांच्यासारख्यांनी भाकडकथांची चिरफाड करणारे ग्रंथ लिहिले आहेत. (उदा. 'Retrieval of history from Puranical myths' by Bhargava) मग तिकडे डोळेझाक करून आह काय साधण्याचा प्रयत्न करत आहेत ? एकंदरीत हे पुस्तक वाचून आह यांच्या अप्रामाणिक, पूर्वग्रहदूषित, द्वेषमूलक दृष्टिकोनाविषयी माझी निराशा झाली आहे.